स्थापनेपासून सुमारे ७० वर्षे ही कंपनी फ्रांसची ध्वजवाहक विमानसेवा होती. २००३मध्ये नेदरलॅंड्सच्याकेएलएम आणि एर फ्रांसचे एकत्रीकरण झाले.
एप्रिल २००१ ते मार्च २००२ दरम्यान एर फ्रांसने ४ कोटी ३३ लाख प्रवाशांची ने-आण केली. यावर्षी कंपनीची उलाढाल १२.५३ अब्ज युरो इतकी होती. हा आकडा जगातील सगळ्यात मोठा होता. नोव्हेंबर २००४मध्ये युरोपमधील एकूण विमानप्रवाशांपैकी २५%नी एर फ्रांस किंवा त्याच्या उपकंपनीद्वारे प्रवास केला होता.
सध्या एर फ्रांस आखूड पल्ल्याच्या मार्गांवर एरबस ए३२१, ए३२० आणि ए३१९ प्रकारची विमाने वापरते. लांब पल्ल्याच्या मार्गांवर एरबस आणि बोईंग कंपन्यांच्या विमानांचा वापर केला जातो.
हॉप! ही एर फ्रांसची उपकंपनी युरोपातील अनेक मार्गांवर सेवा पुरवते तर जून ही उपकंपनी युरोप तसेच आंतरखंडीय मार्गांवर किफायती विमानसेवा पुरवते.
महायुद्ध संपल्यावर २६ जून, १९४५ रोजी फ्रेंच सरकारने फ्रांसमधील सगळ्या विमानवाहतूक कंपन्यांचे राष्ट्रीयकरण केले.[३] सहा महिन्यांनी २९ डिसेंबर रोजी सरकारच्या हुकुमानुसार फ्रांसमधील सगळी विमानवाहतूक एर फ्रांसच्या अखत्यारीत आली.[४]१ जानेवारी, १९४६ रोजी सोसियेते नॅशनाले एर फ्रांस या कंपनीची अधिकृत स्थापना झाली. याच वर्षी कंपनीने पॅरिसच्यालेझांव्हालीद परिसरात आपले पहिले टर्मिनल सुरू केले. येथून पॅरिस-ल बूर्जे विमानतळाला बसमधून प्रवाशांची ने-आण होत असे. या सुमारास एर फ्रांसच्या विमानमार्गांचे जाळे १,६०,००० किमीचे असून जगातील सर्वाधिक लांबीचे होते.[५]
एर फ्रांसची युरोपांतर्गत उड्डाणे सुरुवातीस डग्लस डीसी-३ प्रकारच्या विमानांद्वारे होत असत. १ जुलै, १९४६ रोजी एर फ्रांसने पॅरिस ते न्यू यॉर्क थेट विमानसेवा सुरू केली. या मार्गावरील डीसी-४ विमाने आयर्लंडमधीलशॅनन आणि कॅनडामथीलगॅंडर विमानतळांवर इंधन भरण्याकरता थांबत असत व पॅरिस-न्यू यॉर्क पल्ला २० तासांत पार करीत.[५] १९४७ च्या शेवटी एर फ्रांसच्या मार्गांचे जाळे पूर्वेस शांघाय, पश्चिमेस न्यू यॉर्क व फोर्ट दे फ्रांस आणि दक्षिणेस बॉयनोस एर्सपर्यंत पसरलेले होते.
१९४८ च्या सुमारास एर फ्रांसचा १३० विमानांचा ताफा जगातील विमानवाहतूक कंपन्यांपैकी सगळ्यात मोठा होता.[५] यातील लॉकहीड कॉन्स्टेलेशन प्रकारची विमाने १९६५ पर्यंत प्रवासी आणि मालवाहतूक सेवेत वापरली गेली.[६]
१६ जून, १९४८ रोजी फ्रांसच्या संसदेच्या कायद्यानुसार कोम्पनी नॅस्योनाल एर फ्रांसची स्थापना झाली. त्यावेळी यात सरकारचा ७०% वाटा होता. नंतरच्या काळात हा वाटा १००% पर्यंत गेला. २००२ च्या सुमारास फ्रेंच सरकारकडे एर फ्रांसचा ५४% वाटा होता.[५][७]
४ ऑगस्ट, १९४८ रोजी मॅक्स इमॉंसची एर फ्रांसच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत इमॉंसने जेट विमानांस आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनेक योजना राबवल्या. १९४९मध्ये एर फ्रांसने इतर कंपन्यांसह सिटा या विमानवाहतूकीतील संपर्कसाधने बनविणाऱ्या कंपनीची स्थापना केली.[५]
जेट युगातील पुनर्रचना
१९५२मध्ये एर फ्रांसच्या मार्गांचे जाळे २,५०,०० किमी इतके झाले होते.[५] याच सुमारास कंपनीने आपला कारभार पॅरिस-ओर्लि विमानतळावर हलविला. १९५३मध्ये डि हॅविललॅंड कॉमेट हे पहिले प्रवासी जेट विमान एर फ्रांसच्या ताफ्यात दाखल झाले. १९५० च्या दशकात व्हिकर्स व्हायकाउंट प्रकारची टर्बोप्रॉप विमाने युरोपीय मार्गांवर लावली गेली होती.
