या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
हा लेख 'चंदगडी' नामक मराठीची एक बोलीभाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चंदगडी.
चंदगड हा महाराष्ट्रातील एक नावाजलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) आहे. ह्या तालुक्यात अतिपावसाळी डोंगराळ प्रदेश व तालुक्याच्या पश्चिमेला विस्तृत वनक्षेत्र आहे. कोकण-गोव्याशी संलग्न असलेल्या तिलारी आणि आंबोली अशा दोन घाटांवर हा तालुका वसला आहे. कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सर्वाधिक अंतर, दोन भिन्न भाषा-बोलींचा शेजार आणि नित्यसंपर्क, भाषावार प्रांतरचनेपर्यंत येथील विविध राजकीय अंमल अशा अनेक गोष्टींच्या पार्श्वभूमीवर येथील बोली स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये घेऊन तयार झालेली आहे.[१]
भौगोलिक स्थानाचा प्रभाव
हा तालुका कर्नाटकातील बेळगावच्या पश्चिमेला १५ कि.मी. अंतरावर आहे. पूर्वेला कर्नाटक राज्य, पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हा, दक्षिणेला गोवा राज्य असे या परिसराचे भौगोलिक स्थान आहे. या परिसरामध्ये ही चंदगडी बोली बोलली जाते. या बोलीवर कोकणी व कन्नड या दोन भाषांचा प्रभाव आहे. भिन्न संस्कृती, दूरत्व, संपर्कक्षेत्रांची भिन्नता, भिन्न शेजार भाषा इत्यादी कारणांमुळे चंदगडी बोलीची तालुक्याच्या या दोन विभागात दोन भिन्न रूपे कल्पिला येतात. या तालुक्याच्या पूर्वेकडून पश्चिमला प्रवास करीत जाताना कन्नड भाषेचा प्रभाव असलेल्या बोलीरूपाकडून कोकणीचा प्रभाव असलेल्या बोलीरूपाकडे सरकत जात असल्याचा अनुभव येतो. शब्दसंग्रह, उच्चाराचा विशिष्ट हेल, व्याकरणिक विशेष या सर्वच बाबतीत हे वेगळेपण दिसून येते. कोणत्याही विस्तृत प्रदेशात भाषा बोली एकसारख्या आढळत नाहीत. त्याप्रमाणेच चंदगड तालुक्यामध्येही आढळणारे बोलीरूप सर्वत्र एकसारखे दिसत नाही. तथापि या सर्व विस्तृत प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलीला मात्र ‘चंदगड बोली’ अशा एकच नावाने ओळखले जाते.
या तालुक्यातील अनेक गावे म्हणजे छोटया छोटया वाड्या आणि वस्त्या आहेत. या प्रदेशात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आजही पावसाळयात अनेक गावांचा संपर्क तुटतो. बेळगावच्या पश्चिमेला असलेल्या यरतनहट्टी, राजगोळी, दिंडलखोप या गावांपासून पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्हयाच्या सीमेलगत असलेल्या मिरवेल, इसापूर, वाघोत्रे या गावांमधले भौगोलिक अंतर सुमारे शंभर कि.मी.हून अधिक आहे.
इतिहास
चंदगडी ही प्रमाण मराठीशी नाते सांगणारी परंतु शब्दसंग्रह, व्याकरणिक व्यवस्था, उच्चारवैशिष्ट्ये इत्यादी संदर्भात स्वतःचे वेगळेपण जपलेली ही बोली आहे. प्रमाणभाषेचा आणि प्रमाण मराठीच्या रूपाशी जवळच्या बोलीरूपांचा व्यवहारात वापर होणारी ठिकाणे ही मोठी शहरे असतात. सुशिक्षित वर्गाच्या घनतेमुळे अशा ठिकाणी सर्वच लोक प्रमाण मराठीशी सर्वपरिचित असतात. तसे ग्रामीण परिसराबाबत सांगता येत नाही. चंदगड तालुका ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो, त्या कोल्हापूरपासूनही तो सुमारे एकशेपन्नास कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे या बोलीची स्वतंत्र वाटतात.
चंदगडी बोलीचा अभ्यास मराठीची बोली म्हणूनच करावा लागतो. कोणत्याही भाषा-बोलीची पूर्वपरंपरा अभ्यासण्यासाठी लिखित-मुद्रित पुराव्यांना विशेष महत्त्व असते. चंदगडी ही बोली स्वतंत्रपणे अभ्यासताना अशा लिखित, मुद्रित पुराव्यांची वानवा जाणवते. प्रस्तुत बोलीच्या अभ्यासाठी मागील पाच-सहाशे वर्षांचा इतिहास उलगडून पाहता, या परिसरातून या बोलीचा प्रभावी वापर करून कोणी लेखन केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे प्राचीन नमुना म्हणून अभ्यासकांसमोर कोणताही पुरावा उपलब्ध नाही. यास्तव या बोलीचा स्वतंत्रपणे ऐतिहासिक मागोवा घेता येत नाही. तथापि चंदगडी बोलीचा शब्दसंग्रह, उच्चारविशेष यांच्या आधारे या बोलीच्या निर्मितीची ऐतिहासिक कारणमीमांसा करता येऊ शकते.
