हा लेख मालवणी नावाने ओळखली जाणारी बोलीभाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मालवणी.
मालवणीही कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागाची बोली भाषा आहे. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेत बरेच नाट्यप्रयोग केले आहेत. ऐकण्यास मधुर अशी ही भाषा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे.
मालवणी म्हणून ओळखली जाणारी ही बोली मूळ कुडाळी किंवा कुडाळदेशकर भाषा आहे. ह्या कुडाळ पट्ट्यातील मालवणीचा पहिला शब्दकोश शामकांत मोरे यांनी तयार केला आहे. डोंबिवलीतील ‘सुमेरू प्रकाशन’ने या शब्दकोशाची मांडणी केली आहे. व्याकरणाचे संदर्भ शब्दकोशासाठी घेण्यात आले आहेत. या शब्दकोशात ६५० क्रियापदे आहेत. एक मालवणी शब्द, त्याचे पोटअर्थ, त्या शब्दाशी संबंधित अन्य शब्द किंवा तो शब्द असलेल्या म्हणीदेखील या कोशात आहेत. ३५ मालवणी म्हणींचा समावेश आहे. भाषेचे क्षेत्र जिल्हा, प्रांतापुरते मर्यादित असते. त्यामुळे या भाषेला स्थानिक नाव मिळाले. या बोलीच्या शब्दकोशालाही मालवणी शब्दकोश म्हणतात. अन्य प्रांताचे किंवा भाषेचे नाव देण्यात आले असते तर या शब्दकोशासंबंधी संभ्रम निर्माण होण्याची शक्यता होती, असे लेखकाने स्पष्ट केले आहे. दर १२ कोसांवर भाषा बदलते; या उक्तीनुसार कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, आचरे, बांदा परिसरांतील मालवणी रहिवासी यांची बोली थोडी वेगळी आहे.
मालवणीतील म्हणी
मालवणी भाषेत काही सुरेख म्हणी आहेत. खाली काही म्हणी उदाहरणादाखल दिल्या आहेत :-
अंधारात केला पण उजेडात इला
अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो