बहिणाबाई पाठक (संत)

बहिणाबाई पाठक (शिऊरकर)
जन्म अंदाजे इ.स. १६२८
देवगावी
मृत्यू अंदाजे इ.स. १७००
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू
जोडीदार रत्नाकर ऊर्फ गंगाधर पाठक
वडील आउजी कुलकर्णी
आई जानकी कुलकर्णी


संत बहिणाबाई (इ.स. १६२८ (शके १५५१) - २ऑक्टोबर, १७००) या एक वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या होत्या. त्यांचे माहेरचे आडनाव कुलकर्णी होते . बालपणापासून परमार्थाकडे ओढा असणाऱ्या बहिणाबाईंनी पती व माहेरच्या माणसांसोबत अनेक तीर्थयात्रा केल्या. एकदा वडगावकरांच्या कीर्तनात तुकारामांचे अभंग ऐकून त्या तुकामय झाल्या. स्वप्नात तुकारामांनी त्यांना दृष्टान्त दिला. पुढे प्रत्यक्ष तुकारामांचे त्यांना दर्शन झाल्यावर त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. तथापि एका ब्राम्हण स्त्रीने तुकारामांचे शिष्य व्हावे ही गोष्ट सनातन्यांना पटणारी नव्हती. मंबाजीने तर त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी आपली तुकाभक्ती सोडली नाही. बहिणा आपल्या गुरूंचा उल्लेख पदोपदी आपल्या अभंगात करीत. बहिणा म्हणते 'तुका सद्गुरू सदोहर l भेटतो अपार सुख होव ll तुकारामा भेटला धन्य जिने माझे कृत्यकृत्य झाले सहजाचि '

जीवन

बहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, कन्नड तालुक्‍यातील वेळगंगा नदीच्या काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्‍ये झाला. तिच्‍या आईचे नांव जानकी व पित्‍याचे नांव आऊजी. माता-पित्‍यानी तिचा विवाह वयाच्‍या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या ३० वर्षाच्या रत्नाकर पाठक नावाच्या बिजवरांशी. त्यांना आधीची दोन मुले होती.

संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्‍ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे. पुढे कोल्‍हापूरच्या वास्‍तव्‍यात जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाचा संत बहिणाबाईच्‍या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकारामाचे अभंग म्‍हणू लागली व तिने तुकारामाच्या दर्शनाचा ध्‍यास घेतला. तिला तुकोबारायांना सदगुरू करून त्‍यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्‍यावयाचा होता. म्‍हणून रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत ती त्‍यांचे ध्‍यान करू लागली. भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी स्‍वप्‍नात येऊन तिला साक्षात दर्शन व गुरुपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरूबोधामुळे बदलून गेले. तिने आपले गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत, त्यामुळे या अभंगांना विशेष महत्त्व आहे. त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते संतकवी दासगणू महाराज लिहितात, "पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर ...". त्यांच्या अभंगांंपैकी 'संत कृपा झाली। इमारत फळा आली ॥' हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि 'घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥' हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधिस्थ झाल्या. या साध्वीची समाधी शिऊर या गावी आहे.[]

अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून ७३२ कविता त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या या कविता भक्तिभावाचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. वेदान्ताचे प्रतिपादनही त्यात आढळते. त्यांच्या अभंगांतून तुकारामांच्या चारित्र्याचे अस्सल दर्शन घडते. बहिणाबाईंनी आपल्या अभंगातून 'ब्राम्हण कोण' हा विषय उपस्थित करून ब्राम्हण आणि ब्राम्हणी सनातनी वृत्तीवर स्वतः ब्राम्हण असून त्या काळात सडेतोड टीका केली. त्यांचे अभंग १७व्या शतकातील, पण ते प्रसिद्ध झाले विसाव्या शतकात. त्यांची काव्यशैली साधी सरळ आणि हृदयस्पर्शी आहे.

चमत्कार

असे सांगतात की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते. तेरावा जन्म स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईंचा होय. संत बहिणाबाईनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले.

या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा : नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला. परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ, की त्यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, "ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन." ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या. त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिंव भरल्यासारखे थडथड हालत होते.

एका दिवशी बहिणाबाई रामाच्या मंदिरात पूजा करत होत्या त्यावेळेस रामदास स्वामींनी बहिणाबाईंना दिलेल्या हनुमानाच्या मूर्तीने तोंड उघडले व बहिणाबाईंच्या हाताने तीर्थ पिले सध्या ती मूर्ती शिऊर गावातील त्यांचा निवासस्थानी मंदिरात सुखरूप आहे.

रचना

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच आहे.

संपूर्ण अभंग असा -
संत कृपा झाली। इमारत फळा आली।
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।
नामा तयाचा किंकर। तेणे विस्तरिले आवार।
जनी जनार्दन एकनाथ। स्तंभ दिला भागवत।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।
बहिणा फडकती ध्वजा। तेणे रूप केले ओजा॥

संदर्भ

  1. ^ कर्वे, स्वाती (२०१२). १०१ कर्तृत्त्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २४. ISBN 978-81-7425-310-1.

बाह्य दुवे

  1. [१] विदागारातील आवृत्ती
  2. [२] Archived 2012-06-07 at the Wayback Machine.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!