चंदगडचा हा परिसर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. परंतु राजकीय दृष्ट्या तो करवीर संस्थानाचा भाग कधीही नव्हता. त्यामुळे कोल्हापूरच्या वाटचालीचा विचार करता चंदगड अनेक बाबतीत मागे राहिला. हा तालुका छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थांनात न आल्याने शिक्षण आणि इतर सुविधांपासूनही वंचित राहिला होता. तथापि या तालुक्यातीलच काही पुरोगामी विचाराच्या हरहुन्नरी कार्यकर्त्यांमुळे स्वतंत्र्योत्तर काळात येथे सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात जागृती निर्माण झाली. तत्पूर्वी मात्र हा परिसर सर्वच बाबतीत मागास होता. त्यामुळे चंदगडी बोलीच्या जुन्या रूपाविषयी विशेष साधने हाती लागत नाहीत. अलीकडच्या काळात रणजित देसाई यांच्यासारखे अतिशय लोकप्रिय लेखक या परिसरात जन्मले, राहिले. त्यांनी आपले सारे लेखन या परिसरात राहून केले. त्यांच्या लेखनामधून (माझा गाव, बारी इत्यादी) या परिसराचे चित्रण झाले. परंतु येथील बोलीचा त्यांनी आपल्या लेखनासाठी विशेष वापर केला नाही. त्यांच्यानंतरही अनेक नवोदित लेखक या परिसरात तयार झाले. त्यांनीही आपल्या क्षमतेनुसार वाङ्मयनिर्मिती केली. परंतु या बोलीचा प्रभावी वापर लेखनासाठी अद्याप (२०१९ साल) कोणी केलेला दिसत नाही. मात्र चंदगड तालुक्यातील एका छोटयाशा दुर्गमग्रस्त सडेगुडवळे या गावामधील कुणाल सावंत-भोसले या तरुणाने कचराकुंडी, ताईची सुरक्षा या शॉर्ट फिल्म्स बनवून चंदगड या छोट्या तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर केले. कुणाल यांनी वरील दोन्ही शॉर्ट फिल्म्सद्वारे सामाजिक प्रबोधनही केले. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांना कोल्हापूर जिल्हा, तसेच सावंतवाडी या भागात ओळखले जाऊ लागले.
चंदगड मध्ये सण वगैरे असतात तेव्हा गाणी गाण्याची प्रथा आहे. या गाण्यांना या बोलीत ‘गित्ती’ म्हणतात. या गित्ती परंपरागतरीत्या एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालत येताना भाषिक बदल होण्याची संभावना अधिक असते. त्यामुळे बोलींच्या जुन्या रूपांसाठी अशा गीतांवर अवलंबून राहाणे विशेष फलदायी ठरत नाही. या गीतांच्या तुलनेत ‘कहाण्यां’ची (लोककथांची) संख्या या परिसरात अगदीच नगण्य आहे. या कथांची कथनपरंपरा या परिसरात जवळजवळ संपुष्टात आलेली दिसते. त्यामुळे बोलीच्या परंपरेसंदर्भात भाष्य करण्यासाठी काही मर्यादा पडतात.
क्षेत्रमर्यादा:
वर दिलेल्या कारणांमुळे चंदगडी बोलीची क्षेत्रमर्यादा निश्चित करून बाहय अभिव्यक्तीसाठी व्यवहारात प्रचलित बोलीचे विश्लेषण करणे सयुक्तिक ठरेल. चंदगड तालुका, बेळगाव परिसरातील अनेक गावे, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्यातील काही गावे आणि आजरा तालुक्याच्या दक्षिण भागाकडील काही गावे असा विस्तृत प्रदेश या बोलीच्या विश्लेषणासाठी विचारात घेता येतो. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमालगतची सर्व गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे व्यवहारासाठी ज्या बोलीचा वापर करतात ती पूर्णतः कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली आहे. तर चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमधून कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरली जाते.
चंगदडी बोलीमध्ये निर्माण झालेला शब्दसंग्रह, या बोलीचे व्याकरणिक विशेष पाहाता, या बोलीच्या निर्मितीमागील कारणांचा शोध घेता येतो. कोणत्याही भाषेत घडून येणाऱ्या भाषिक परिवर्तनामागील कारणांचा शोध ज्या-त्या परिसरात शोधावा लागतो. कोणत्याही विस्तीर्ण प्रदेशातील भाषा त्या प्रदेशाच्या वेगवेगळया भागात कमी-अधिक प्रमाणात आपले रूप बदलताना दिसते. दळणवळण, संपर्क, प्रभाव, संस्कृती, लोकांचे राहणीमान, व्यवसाय इत्यादी गोष्टींमुळे हा बदल घडून येतो.