२३ फेब्रुवारी, १९६० रोजी फ्रेंच सरकारने एर फ्रांसचे अंतर्देशीय मार्ग एर इंटर या कंपनीला देउन टाकले. याचा मोबदला म्हणून एर इंटरच्या मालकीचा काही हिस्सा एर फ्रांसला देण्यात आला. पुढच्याच दिवशी एर फ्रांसचे आफ्रिकेतील काही मार्गांवर एर आफ्रिक आणि युएटीलाही विमाने पाठविण्याची मुभा दिली गेली.[५][७]
१९६०मध्ये सुड कॅराव्हेल आणि बोईंग ७०७ विमाने ताफ्यात दाखल झाल्यावर प्रवासाचा वेळ अर्धा झाला व प्रवाशांचा आराम वाढला.[५] नंतरच्या काळात एर फ्रांस बोईंग ७४७ विमानाचा वापर करणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांतील एक होती. कालांतराने एर फ्रांसकडे ७४७चा जगातील सगळ्यात मोठा ताफा होता.
२१ जानेवारी, १९७६ रोजी एर फ्रांसने पॅरिस ते रियो दि जानेरो (डकार मार्गे) या मार्गावर एफ-बीव्हीएफए या क्रमांकाच्या कॉंकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली. २४ मे रोजी पॅरिस-वॉशिंग्टन डी.सी. मार्गावरही ही सेवा सुरू झाली तर २२ नोव्हेंबर, १९७७ रोजी पॅरिस-न्यू यॉर्क सेवा सुरू करण्यात आली. हे विमान पॅरिस-न्यू यॉर्क अंतर ३ तास २२ मिनिटांत पार करीत असे. या काळात विमानाची गती आवाजाच्या गतीच्या दुप्पट इतकी होत असे. अमेरिकेत कॉंकोर्ड विमानाविरुद्ध ध्वनीप्रदूषणाचे कारण सांगून निदर्शने झाली व त्यामुळे कॉंकोर्डला तेथे जाण्यास काही काळ परवानगी नव्हती. कालांतराने पॅरिस-वॉशिंग्टन डी.सी. सेवा मेक्सिको सिटीपर्यंत वाढविण्यात आली. एर फ्रांस ही ब्रिटिश एरवेझ सह स्वनातीत प्रवासी सेवा पुरविणारी दोनपैकी एक कंपनी आहे. ही सेवा मे २००३ पर्यंत सुरू होती.[१०]
कंपनीच्या सुवर्णमहोत्सवाच्या सुमारास १९८३मध्ये एर फ्रांसकडे ३३ बोईंग ७४७ आणि अनेक कॉंकोर्ड विमानांसह १०० विमानांचा ताफा होता. सुमारे ३४,००० कर्मचारी आणि ६,३४,०० किमी पल्ल्याच्या मार्गांसह एर फ्रांस तेव्हा ७३ देशांतील १५० शहरांना विमानसेवा पुरवीत असे. त्यावेळी ही कंपनी जगातील चौथ्या क्रमांकाची प्रवासी विमानकंपनी आणि दुसऱ्या क्रमांकाची मालवाहतूक करणारी विमानकंपनी होती.[५] या काळात एर फ्रांसने फ्रांसमधील अनेक प्रादेशिक विमानकंपन्यांशी कोडशेर[मराठी शब्द सुचवा] करार केलेले होते.[११] १९८३मध्ये एर फ्रांस दक्षिण कोरियाला प्रवासी विमानसेवा देणारी पहिली युरोपीय विमानकंपनी झाली.[१२]
१९८६मध्ये फ्रेंच सरकारने एका विमानमार्गावर एकच फ्रेंच विमानकंपनी हा नियम काढून टाकला. यामुळे एर फ्रांसच्या अनेक फायदेशीर मार्गांवरील एकाधिकार धोक्यात आला. युटीएने ही संधी साधून अशा मार्गांवर एर फ्रांसवर चढाओढ सुरू केली.[१३][१४][१५] यासाठी युटीएने फ्रेंच सरकारकडे अनेक प्रकारे प्रचार व रदबदली केली होती. युटीएने पॅरिस-सान फ्रांसिस्को मार्गावर सर्वप्रथम एर फ्रांसशी स्पर्धा सुरू केली. एर फ्रांसने आपली पॅरिस-सान फ्रांसिस्को सेवा ताहितीमधील पपीतेला वाढवून उत्तर दिले. या व इतर अशा मार्गांवरील वाढती स्पर्धा पाहून एर फ्रांसचा पारा चढला.[१६]
