भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - डिसेंबर ७, १९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. आजोळ गाव देवास होते. देवासला भा. रा. तांबे यांच्या कवितेची जन्मभूमी असल्याचाही मान आहे.
त्यांच्या काही प्रसिद्ध कविता:
- अजुनि लागलेचि दार
- कशी काळ नागिणी
- कळा ज्या लागल्या जीवा
- कुणि कोडे माझे उकलिल का
- घट तिचा रिकामा
- घन तमीं शुक्र बघ
- चरणि तुझिया मज देई
- जन पळभर म्हणतील हाय हाय
- डोळे हे जुलमि गडे
- तिनी सांजा सखे मिळाल्या
- तुझ्या गळा माझ्या गळा
- ते दूध तुझ्या त्या
- नववधू प्रिया मी बावरतें
- निजल्या तान्ह्यावरी माउली
- पिवळे तांबुस ऊन कोवळे
- भाग्य उजळले तुझे
- मधु मागशी माझ्या
- मावळत्या दिनकरा
- या बाळांनो या रे या
- रे हिंदबांधवा थांब
भा. रा. तांबे यांच्या विषयीची पुस्तके
- कविवर्य भा. रा. तांबे - एक चिकित्सक अभ्यास (डाॅ. सौ. आशा सावदेकर)
- निवडक भा. रा. तांबे (वामन देशपांडे)
- तांबे : एक अययन (रा.अ. काळेले)
- मराठीतील काव्यरंग [एक समीक्षात्मक अध्ययन]- प्रकाशन वर्ष २०२१[ लेखक-श्रीनिवास हवालदार [कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ] मराठी साहित्यातील १४ प्रसिद्ध कवी आणि कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितांच्या विश्लेषणात्मक अध्ययनात राजकवी भा.रा.तांबे यांच्या कविताही समाविष्ट आहेत.
पुरस्कार
कवी भा.रा. तांबे यांच्या नावाने उत्तमोत्तम पुस्तकांना अनेकजणांनी पुरस्कार ठेवले आहेत; त्यांपैकी काही पुरस्कार हे :-
- मध्य प्रदेश सरकारच्या मराठी साहित्य अकादमीचा भास्कर रामचंद्र पुरस्कार (१) श्रीनिवास हवालदार यांना ' ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे' या पुस्तकाबद्दल, (२) म.द. वैद्य यांना 'माझा चिकित्सा प्रवास' या पुस्तकाबद्दल. (४ जुलै २०१८)
- उस्मानाबादचे ज्येष्ठ कवी आणि चित्रकार राजेंद्र अत्रे यांना, त्यांच्या वाङमय क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल 'कविवर्य भा. रा. तांबे' हा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विशेष ग्रंथकार पुरस्कार. (२६ मे २०१८)
- मीरा सिरसमकर यांना 'खूप मजा करू' या बालकवितासंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा भा.रा, तांबे पुरस्कार (इ.स. २००६)
- डाॅ. संगीता बर्वे यांच्या कवितासंग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार मिळाला आहे.(इ.स. २००८-०९)
- केशव वसेकर बा. यांना 'हिरवा ऋतू' या बालकवितासंग्रहाबद्दल महाराष्ट्र सरकारचा भा. रा. तांबे पुरस्कार (२००९-१०)
- फ.मुं. शिंदे यांना 'मसाप'चा भा.रा. तांबे पुरस्कार (वर्ष?)
- आबा गोविंद महाजन यांना 'मसाप'चा भा.रा. तांबे पुरस्कार (२००७-०८)
- सायमन मार्टिन यांना 'मसाप'चा भा.रा. तांबे पुरस्कार (२०१६-१७)
संदर्भ आणि नोंदी