दाेन रूपे:
चंदगडच्या पश्चिम आणि पूर्व भागातील भाषिक नमुन्यांचा अभ्यास या लेखात केलेला आढळेल. तत्पूर्वी चंदगडी बोलीच्या वैशिष्टयांबाबत येथील प्राचीन इतिहासाचा संक्षिप्तपणे आढावा घेतल्यास प्रस्तुत बोलीच्या विशेषांवर काही भाष्य करता येते. या परिसरावर मौर्य, सातवाहन, शिलाहार, कदम्ब, राष्ट्रकुट आणि यादव अशा घराण्यांनी राज्य केल्याचे दाखले मिळतात. चंदगड परिसरातील राजकीय स्थित्यंतराचा आढावा घेताना कोकण, गोवा, कारवार, बेळगाव, म्हैसूर-बेंगलोर, विजापूर पर्यंतच्या राजवटींचा विचार करावा लागतो. कारण या राजवटींचा अंमल कमी-अधिक काळ या भूभागावर होता. या राजवटी भिन्न-भिन्न भाषकांच्या आहेत. गोवा-कोकणातील सागर किनारे आणि बंदरे येथून खूपच जवळ असल्याने प्राचीन काळापासून मालवाहतुकीच्या निमित्ताने या परिसरातून व्यापारी-विदेशी लोकांचे येणे-जाणे होत राहिले आहे. गोव्यातील धर्मप्रसारक पोर्तुगीज यांचाही या परिसरात वावर दखल घेण्याइतका होता. येथून गोवा केवळ साठ-सत्तर कि.मी. अंतरावर असल्याने या परिसरात त्यांनी धर्मप्रसाराचे बरेच कार्य कलेले आहे. त्यांनी चंदगड तालुक्यातील अनेक गावांमधून मोठया प्रमाणात धर्मांतर घडवून आणले आहे. आज अनेक गावांमधून उभे असलेली चर्चेस हे त्यांच्या या कार्याचे प्रमाण आहे. अशा विविध कारणांमुळे येथील भाषकांचा परकीय भाषांशी, उर्दू, शेजारभाषा म्हणून कोकणी-कन्नड इत्यादी भाषांशी नित्याचा संपर्क येत राहिला आहे. त्याचबरोबर हा परिसर एकेकाळी द्रविडी वंशाच्या लोकांचा असल्याचेही पुरावे सापडतात. या परिसरातील देवदेवताही द्रविडी आहेत. महात्मा फुले यांच्या मते म्हसोबा, चाळोबा, चव्हाटा, मरगूबाई, पवनाई, थळ, महारथळ अशा देवता म्हणजे द्रविडी सरदार होत. हे सर्व सरदार गावचे रक्षणकर्ते होते. आजही या परिसरात गावयात्रा (या परिसरात यात्रांना ‘म्हायी’ म्हणतात) आणि इतर सण, विधींच्या निमित्ताने सारे गाव मिळून या देवतांकडे गावरक्षणाचे गाऱ्हाणे घालते. या वरूनही या गोष्टीची वास्तविकता पडताळून पाहाता येते. त्याचबरोबर मालवण, वेेंगुर्ला, गोवा आणि कारवार ही प्राचीन काळापासून विदेशी व्यापाराची केंद्रे होती. कोल्हापूर-बेळगाव या व्यापारी ठाण्यांना माल पुरविण्याचा एक मार्ग चंदगड तालुक्यातून होता. या बंदरावर येणारा विदेशी माल या मार्गाने ने-आण करीत असताना रात्र झाली तर अनेक व्यापारी सुरक्षिततेसाठी वाटेत लागणाऱ्या गावांमध्येच मुक्काम करीत. अशा अनेक गोष्टींमुळे होत राहिलेला भाषासंपर्क संस्कृतीसंपर्क या बोलीच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला आहे.
अलीकडच्या काळासंदर्भात येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासता, स्वातंत्र्यपूर्व काळात हा तालुका कोल्हापूर संस्थान आणि या तालुक्याच्या उत्तरेकडील महाराष्ट्राच्या भूमीशी संलग्न असल्याचे दिसत नाही. हा तालुका काही काळ कुरुंदवाड (सीनिअर) संस्थानात होता. शिवाय बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषकांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता. या परिसरातील अनेक लोक रोजगारासाठी गोव्याला जातात. तेथे एक-दोन महिने राहून ते परत येतात. अशा अनेक कारणांमुळे या परिसरातील लोकांचा संपर्क कोकण आणि गोव्याशी राहिला आहे. त्यामुळे पश्चिम भागातील लोकांच्या भाषेवर कोकणीचा प्रभाव जाणवतो. या बोलीचा शब्दसंग्रह आणि व्याकरण विशेष पाहताना ही बाब ध्यानात येते.
चंदगडी बोलीच्या क्षेत्राचा भूगोल
कोल्हापूर जिल्हयातील एक दुर्गम आणि डोंगराळ तालुका, अतिवृष्टी, डोंगर-दऱ्या, धबधबे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे आणि थंड हवा यामुळे या तालुक्याचा पर्यटकांना मोह आहे. या तालुक्याचे निसर्गसौंदर्य पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडणारे आहे. सरासरी २८० इंच इतका पाऊस या परिसरात पडतो. त्यामुळे अनेक वृक्ष-वेली, औषधी वनस्पती यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. ताम्रपर्णी, घटप्रभा, मार्कंडेय, तिलारी या नद्यांची उगमस्थाने चंदगड तालुक्यामध्ये आहेत. मुबलक पाणी आणि अतिवृष्टीमुळे तीस हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे.