१९८७मध्ये एर फ्रांस, लुफ्तांसा, इबेरिया आणि एसएएस ने मिळून आमाद्युस या कंपनीची स्थापना केली. आमाद्युस ही विमानाच्या तिकिटांचे संगणकीकृत आरक्षण करण्याची सुविधा देणारी पहिली कंपनी होती. याद्वारे या चारच नव्हे तर इतर कोणत्याही विमानकंपनीची तिकिटे प्रवाससेवा पुरविणाऱ्या हस्तकांना एकाच ठिकाणी काढता येऊ लागली.[१७]
१२ जानेवारी, १९९० रोजी फ्रेंच सरकारच्या मालकीची एर फ्रांस, खाजगी मालकीची युटीए आणि अर्ध-सार्वजनिक मालकीची एर इंटर या तीन कंपन्यांचे एर फ्रांस नावाखाली एकत्रीकरण झाले. फ्रेंच सरकारच्या फ्रांसमध्ये एक मोठी राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी निर्माण करण्याच्या योजनेचा हा एक भाग होता. युरोपीय संघातील विमानवाहतूकीची प्रगती पाहून अनेक छोट्या कंपन्याऐवजी एकच मोठी कंपनी अधिक टिकाव धरू शकेल असा या मागचा विचार होता.[१९]
२५ जुलै, १९९४ रोजी फ्रेंच सरकारच्या हुकुमाद्वारे ग्रुप एर फ्रांस या कंपनीची स्थापना झाली. १ सप्टेंबर पर्यंत या कंपनीने एर फ्रांस आणि एर इंटरचे मालकीहक्क विकत घेतले. स्टीवन वूल्फ या युनायटेड एरलाइन्सच्या अधिकाऱ्याला एर फ्रांसच्या चेरमन क्रिस्चियन ब्लांकचा सल्लागार म्हणून नेमण्यात आले. वूल्फने चार्ल्स दि गॉल विमानतळावर हब अँड स्पोक[मराठी शब्द सुचवा] तंत्र राबविले.[२०]
१९९९मध्ये लायोनेल जॉस्पिनच्या सरकारने एर फ्रांसचे अंशतः खाजगीकरण करण्याचे ठरविले. या कंपनीच्या समभागांची पॅरिस शेर बाजारावर नोंदणी झाली. जून १९९९मध्ये एर फ्रांस आणि डेल्टा एर लाइन्सनी एकमेकांशी वाहतूककरार केला. याचेच पर्यवसान पुढे २२ जून, २००० रोजी स्कायटीम मध्ये झाले.[५][२१] मार्च २००४ च्या सुमारास एर फ्रांसमध्ये ७१,६५४ कर्मचारी होते.[२२] तर २००७मध्ये हा आकडा १,०२,४२२ होता.[२१]
२९ मार्च, २००८ रोजी अमेरिका आणि युरोपीय संघामधीलखुले आकाश करार अंमलात आल्याने लंडन-हीथ्रो सह युरोपमधील अनेक विमानतळ दोन्ही बाजूच्या विमानकंपन्यांसाठी खुला झाला. याचा फायदा घेण्यासाठी डेल्टा एर लाइन्स आणि एर फ्रांसने एकमेकांच्या उड्डाणांवर विकलेल्या तिकिटांमधील नफा वाटून घेण्याचा करार केला. या दोन्ही कंपन्यांना मिळू पाहणाऱ्या लंडन-अमेरिका रोजच्या नऊ उड्डाणांवर हा करार सुरुवातीस लागू होता. कालांतराने स्कायटीमच्या इतर दोन सदस्यांना यात भागीदार करून घेतले जाणार होते.[२३][२४] याआधी एर फ्रांसने लंडन-सिटी विमानतळापासून युरोपातील अनेक शहरांना सिटीजेट नावाखाली अनेक उड्डाणे सुरू केली होती.[२३] लंडन-लॉस एंजेलस सेवेला अपेक्षित इतका प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा नोव्हेंबर २००८मध्ये बंद करण्यात आली.[२५]
२०१० चे दशक
