पुंडलिक


पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त होता. प्रचलित आख्यायिकांनुसार पुंडलिक पंढरपुरात स्वतःच्या आईवडिलांची सेवा करीत असताना अचानक तेथे विठ्ठल(पांडुरंग) आला. त्याच्यासाठी पुंडलिकाने पुढे केलेल्या विटेवर तो कंबरेवर हात ठेवून उभा राहिला. पंढरपूरच्या देवळात मूर्तिरूपाने विठ्ठल अजूनही तसाच उभा आहे, असे मानले जाते. स्कंद-पुराणानुसार भक्त पुंडलिकाने मागितलेला वर खालीलप्रमाणे आहे.

इति स्तुत्वा ततो देवं प्राह गद्गदया गिरा ।
अनेनैव स्वरूपेण त्वया स्थेयं ममान्तिके ॥
ज्ञानविज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि ।
दर्शनान्ते भवेन्मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः ॥
– स्कन्दपुराण

प्रचलित माहिती

बहुतांश इतिहासकारांच्या मते पुंडलिक हे महाभारतकालीन संत असावेत. उत्तर सातवाहनकालामध्ये सातवाहनांनी विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. पुंडलिक महाराज हे त्याही वेळेस एक प्राचीन ऐतिहासिक संत मानले जात यावरून ते महाभारतकालीन असावेत अशी धारणा आहे. विठ्ठल मंदिर हे अतिप्राचीन आहे व उत्तरोत्तर त्याचा अनेक राजांनी जीर्णोद्धार केला. काही इतिहासकारांच्या व अभ्यासकांच्या मते, विठ्ठल अवतार हा श्रीकृष्ण अवतारातीलच एक प्रसंग आहे. एकदा रुक्मिणी रुसून द्वारकेहून दिंडीरवनात येऊन बसली तेव्हा श्रीकृष्ण तिला भेटायला व द्वारकेस परत घेऊन जाण्यास आले. तेव्हा त्यांची भेट पुंडलिकास झाली असे वर्णन श्रीहरीविजयात आहे. यावरून द्वापारयुगात महाभारतकालात ई.स.पुर्व 3102 पूर्वीच श्री पुंडलिक महाराज झाले असावेत असे काही लोक पूर्वी म्हणत. काही पुराणात असेही वर्णन आहे की श्रीहरी पुंडलिकाची भेट घेऊन रुक्मिणीसह परत द्वारकेस निघाले तेव्हा श्री ब्रम्हदेवाने कटेवर कर असलेल्या श्रीकृष्णाचे व रुक्मिणीचे विग्रह (मूर्ती) तयार करून पुंडलिकास दिले.