चंदगड या तालुक्याच्या गावापासून पश्चिमेला केवळ २५ कि.मी. अंतरावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आंबोली (जि. सिंधुदुर्ग) आहे. याच ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस नोंदविला जातो. हा कोकणी भाषिक प्रदेश थंड हवेचे ठिकाण म्हणून लोकप्रिय आहे. चंदगडच्या दक्षिणेला १५ कि.मी. अंतरावर तिलारीनगरचा निसर्गरम्य परिसर आहे. तिलारी-कोदाळी या गावानंतर तिलारी घाट लागतो. या घाटातून ४० कि.मी. अंतरावर गोवा आहे. या तालुक्यातील लोकांचा गोव्याला जाण्याचा हाच मार्ग आहे. या तालुक्यातील बहुतांश गावे ताम्रपर्णी आणि घटप्रभा या नद्यांच्या आजुबाजूला वसलेली आहेत. त्यामुळेच या नद्यांना तालुक्याच्या भाग्यदायिनी म्हणून ओळखले जाते. या तालुक्यातील कमाल तापमान ३४ अंश से. एवढे असते. तर सरासरी पाऊस ३०५ सेंटिमीटर इतका आहे. या तालुक्यात भात, नाचणी, रताळी, ऊस, भुईमूग, बटाटे आणि मिरची अशी मुख्य पिके घेेतली जातात. शिवाय पश्चिम विभागात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
चंदगडी बोलीचा नमुना
“
म्हायारास जाऊसेत म्हणून भगाटल्याधरणं राबोललोय. माझ्या वाट्याची रोच्ची कामं सप्पोसच रात व्हते. आज म्हायारास जाऊसेत म्हणून यरवाळम्हेरेन कामास लालोय तरीबी कामं सप्पेणात. निंबार पडोच्याआत बुक्याळास पोचतलं यवजलोय खरं कव्व जाऊन लागतोय काय म्हाईत. पंदरादी झाले बाबा न्हंगड्यास पडलाय. आयीचं तीनदं सांगण यलं.खरं कामातणं उसरगच गावेणा. तिचं अवसानच गळालय. तीबी शिक पडली म्हणी. तिचं तरी किरमं कव्व खंडीचं नसताय. बाबावांगडं खपोन तिच्याबी जीवात काय ऱ्हालय आतं? चिप्पाड झालय निसतं. तिच्याबी जलमाचं वाळवाणच केल्यान बाबान. मिय्या काळजीतरी कित्ती करुची. आत्तं भियंच वाटोललय. बाबाचं जास्तीनी झालय का कायकी. लईच ठकलाय म्हनी. त्यास तरी कित्तीदं सांगोचं. जरा बरं वाटोल्ल की ह्यला दारू यवाजते. त्यंच्या वाटणीस ती वसेदुच झाले. डाकटर तरी कित्तीदा बेडशिवील. लईच आरमुट हाय. आत्त तरी किरडावलाय निसता. निसता वनवा झालाय सऱ्यांच्या वाटणीस. मिंत्या करून इट यलाय सऱ्यासनी. शिरं पडल तोंडार कुणाचं वट्टातूच आइकणं न्हाय तर. आप्पाबी खिदडून दमला. त्यच्या जीवासतरी खलेटे ठारा असताय. दिसध्याड त्यच्याबी जल्मास राबनूकच पूजली हाय. बाबान सगळ दिक्कोमाळ केल्यानाय. शिवारातली चक्कोटली वावरं दारवेत घातल्यान. आदमासी पंधराइस चिल्लं भात व्हयी तिते. वशाडपडल त्यच्या जल्माअर. आप्पाअर आळास जातली यळ आणल्यान त्यनं. राग यताय खरं करणार काय? कसाबी असला तरी आयीचा कुकू हाय त्यो. जाऊन कव्ह यगद त्यचं त्वांड बगतो आसं झालय. भिगीन जाऊचं म्हनत्यानं ह्यनीनी अजुन जोताचे यवूचे हायीत. उजवाडोच्या आदी गेल्यात, भुकेल्यातबी आसेल. कल आनुसेपोटी निंबार पडेपतोर ऱ्हाल्ले. आल्याअर उचबांळोललय म्हनूले. यवडा वकत ऱ्हाल्यावर भोवाडल्याम्हेरेन ऱ्हायील? कित्ती पावटी सांगोचं भिगीनं ययीत ऱ्हावा म्हणून. हेबी आरमुटच हायीत. काम उलं व्हयीना, यळेत ज्युचं. राबनूक काय जल्माची सपले? मिंत्या करतोय खरं आमचं खल्यास पडलय आयकोचं. आजबी यदवसकोळ यवूस न्हायीत. यवूदेत कव्व यवूचं तव्व. घितील वाडून. मिय्या अजुन पारोशा तोंडानुच हाय. पानीबी लासेसकं झालय अशेल. चार तांबये भसासी वत्तो अंगावर. आई वाटेडे डोळे लावून बसले असेल. तिचेसाठणं सकाळधरणं गुद्याडोन धाबारा भाकरी थापलोय. ध्यायी काय गप्प बसो देते. बाबासाठणबीं इसेक कवटं ठेवलोय. ती घेतो बांदोन नी जातो भार्रणं. पल्ला काय जवळचा हाय.
