चिंतामण रघुनाथ व्यास (नोव्हेंबर ९, इ.स. १९२४ - जानेवारी १०, इ.स. २००२) ऊर्फ सी. आर. व्यास हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते आग्रा घराण्याचे गायक होते व ख्याल गायनासाठी प्रसिद्ध होते.
पूर्वायुष्य
सी. आर. व्यासांचा जन्म महाराष्ट्र राज्यात उस्मानाबाद जिल्ह्यात एका लहानशा खेड्यात एका संस्कृत विद्वानांच्या व हरी कीर्तनकारांच्या कुटुंबात झाला. आपल्या वडिलांच्या व आजोबांच्या गायनाचा, रामायण व महाभारतातील आख्यानांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.
त्यांनी सुरुवातीचे सांगीतिक शिक्षण किराणा घराण्याचे गोविंदराव भातंब्रेकर यांच्याकडे जवळ जवळ बारा वर्षे घेतले.
वयाच्या २१ व्या वर्षी व्यासांनी मुंबई गाठली व माटुंग्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करू लागले. ह्याच दरम्यान ते ग्वाल्हेर घराण्याच्या राजारामबुवा पराडकरांकडे संगीत शिकू लागले. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेत असताना त्यांनी आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांचे गाणे ऐकले व त्यामुळे प्रभावित होऊन ते जगन्नाथबुवांकडे संगीताभ्यास करू लागले. त्यांना यशवंत सदाशिव मिराशी यांचेही मार्गदर्शन लाभले. तसेच श्रीकृष्ण नारायण रातंजनकर, कृष्ण गुंडोपंत गिंडे, चिदानंद नगरकर, एस. सी. आर. भट यांच्यासारख्या विद्वानांचे मार्गदर्शनही त्यांना वेळोवेळी मिळत राहिले.
सांगीतिक कारकीर्द
व्यासांचा खुला, मोकळा आवाज व तिन्ही घराण्यांच्या गायकीचा मेळ, यांमुळे त्यांची गायनशैली वैशिष्ट्यपूर्ण होती. तरीही त्यांच्या गायकीवर ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव सर्वाधिक दिसून येतो. आकाशवाणी व दूरदर्शनवरचे ते आघाडीचे कलावंत होते. आयटीसी संगीत संशोधन अकादमी, भारतीय विद्या भवन येथेही त्यांनी नोकरी केली.
भारतात व विदेशांत अनेक संगीत महोत्सवांत त्यांनी आपले गाणे सादर केले.
पंडित सी.आर. व्यास यांनी अनेक नवीन राग बांधले व बंदिशी रचल्या. त्यांनी शिव-अभोगी, शुद्ध रंजनी, संजोगिया, धनकोनी-कल्याण व इतर अनेक नव्या रागांची रचना केली व आपल्या कार्यक्रमांतून त्या लोकप्रियही केल्या. व्यासांनी 'गुणीजन' ह्या उपनामाने २०० पेक्षा जास्त बंदिशी रचल्या.
आपले गुरू गुणिदास (पं. जगन्नाथबुवा पुरोहित) यांच्या सन्मानार्थ सी. आर. व्यास यांनी इ.स. १९७७ मध्ये गुणिदास संगीत संमेलनाची सुरुवात केली. व्यासांनी बंदिशींचा संग्रह असलेले 'राग सरिता' हे पुस्तक लिहिले असून त्यावरून त्यांच्या संगीत क्षेत्रातील उदंड कार्याचा अंदाज बांधता येतो.
शिष्य
त्यांच्या शिष्यांमध्ये प्रभाकर कारेकर, कुंदा वेलिंग, संजीव चिम्मलगी, गणपती भट, अलका जोगळेकर व सुपुत्र सुहास व्यास यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
पुरस्कार व सन्मान
- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, इ.स. १९९९
- उस्ताद हफिज अली खान सन्मान, इ.स. १९९४
- महाराष्ट्र गौरव पुरस्कार, इ.स. १९९०
ध्वनिमुद्रिकांची यादी
- इटर्नल ऱ्हॅपसडी
- एच्ड इन टाइम (Etched in Time)
- तपस्या - भाग १ व २ (इ.स. २००५)
- लाइव्ह रेकॉर्डिंग इन मुंबई
- संगीत सरताज
बाह्य दुवे
|
---|
घराणी | |
---|
राग | |
---|
ताल | |
---|
वाद्ये | अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये | |
---|
|
---|