इतर विमानकंपन्यांची स्पर्धा, कर्मचाऱ्यांचा वाढता बोजा व इतर कारणांमुळे एर फ्रांस २०१० च्या दशकात मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत आहे. यातील काही वर्षे या कंपनीला दरवर्षी ७० कोटी युरोचे नुकसान झाले. आखूड पल्ल्याच्या मार्गांवर हे नुकसान अधिक आहे. २०११ च्या ताळेबंद अहवालानुसार लांब पल्ल्याचे मार्ग हे नुकसान भरून काढत नाहीत. या दशकात एर फ्रांस-केएलएमने दरवर्षी १.४% क्षमता वाढविण्याचे ठरविले आहे.[२६][२७][२८] २१ जून, २०१२ रोजी एर कंपनीने आपल्या ५३,००० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५,००० कर्मचारी कमी करण्याचे जाहीर केले. यातील १,०० कर्मचारी निवृत्त होउन किंवा स्वेच्छेने सोडून जातील असा अंदाज होता तर इतरांना निवृत्ती देण्यात येणार होती.[२९] २०१० च्या अखेरीस वैमानिक आणि जमिनीवरील कर्मचाऱ्यांनी ही योजना स्वीकारली परंतु विमानातील सेवकांनी ती नाकारली.[३०]
२०१३ च्या उत्तरार्धात एर फ्रांसने आपल्या इकॉनोमी वर्गाचे पुनर्नवीकरण केले व प्रीमियम इकॉनोमी वर्ग सुरू केला.[३१] २०१४मध्ये एर फ्रांसने आपली सहकारी कंपनी असलेल्या अलिटालियामधील २५% हिस्सा नुकसानीत काढीत असल्याचे जाहीर केले व अधिक आर्थिक सहाय्य नाकारले.[३२] याच वर्षाच्या शेवटी एर फ्रांसने सिटीजेट ही उपकंपनी जर्मनीच्याइंट्रो एव्हिएशनला विकून टाकली.[३३] २०१५मध्ये एर फ्रांसच्या वैमानिकांनी संप पुकारला आणि आधीच आर्थिक संकटात असलेल्या एर फ्रांसची दुरवस्था झाली. कंपनीने २,००० वैमानिकांना कमी करण्याचे जाहीर केले.[३४] या वर्षाअखेर कंपनीने आपले शेवटचे बोईंग ७४७ विमान निवृत्त केले.[३५] जानेवारी २०१७मध्ये बोईंग ७८७-९ प्रकारची विमाने एर फ्रांसच्या ताफ्यात दाखल झाली.
विमान ताफा
सध्याचा ताफा
२०१८मध्ये एर फ्रांसकडे खालील विमाने होती[३६][३७] -
एर फ्रांस-केएलएमने ५० एरबस ए३५० आणि बोईंग ७८७ची मागणी नोंदविलेली आहे. याशिवाय अधिक ६० विमानांची मागणी नोंदविण्याचा हक्कही घेतलेला आहे. २०१५ ते २०२४ दरम्यान ४३ ए३५० आणि ३० ७८७ विमाने सेवारत ठेवली जातील. केएलएमचे पहिले ७८७ विमान २०१५ मध्ये तर एर फ्रांसचे पहिले ७८७ २०१७मध्ये दाखल झाले. पहिले ए३५० विमान २०१८मध्ये सेवादाखल होईल.[४१][४२]
विशिष्ट विमाने
कॉंकोर्ड
कॉंकोर्ड हे स्वनातीत प्रवासी विमान वापरणाऱ्या एर फ्रांस आणि ब्रिटिश एरवेझ या दोनच विमानकंपन्या आहेत. एर फ्रांसने १९७६ ते २००३ पर्यंत हे विमान वापरले. वाढता इंधनखर्च, सांभाळणी करण्याची क्लिष्टता आणि इतर कारणांमुळे कॉंकोर्डची सेवा लाभदायक नव्हती. २५ जुलै, २००० रोजी चार्ल्स दि गॉल विमानतळाजवळ झालेल्या अपघातात एक कॉंकोर्ड ११३ व्यक्तींसह नष्ट झाल्यावर एर फ्रांसने ही सेवा बंद करण्याचे ठरविले. उरलेल्या विमानांपैकी एफ-बीव्हीएफए हा नमूना वॉशिंग्टन, डी.सी. जवळील संग्रहालयात, एफ-बीव्हीएफबी हा नमूना जर्मनीत, एफ-बीव्हीएफसी तुलूझ येथील कारखान्यात, एफ-बीव्हीएफडी पॅरिस-ला बूर्जे विमानतळाजवळ ठेवलेले आहे. एफ-बीव्हीएफएफ हा नमूना चार्ल्स दि गॉल विमानतळावर ठेवण्यात आलेला आहे.