”
वरील परिच्छेदाचा प्रमाण मराठीत अनुवाद-
माहेराला जायचे म्हणून सकाळपासून राबतेय. माझी रोजची कामे संपायला रात्र हेाते. आज माहेराला जायचे म्हणून पहाटेपासून कामाला जुंपून घेतले आहे तरीही कामे संपत नाहीत. ऊन व्हायच्या आत बुक्याळाला पोहोचायचे ठरविले आहे पण केंव्हा पोहोचते काय माहिती. पंदरा दिवस झाले बाबा आजारी आहे. आईचा तीन वेळा निरोप आला. पण कामातून विश्रांतीच मिळत नव्हती.ती खूपच काळजीत असणार. तीही आजारी होती म्हणे. तिची सर्दी जातच नाही. बाबासोबत राबून तिच्याही जीवात काही राहिले नाही. जन्माचं वाटोळं केले बाबानी तिच्याही. मी काळजी तरी किती करावी. आता भीतीच वाटते. बाबाचा आजार वाढला आहे की काय माहिती. फारच खराब झाला आहे असे कळते. त्याला तर किती सांगायचे? थोडे बरे वाटले म्हणजे लगेच याला दारू सुचते. डॉक्टरही सांगून थकलेत आता.आता तर खूपच बिघडलाय. कुणाचेच आयकत नाही. दादाही सांगून थकला. त्यालाही कसली उसंत म्हणून मिळत नाही. सतत राबत असतो. चांगले शेत बाबाने दारूसाठी विकून टाकले. पंधरा-वीस पोती भात पिकायचे तेही गेले. त्यामुळे दादावर मजुरीला जायची वेळ आली आहे. बाबांचा राग येतोय पण करणार काय? कसाही असला तरी आईचा कंकू आहे तो. जाऊन त्यांचे केव्हा तोंड पाहतेय असे झाले आहे. लवकर जायचे म्हरतेय तर हेदेखील जोत घेऊन अद्याप आलेले नाहीत.पहाटे लवकर गेले आहेत. त्यांनाही भूक लागली असेल. काल उपाशीपोटी दुपारपर्यंत राहिले होते. आल्यावर गरगरत आहे म्हणत होते. उपाशीपोटी इतका उशीर राहिल्यावर गरगरल्याखेरीज राहील काय? किती वेळा सांगितले की लवकर येत चला म्हणून, पण आमचे ऐकतंय कोण? आजही आत्तापर्यंत आलेले नाहीत. येऊ देत केव्हा यायचे तेव्हा. घेतील वाढून. मी जून तोंडदेखील धुतले नाही. पाणीही खूप गरम झाले असेल. घेते चार तांबे अंगावर आणि जाते. आई वाट पाहात असेल. तिच्यासाठी गडबडीने चार भाकरी केलेल्या आहेत. मन काय शांत बसू देते. बाबांसाठीही वीसेक अंडी ठेवली आहेत. ती घेते बांधून आणि निघते लवकर. अंतर काही जवळचे नाही.