इतिहासकारांच्या एका मते शालिवाहन राजांच्या म्हणजे सातवाहन राजाच्या काळात इ.स.100 ते इ.स 200 मध्ये सातवाहन राजाने दिंडीरवनाचे नाव बदलून पंढरपूर केले व त्यांचा प्रधान रामचंद्र सदाशिव सोनार ह्याने मंदिराचा जीर्णोद्धार केला. पंढरपूर हे नाव करण्यात येण्याचे कारण ही तेच की पुंडलिक महाराज हे सातवाहन काळात एक प्राचीन ऐतिहासिक संत म्हणून गणले जात. म्हणजे भक्तराज पुंडलिक याही पूर्वी झाले असावेत. बऱ्याच अभ्यासकांच्या मते श्री भक्तराज पुंडलिक महाराज हे महाभारतकालीन संत होते हे सिद्ध होते. ते खालील कथेप्रमाणे, महाभारत काळात एकदा श्रीकृष्णाला द्वारकेस भेटायला राधा आली आणि ती थेट श्रीकृष्णाच्या मांडीवर बसली. हे रुक्मिणीने पाहिले व रुक्मिणीस श्रीकृष्णाचा राग आला. ती रुसून दिंडीरवन म्हणजे सध्याचे पंढरपूर येथे येऊन बसली. मग रुक्मिणीस द्वारकेस परत घेऊन जाण्यासाठी श्रीकृष्ण दिंडीरवनात आला व त्याने रुक्मिणीस भेटून तिची समजूत काढून तिला द्वारकेस घेऊन निघाला, पण त्याला दिंडीरवनात मातृ-पितृ-भक्त पुंडलिकाचे घर दिसले, मग तो पुंडलिकाच्या घरी आला. त्याला बोलावले त्यावेळेस रुक्मिणी बाहेरच थांबली. पुंडलिकाने श्रीकृष्णास पाहिले व एक वीट श्रीकृष्णांकडे टाकली. कृष्णास सांगितले की ह्या विटेवर थांब, माझ्या आईवडिलांना झोप लागली की येतो. मग थोड्या वेळात तो श्रीकृष्णास भेटला मग पुंडलिकाचे आईवडील ही भेटले. मग पुंडलिकाने श्रीकृष्णाकडे वरदान मागितले की देवा आपण इथेच दिंडीरवनात भक्तांसाठी कायम निवास करावा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "आता लवकरच कलियुग सुरू होईल पण तत्पूर्वीच मला हा श्रीकृष्णावतार समाप्त करावा लागेल. पण माझा अवतार समाप्त झाल्यावर मी व रुक्मिणी तसेच राधा, सत्यभामेसह गुप्तपणे मूर्तीरूपाने इथे निवास करू आणि भक्तांना दर्शन देत राहू." असे सांगून रुक्मिणीस ही सर्वाना भेटवले. सर्वांनी रुक्मिणीचीही भेट घेतली व सर्वांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण व रुक्मिणी द्वारकेस परत निघाली, तेव्हा परत निघताना ब्रम्हदेवास बोलावून विटेवर उभ्या असलेल्या श्रीकृष्ण-रूक्मीणीच्या मूर्ती(विग्रह) तयार करवून पुंडलिकास भेट दिल्या. नंतर, स्वतः रुक्मिणीसह द्वारकेस परत गेला. त्याच ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती पंढरपुरात राहिल्या. नंतर (अंदाजे) इ. स. पूर्व 3112 मध्ये कृष्णावतार समाप्त झाल्यावर जेव्हा श्रीकृष्णाच्या भक्तांना खास करून पुंडलिकास हे समजले, की आता श्रीकृष्णावतार समाप्त झाला आहे, तेव्हा तो खूप रडला. तेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीतून आवाज आला, की का रडतोस मी जरी श्रीकृष्णावतार शरीररूपाने संपवला असला तरी माझ्या सर्व मूर्तीत व सर्व विश्वात,सर्व चराचरात मी व्यापून आहे. भक्तांना हवे तेव्हा मी या मूर्तीतून दर्शन देऊ शकतो. मग पुंडलिकास ज्ञान प्राप्त झाले तेव्हापासून तो पुंडलिक मुनी झाला. श्रीकृष्णावतार समाप्तीमुळे दुःखी झालेले भक्त विठ्ठलमूर्तीच्या दर्शनास येत तेव्हाच भगवंत त्यास प्रत्यक्ष दर्शन देत असत बोलत असत. पुढे कलियुग सुरू झाले आहे हे समजल्यावर नंतर पुंडलिक मुनींनी माघ शुद्ध दशमी दिवशी चंद्रभागा नदीकाठी संजीवन समाधी घेतली असावी असा काहींचा अंदाज आहे. आता तेथे पुंडलिक महाराजांचे मंदिर आहे. कृष्णावतार समाप्तीनंतर आणि पुंडलिक महाराज यांच्याही अवतार समाप्तीनंतरच्या काळापासून ते अगदी पंधराव्या ,सोळाव्या शतकापर्यंत दर्शनास येणाऱ्या भक्तास, पुजाऱ्यासोबत विठ्ठलमूर्ती बोलत असे ,अशा अनेक आख्यायिका आहेत व त्याचे ऐतिहासिक पुरावे ही आहेत. भगवान श्रीकृष्णांनी इ.स.पू. 3112 च्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे माघ महिन्यात अवतार समाप्ती केली व त्यानंतर दहा वर्षांनी पांडव आणि द्रौपदी हेसुद्धा स्वर्गवासी झाले. म्हणजे इ.स.पुर्व 3102 मध्येच कलियुग सुरू झाले व लोक विठ्ठल दर्शनास पंढरीस येऊ लागले, तसेच ते पुंडलिक महाराजांच्या समाधीचे ही दर्शन घेत. काहीना तर नवस बोलून सकारात्मक प्रत्ययही आला, त्यामुळे पुंडलिक महाराजांचे महती वाढली आणि दिंडीरवनास पुंडलिकपूर म्हणू लागले, त्याचेच नाव पांडुरंगपूर झाले. तिथली मृत्तिका ही पांढरीशुभ्र असल्याने तिला पांढरीपूर ही म्हणू लागले आणि हेच पुढे पंढरपूर झाले.

भक्त पुंडलिकावरील पुस्तके, चित्रपट, नाटके


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!