स्टीव वॉ (जून २, इ.स. १९६५:कॅन्टरबरी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. वॉ अलिकडच्या काळातील अत्यंत यशस्वी कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी धावांचा (५१.०६ च्या सरासरीने १०,९२७ धावा) विक्रम स्टीव्ह वॉच्या नावावर आहे.
स्टीवचा जुळा भाऊ मार्क हाही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.
कारकीर्द
सुरुवातीचे आंतरराष्ट्रीय सामने
वॉने आपली प्रथम श्रेणीची कारकीर्द न्यू साउथ वेल्स संघाकडून इ.स. १९८४-८५ च्या मोसमात केली. त्यावेळी तो नवव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा व मध्यमगती गोलंदाजी करायचा. नऊ प्रथम श्रेणी सामने खेळल्यावर त्याला भारताविरुद्ध इ.स. १९८५-८६ च्या मोसमातील दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली. त्यात त्याने १३ व ५ धावा काढल्या व ३६ धावा देऊन दोन बळी मिळवले. जरी या मालिकेत वॉला यश मिळाले नाही तरी त्याला न्यू झीलँडविरुद्ध अजून एक संधी दिली गेली. त्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ७४ धावा काढल्या व ५६ धावा देऊन ४ बळी मिळवले.
विश्वचषक, १९८७
भारतीय उपखंडात खेळला गेलेलला इ.स. १९८७चा क्रिकेट विश्वचषक म्हणजे वॉच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे वळण होते. स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया जिंकण्याची कोणतीही चिह्ने नव्हती. भारतविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या शेवटी वॉच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाने एका धावाने विजय मिळवला. त्यानंतरच्या न्यू झीलँडविरुद्धच्या सामन्यातील शेवटच्या षटकात न्यू झीलँडला सात धावा हव्या होत्या. वॉने टाकलेल्या या षटकात फक्त तीन धावा गेल्या तर तीन बळी पडले. उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या षटकात त्याने १६ धावा फटकावल्या व ऑस्ट्रेलियाला १८ धावांनी विजय मिळाला. अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्ध ४७व्या व ४९व्या षटकात त्याने ऍलन लॅम्ब व फिलिप डिफ्रेटसचे बळी मिळवले व ऑस्ट्रेलियाला सात धावांनी विश्वविजेतेपद मिळवून दिले. या कामगिरीनंतर त्याला आइसमॅनचे बिरुद मिळाले.