निवडक शब्दसंग्रह (पश्चिम विभाग)
चंदगडी - मराठी
अयार/ शेस - आहेर
आडाळी - विळती
तरक - लक्ष
कवंडाळ - झाडावर पिकलेला आंबा
डंग - गच्च झुडूप
किरमं - सर्दी
व्हळी - गवताची गंजी
भोवड - शिकार
किरवं - खेकडा
किरपन - बारीक
करक - मशार
बेस - फोड
काडू - गांडूळ
बेडशिवणे - घाबरविणे
वाडभर - खूप वेळ
ब्याद - लचांड
वागंडास - सोबत
वांगडं - भाजी
माळीक - सारखे
शिक - आजारी
भाव - विहिर
ईल/यबाव - अवतार
मोसबा - नखरा
बेरका - चाप्टर
याद- - आठवण
देवचार - भूत
इस्टन - संपत्ती
म्हेर - रताळ्याचा बांध
गोराब - इरल
अनुशापोटी - रिकामी पोटी
डाळी - चटई
रोड्डा - डावा
गुत्याडणे - धडपडणे
लाटण - कंदिल
इस्वान - गरम पाणी थंड करण्यासाठी वापरले जाणारे पाणी
घोटा - गुडघा
इस्तारी - पत्रावळी
कांबख - पाहुणेर/इर्जिक
काचबारणे - गोंधळणे
कळखोचरा - भांडण काडणारा
आरमुट - उर्मट
चाटल्यान - लवकर
आकेरशिट्टी - शेवटी
भुतूर - आत
आरगाडी - मोठी
आचुत्त - आपसूक
उजवोड - उजेड
हाऊळ - दंगा
नक्काडं - लहान
आगोप - लवकर
कलागत - तक्रार
धेडा - करवला
धेडी - करवली
किरडावणे - लाज सोडणे
डबारा - खड्डा
थप्पाडा - रुंद
पासालणे - झोपणे
हातराण - पगळणे
पिसकाटे - बिघडणे
पाळक - सुट्टी पाळणे
बळ्यान - मुद्दाम
आगासणे - सुकणे
चिंबणे - आकसणे
आच्चुती - आयती
आवसान - धिर
इक - विष
दिक्कोमाळ - विल्हेवाट
इसरग - विसरणे
उजवोड - उजेड
निवणे - थंड होणे
उमेंद - उमेद
ख्याप - वेळ
दिक्कोमाळ - विस्कटणे
आरगटणे - वेढणे
मसोटी - स्मशानभूमी
बावळा - खांदा
उच्चार विशेष
या बोलीभाषेत व्हता, आल्ली, काडूलावत, जातलं, यल्ली, गेल्ली अशी क्रियापदाची रूपे दिसतात. विभक्तीच्या द्वितीयेच्या प्रत्ययांच्या स, ला, ते या प्रत्ययांमध्ये स,ला ऐवजी 'स' हा प्रत्यय सर्वाधिक वापरला जातो. ही बोली उच्चारणदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असून विशिष्ट हेल काढून बोलणे हे या बोलीची खासीयत आहे.
प्रमाण भाषेपेक्षा बोली जिवंत आणि अधिक प्रवाही असतात. त्यामुळे एखाद्याया विस्तृत प्रदेशातील बोली सर्वत्र एकसारखी आढळत नाही. ती प्रदेश, व्यवसाय, भौगोलिक-सांस्कृतिक परिस्थितीनुसार बदलत राहते. त्याचबरोबर बोलीवापरामध्ये रूढी महत्त्वाची ठरते. बोलीतील शब्दांचे उच्चार, हेल, बलाघात यांची तुलना प्रमाण भाषेशी करता बोलीचे वेगळेपण ध्वनित होते. बोलीतील एखादा वाक्यप्रयोग प्रमाण मराठीच्या तुलनेत चुकीचा वाटत असला तरी, विशिष्ट पद्धतीने बोलणे समाजात रूढ होऊन गेलेले असते. उदा. चंदगडी बोलीमध्ये स्त्रिया ‘मिय्या जेवलो’, ‘मिय्या बाजारास गेल्लो’ असे बोलतात. या वाक्यातील क्रियापदे पुलिंगी आहेत. परंतु असे बोलणे या बोलीत रूढ होऊन गेलेले आहे. त्यामुळे बोली विचारात रूढीचाही विचार महत्त्वाचा ठरतो.
चंदगडी बोलीमध्ये आपण पश्चिम विभाग आणि पूर्व विभाग असे दोन विभाग कल्पून बोलीचा नमुना आणि शब्दसंग्रहाचा विचार केला आहे. वरील नमुने केवळ बोलीचे वेगळेपण ध्यानात येण्यासाठी विचारात घेतलेले आहेत. चंदगडी बोलीचा शब्दसंग्रह विपुल आहे. संपूर्ण शब्दसंग्रहाचा आणि इतर वैशिष्ट्यांसंदर्भातील विस्तृत विचार येथे केलेला नाही. शब्दसंग्रहाचा विचार सामाजिक संदर्भातही करता येतो. उदा. ‘म्हेर’ हा शब्द या परिसरातील ‘रताळी’ या पिकामुळे बोलीत समाविष्ठ झालेला आहे. या परिसरात झालेल्या धर्मांतरामुळे ‘बाटका’ हा शिवीसदृश्य शब्द तयार झालेला आहे. असा संदर्भ अनेक शब्दांच्या संदर्भात नोंदिविता येईल.
या बोलीतील शब्दांचा प्रमाण मराठीतील शब्दांशीही तुलनात्मक विचार नोंदविता येतो. उदाहरणार्थ, ‘वसूला’ हा शब्द प्रमाण मराठीतील वसूल, वसूली या शब्दाशी संबंधित नाही. चंदगडी बोलीत ‘वसूला’ हा शब्द ‘वशिला’ या अर्थाने वापरला जातो. ‘वट’ हा शब्द ‘हुकमत’ या अर्थाने वापरला जातो. तर ‘वट्टात’ हा शब्द हा शब्द चंदगडी बोलीत दोन भिन्न अर्थाने प्रचलित आहे. ‘मिय्या वट्टात वाटणी देऊसकी न्हाय’ या वाक्यामध्ये तो ‘अजिबात’ या अर्थाने येतो. तर ‘आमी वट्टात श्यात करूलावात’ या वाक्यात तो ‘एकत्र’ किंवा ‘मिळून’ या अर्थाने येतो. असे पुष्कळ विशेष या बोलीतील शब्दसंग्रहाचे सांगता येतील.
