विद्या बाळ

विद्या बाळ
जन्म १२ जानेवारी १९३७
मृत्यू ३० जानेवारी २०२०
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
विषय महिलाहक्क
पती दत्तात्रय बाळ
अपत्ये विनीता, यथोधन आणि अनिकेत

डॉ.विद्या बाळ (जन्म : १२ जानेवारी १९३७; - ३० जानेवारी २०२०) या मराठी लेखिका व संपादक होत्या. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रामधीलभारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.[]

सुरुवातीचे जीवन

लोकमान्य टिळकांचे सहकारी न. चिं. केळकर हे विद्या बाळ यांचे आजोबा होते. त्यामुळे बालपणी केसरीतील विचार, हिंदू महासभा यांचा प्रभाव मनावर पडला. त्यांचे मोठे बंधू व पती हे रा. स्व. संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी १९७४ मध्ये पुणे महानगरपालिका निवडणूक जनसंघातर्फे लढवली त्यात त्या पराभूत झाल्या. १९६० साली वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी पुणे आकाशवाणी केंद्राच्या नोकरीचा राजीनामा देऊन किर्लोस्कर समूहाच्या 'स्त्री' मासिकाचे संपादकपद स्वीकारले. १९८६ पर्यंत त्यांनी यासाठी काम केले. []

कारकीर्द

पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर, सन १९६४ ते १९८३ या काळात 'स्त्री' मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादक म्हणून काम केले. तेथून बाहेर पडल्यावर विद्या बाळ यांनी १९८९ सालच्या ऑगस्टमध्ये 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक होत्या. मासिकात पहिल्या २० वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक ४५ लेखांच्या संग्रहाचे 'स्त्रीमिती’ नावाचे पुस्तक २०१२ साली प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या संपादिका डॉ. नीलिमा गुंडी होत्या. स्त्रियांच्या समस्यांबाबत विद्या बाळ यांना विशेष आस्था आहे. १९८१ साली त्यांनी नारी समता मंच या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ’ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि दोन रूपांतरित अश्या चार कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या लेखणीतून अनेक स्फुट लेख उतरले आहेत.

समाजकार्य

१९८२ साली दोन स्त्रियांचे खून झाले. त्या वेळी विद्या बाळ यांच्या ’नारी समता मंच’ या संघटनेने गावोगावी जाऊन रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचे प्रदर्शन भरवले होते. स्त्रियांना बोलण्यासाठी काही जागा हवी, म्हणून मग विद्या बाळ यांच्या संघटनेने ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांनाही याची गरज होती. त्यातून २००८ साली ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू झाले. बलात्कारित मुलीला बलात्कारानंतर मिळालेला पती, कुटुंब आणि गावचा पाठिंबा हे एक समाजासाठी उदाहरण होते. त्यामुळे संघटनेने संबंधितांचा केलेला सत्कार, रात्रीच्या काळोखात अन्याय-अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रात्रीच हातात टॉर्च घेऊन जनजागृतीसाठी काढलेली ‘प्रकाशफेरी’, सुशिक्षितांमध्येही अन्याय वाढत होते, म्हणून सुशिक्षितांसाठीही पथनाट्य, वाढत्या स्त्रीभ्रूणहत्येविरोधात निदर्शनं-मोर्चा-परिसंवाद, एकट्या स्त्रियांसाठी परिषदा, विवाह परिषदा, ग्रामीण-शहरी स्त्रियांची एकत्र परिषद, युनोने फॅमिली इयर जाहीर केले तेव्हा कौटुंबिक समस्या मांडण्यासाठी कुटुंब नियोजन परिषद, स्त्रियांच्या जागृतीसाठी आत्मसन्मान परिषद, अ‍ॅसिड हल्ल्यांविरोधात जागृतीसाठी ‘दोस्ती जिंदाबाद’, असे अनेक कार्यक्रम विद्या बाळ यांच्या ’नारी समता मंच’ने केले. याशिवाय, ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय’, ‘सखी साऱ्याजणी मंडळ’, ‘साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ’, ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या गोष्टींद्वारे विद्या बाळ यांच्या संस्था लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करीत असत. महिला मंडळांना सामील करून घेण्यासाठी ‘सखी साऱ्याजणी’च्या आज गावोगावी शाखा आहेत.

संस्था व केंद्रे

विद्या बाळ यांच्या मार्गदशनाखाली, पुण्यात खालील संस्था व केंद्रे स्थापन झाली. ह्या संस्था चालविण्यामध्ये विद्या बाळ यांचा सक्रिय सहभाग होता.

प्रकाशित साहित्य

कादंबरी

  • तेजस्विनी
  • वाळवंटातील वाट

अनुवादित कांदबरी

  • जीवन हे असं आहे
  • रात्र अर्ध्या चंचाची

चरित्र

  • कमलाकी (डॉ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र)

स्फुट लेखांचे संकलन

  • अपराजितांचे निःश्वास (संपादित)
  • कथा गौरीची (सहलेखिका - गीताली वि.मं. आणि वंदना भागवत)
  • डॉटर्स ऑफ महाराष्ट्र
  • तुमच्या माझ्यासाठी
  • मिळवतीची पोतडी (संपादित, सहसंपादिका मेधा राजहंस))
  • शोध स्वतःचा
  • संवाद
  • साकव

विद्या बाळ यांच्या विषयीची पुस्तके

  • विद्याताई आणि.....(अंजली मुळे आणि आशा साठे)

पुरस्कार

  • आगरकर पत्रकारिता पुरस्कार
  • कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार
  • शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार
  • सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’
  • स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता यांबद्दल फाय फाऊंडेशनचा पुरस्कार.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन | eSakal". www.esakal.com. 2020-01-30 रोजी पाहिले.
  2. ^ "विद्या बाळ यांचा संघर्षमय प्रवास त्यांच्याच शब्दात". Loksatta. 2020-01-30 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!