बोईंग ७४७
एर फ्रांसने १९७०पासून २०१६ पर्यंत बोईंग ७४७ विमाने वापरली. यात -१००, -२००, -३०० आणि -४०० उपप्रकारांचा समावेश होता.[४३][४४][४५]
ए३८०
गंतव्यस्थाने
जून २०१७ च्या सुमारास एर फ्रांस आणि उपकंपन्यांची ९३ देशांतील १६८ गंतव्यस्थाने होती.
वाहतूकतळ
चार्ल्स दि गॉल विमानतळ - हा मुख्य वाहतूक तळ असून येथून रोज ३३५ उड्डाणे होतात. हा विमानतळ हॉप! या उपकंपनीचाही मुख्य तळ आहे.
ओर्लि विमानतळ - येथून ४० शहरांना विमानसेवा आहे. बव्हंश आंतरराष्ट्री उड्डाणे फ्रांसच्या वसाहतींना जातात. हा विमानतळ हॉप! या उपकंपनीचाही तळ आहे.
ल्यों-सें एक्झुपेरी विमानतळ - येथून फ्रांस आणि युरोपमधील ३७ शहरांना विमानसेवा आहे. हा विमानतळ हॉप! या उपकंपनीचाही तळ आहे.
एर फ्रांसच्या विमानांमध्ये दोन, तीन किंवा चार प्रवास वर्ग असतात. युरोपांतर्गत मार्गांवरील विमानात सहसा इकॉनोमी आणि बिझनेस आणि क्वचित प्रीमियम इकॉनोमी असे दोन किंवा तीन वर्ग असतात. लांब पल्ल्याच्या मार्गांवर इकॉनोमी, प्रीमियम इकॉनोमी, बिझनेस आणि क्वचित पहिला वर्ग असतात.
ला प्रीमिएर
ला प्रीमिएर हा एर फ्रांसच्या ए३८० आणि बोईंग ७७७-२०० विमानांच्या लांब पल्ल्याच्या उड्डाणांवरील प्रथम वर्ग आहे.[४८] यातील आसने लाकडी आणि कातड्यांनी बनवलिली असतात. झोपण्यासाठी या आसनांचा २ मीटर लांबीचा बिछाना करता येतो.
बिझनेस
एर फ्रांसच्या लांब पल्ल्याच्या सगळ्या उड्डाणांवर हा प्रवासवर्ग उपलब्ध असतो. यातील आसने तिरकी होतात परंतु पूर्ण आडवी होत नाहीत.
प्रीमियम इकॉनोमी
इकॉनोमी
परदेशातील कार्यालये
एर फ्रांसने न्यू यॉर्क शहरातील मिडटाऊन मॅनहॅटन भागामधील १२५ वेस्ट ५५ व्या मार्गावरील इमारतीत येथे सन १९९१ मध्ये भाड्याने जागा घेऊन कार्यालय थाटलेले आहे. पूर्वी येथे एर फ्रांसचे तिकिट कार्यालय होते. युनायटेड किंग्डम आणि आयर्लंड येथील कामकाजासाठी हॅटन क्रॉस जवळ प्लेसमन हाऊस येथे कार्यालय आहे.[४९]
इतर कार्यालये
एर फ्रान्सचे वैमानिक केंद्र चार्ल्स दि गॉल विमानतळावर आहे. पॅरिसमध्ये या कंपनीचे स्वतःचे लसीकरण केन्द्र आहे.[५०] आंतरराष्ट्रीय प्रवाशासाठी येथून लस दिली जाते. याला ISOची मान्यता आहे.
^Leonhardt, David (31 August 1994). "Air France's New Adviser". The New York Times. 10 May 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 May 2011 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
^ abcd"Directory: World Airlines". Flight International. 27 March 2007. pp. 56–57.