चंदगडी बोलीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे उच्चारण हे आहे. ही बोली एका विशिष्ट उच्चाराने, हेल काढून बोलली जाते. ‘जाऊलेसाय...’ हा एक शब्द वाटत असला तरी, हा शब्दप्रयोग ‘तू जात आहेस?’ या अर्थाने वापरला जातो. या शब्दातील ‘ऊ’ ‘सा’ आणि शेवटी ‘य’ या तीन ध्वनींचा उच्चार सुरावटीत केला जातो. अशा प्रकारे या बोलीमधील जवळजवळ प्रत्येक शब्दात ही सुरावट दिसून येते. त्यामुळे व्यवहारात या बोलीलाच एक सुरावट प्राप्त होते. ‘तिया यल्लीस’ हे वाक्य प्रश्नार्थक आहे. परंतु ही प्रश्नार्थकता या बोलीच्या सुरवटीतून, सूर ओठण्याच्या पद्धतीतून प्राप्त होते. ‘तू आली होतीस का?’ हे प्रश्नार्थक वाक्य वरील केवळ दोन शब्दातून विशिष्ट सुरावटीमुळे बोलता येेते. ‘यल्लीस’ या शब्दातील ‘ई’ आणि ‘स’ या दोन्ही ठिकाणी सूर ओढला जातो. ‘ई’ची सुरावट दीर्घ आहे. ही सुरावट दीर्घ असली तरी शेवटी पुन्हा ‘स’ उच्चारण्यापूर्वी ‘ई’ वर जोर दिला जातो. ‘तिय्या जाऊललीसाय’ या वाक्यामध्ये ‘तू’ हे सर्वनाम ‘तिय्या’ असे होते. शिवाय ‘तिय्या’चा उच्चार पुन्हा खास सुरावटीमध्ये होतो. ही सुरावट, उच्चारविशेष कोकणीच्या जवळची आहे. अशी विशिष्ट सुरावटीमध्ये बोलली जाणारी बोली तालुक्याच्या पश्चिम विभागात दिसते.
पूर्व विभागात बोलीची सुरावट कन्नडच्या प्रभावाने तयार झालेली आहे. कव्वा (केव्हा), कास (कशाला), खट्टे (कोठे), गसली (गेल्यावर्षी), तण्ण (तेव्हा), तवरस्क (तोपर्यंत), चकोट (चांगले), बळ्यान (खोटे), माज (मला), मिय्या (मी) असे शब्द पूर्वविभागात दिसतात. ‘कासनी ते’ ‘खट्टे गेल्ल्यास’, ‘कन्नच्चान सोदूलोय मसोटीत गेल्ल्यास काय’ अशी वाक्ये प्रत्यक्ष ऐकणे हा एक अनुभव असतो. या विभागात तूज, माज, त्यास, तिण्ण, मिण्ण, त्यण्णाणी, हयणाणी अशी सर्वनामे वापरली जातात.
अनुवाद
ताई काय सांगू तम्हाला. लक्ष्मीच्या यात्रा सुरू झाल्यापासून साड्यांना काही कमी नाही. यात्रेला साडीचा आहेर असतोच त्यामुळे दरवर्षी सात-आठ साड्या मिळतातच. दरवर्षी कोणत्याना कोणत्या गावची लक्ष्मी आहेच. मागील वर्षी सांबरा, सांगाव, बडसची लक्ष्मी झाली. त्याअगोदर बेळगुंदीची होती. परवा परवा खानापुरची झाली. या वर्षी तुडये, उचगाव, कोनेवाडी, बसूर्ते या गावच्या लक्ष्मी होणार आहेत. या सर्वच गावांमध्ये आमचे पाहुणे आहेत. आमचे पांडूगावडेंचे घराणे सर्वत्रच प्रसिद्ध. कोणत्याही गावामध्ये आमचे पाहुणे आहेतच. आमच्या नातवंडांनी कोणत्याही गावात, कुठल्याही घरावर दगड मारला तरी ते घर आमच्या पाहुण्यांचच असणार. आज आहेरामधून वर्षाला आठ-दहा साड्या त्यामुळेच मिळतात. साड्यानी ट्रंक भरून गेली. लक्ष्मीची यात्रा आली म्हणजे घरची लक्ष्मी जाते असे म्हणतात. पण या यात्रेमुळेच बायकांना चार चांगल्या साड्या मिळतात. एक गोष्ट सांगते तुम्हाला, आमच्या गावची लक्ष्मी सत्तावीस वर्षानी भरते आहे. माझे लग्न झाले त्या वर्षी ही यात्रा होती. अद्याप माझे आरतणं-परतणंही नीट झाले नव्हते. लक्ष्मीच्या यात्रेनंतर तीन वर्ष लग्न करता येत नाही अशी प्रथा आहे. म्हणून घाईने माझे लग्न उरकले. लग्नाच्यावेळी माझे नहाणेही आले नव्हते.
तालुक्याच्या पूर्व भागात तूज(तू), माज(मला), त्यासणी(त्यांना), तिण्ण(तिने), त्यणाणी(त्यांनी), ह्यणाणी(यांनी) अशी काही वैशिष्टयपूर्ण सर्वनामाची रूपे दिसतात. तथापि बऱ्याच अंशी पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही विभागात भाषिक प्रयोग भिन्न होत असले तरी; सर्वनामाची रूपे बंहुतांश वेळा जवळजवळ वापरली जाताना दिसतात. वरील उदाहरणांमधील वाक्ये केवळ पश्चिम विभागातील आहेत.
इतर व्याकरणिक विशेष
सर्वनामांबरोबरच चंदगडी बोलीतील इतर व्याकरणिक विशेषोही खास आहेत. हे अभ्यासल्याखेरीज या बोलीचे स्वरूप लक्षात येणार नाही. या बोलीतील विशेषणांचा स्वतंत्र शब्दसंग्रह आहे. उदाहरणार्थ, दांडगा (मोठा), व्हलस (घाणा), बुरसा (घाणेरडा), आंबरसुका (ओलासर), कळकोटा (भांडणे काढणारा), कळखोचरा (भांडणे उकरून काढणारा), काटकोळा (बारीक), धबला (जाडा), हुसभुरक्या (लाजनसलेल्या), व्हळके (होय होय म्हणणारे) अशी विपुल विशेषणे प्रमाण मराठीत दिसत नाहीत. ही केवळ या बोलीत सापडतात. रंगवाचक विशेषणेही अभ्यासनीय आहेत. तांबूस, हिरवट, तांबडाभडक, मातकट, तपकीरी, पिवळाधम्मक अशी ही रंगवाचक विशेषणे आहेत. तर नकाडा (लहान), नकबर (चिमुटभर), हिजडा, देवचार, जोगता, जोगती अशी विशेषणे शिवीसदृश्य आहेत.
या बोलीतील साधित विशेषणेही विशेष आहेत. उदाहरणार्थ, वयल्याअंगास (वरील बाजूस), खायल्याअंगास (खालील बाजूस), भायल्याअंगास (बाहेरच्या बाजूला), मंगलीमळीक (मंगल सारखी), मागल्यामळीक (मागील प्रमाणे), तवंम्हेरेन (तेंव्हापासून) अशा विशेषकांचाही या बोलीसंदर्भात स्वतंत्र विचार करता येतो. तर बुरसा (धाणेरडा), तांबडालाल (खूप गोरा), उजळ (गोरा), कडूईक (कडू), गुळमाट (गोड), धबला (जाड), किरपण (बारीक) अशी गुणविशेषणेही या बोलीत वेगळी आहेत.
विशेषणांसोबत शेवटी क्रियापदांचाही विचार आदर्श क्रियापदांचा विचार काळानुसार करता येतो.
भूतकाळ : पश्चिम विभाग :
‘मायलेंदी मिरगात पाऊसच दांडगा व्हत्ता’ (मागील वर्षी मिरगामध्ये पाऊस खूप होता)
‘तुमची रोपेत चार जोतं आल्ली’ (तुमची रोपलावणी वेळी चार जोते द्याली होती)
पूर्व विभाग :
‘तण्णा नाचो नाचोन सेवटास पाय धरल्यान’ (तो खूप नाचला पण शेवटी पाय धरले)
चंदगडी बोलीत द्वितीयेच्या स, ला, ते या प्रत्ययांमध्ये स, ला, ऐवजी ‘स’ हा एकच प्रत्येय सर्वाधिक वापरला जातो. उदाहरणार्थ, जायला - जाऊस, खायला - खाऊस, सभेला - सभेस इत्यादी. तृतीयेच्या ‘ने’ या प्रत्ययाऐवजी ‘नं’ हा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, त्याने - त्यानं, मनाने - मतानं (त्यो आपल्या मनानं गेलाय) किंवा ‘पायनं लंगडा’ हे वाक्य ‘पायनं लंगडं’ असे बोलले जाते. चतुर्थीच्या ‘ला’ या प्रत्यया ऐवजी ‘स’ हाच प्रत्यय वापरला जातो. उदाहरणार्थ, रूपयाला चार = रूपईस चार अनेकवचनातील ‘शी’ या प्रत्ययाऐवजी ‘बर’ हा प्रत्यय येतो.
उदाहरणार्थ, तो मित्राशी भांडला - त्यो मित्राबर भांडला
तो त्याच्याशी प्रमाणिक आहे - त्यो त्येचेबर ईस्वासान ऱ्हालाय
पंचमीच्या ऊन या प्रत्ययाऐवजी ‘सनं’, ‘परास’ असे प्रत्यय वापरले जातात. उदा० गावाहून - गावासनं, त्याचेहून - त्याचेपरास, माहेराहून - माहेरासनं असे प्रत्यय येतात. तर षष्ठी, सप्तमी या प्रत्ययात विशेष फरक दिसत नाही. परंतु संबोधन ‘नो’ एवजी ‘नु’ या प्रत्ययाचा वापर या बोलीत केला जातो.