आनंद दिघे हे ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले. ठाण्यातल्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रत्येक सभेला दिघेंची हजेरी असायची. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला आणि त्यांनी शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं. आनंद दिघेंनी शिवसेनेसाठी स्वतःच आयुष्य अर्पण केलं होतं, यासाठी त्यांनी कुटुंबियांनाही लांब केलं. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर दिघेंनी कार्यालयातच राहायला सुरुवात केली. त्यांची धर्मावरही खुप श्रद्धा होती, त्यांनीच सर्वप्रथम टेंभी नाक्यावर जय अंबे संस्था स्थापन करून नवरात्र उत्सवाची स्थापना केली , ती आज तागायत चालूच आहे. त्यांनी आयोजित केलेला नवरात्र उत्सव पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी हजेरी लावली होती. तसेच अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील नवरात्र उत्सवात उपस्थित राहात होते.[२] तसेच पहिली दहीहंडीही त्यांनीच सुरू केली होती. त्यांच्या या धर्म निष्ठेमुळे ते 'धर्मवीर' म्हणूनही लोकांमध्ये लोकप्रिय होते.
दिघेंच्या समाजकारणाचीही प्रचंड चर्चा असायची. टेंभी नाकाच्या व शिवसैनिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी ते दररोज दरबारही भरवत असत. त्यांच्याजवळ असलेल्या पदाचा त्यांनी नेहमी लोकांच्या कल्याणासाठी वापर केला. ठाणे महानगरपालिकेची बस सेवा सुरू झाल्यानंतर दिघेंनी अनेक शिवसैनिकांना यामध्ये कामाला लावले होते. याबरोबरच गरजूंना पायावर उभं राहण्यासाठी स्टॉल उभे करूनही दिले होते. आनंद दिघेंच्या लोकप्रियतेमुळे त्यांना ठाण्याचे बाळसाहेब ठाकरे, असंही म्हटलं जायचं. त्यानंतर बाळासाहेबांनी दिघेंच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्वचिन्ह उपस्थित केला होता. पण ' मी बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीनंच काम करतोय', असं म्हणून दिघेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. [३]
ठाणे महानगरपालिका निवडणुक प्रकरण आणि टाडा
मार्च १९८९ मध्ये झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडुन आले होते आणि शिवसेनेंने जनता पक्षासोबत मिळवणी करत महापौर पदावर दावा केला पण महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आणि उपमहापौर पदही दोन मताने गेले यामध्ये काॅंग्रेसने बाजी मारली. पण यातूनच शिवसेनेचे नगरसेवक फुटले होते हे स्पष्ट दिसून येऊ लागले होते. त्यावेळी आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते. याघटनेवर समाज माध्यमामध्ये बोलताना त्यांनी गद्दारांना माफी नाही असे म्हणले होते. आणि काहीच दिवसानंतर शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची तलवारीने हत्या करण्यात आली. त्यांनीच काँग्रेसला मतदान केले होते आणि यामुळे आनंद दिघेंनी त्यांचा खून केला या प्रकरणामध्ये आनंद दिघेंवर टाडा लावण्यात आला आणि त्यांना अटकही करण्यात आले होते ते आणि जामिनावर बाहेर होते. हे प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालया पर्यंत पोहचले होते. परंतु त्यांच्या मृत्यूपर्यंत हा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.[४]
मृत्यू
दिघे यांचा २४ ऑगस्ट २००१ रोजी पहाटे वंदना टॉकिजजवळ अपघात झाला. गणोशोत्सव असल्याने दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट देऊन टेंभी नाक्याकडे परत येताना एसटी आगारातून बाहेर पडणाऱ्या बसवर दिघे यांची जीप आदळली आणि या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि डोक्याला मार लागला. त्यांना तत्काळ ठाण्याच्या सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आले पायाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिरावत होती. परंतु २६ ऑगस्टला संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले. अखेर रात्री १०ः३० वाजता च्या सुमारास त्यांनी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. याची उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी बातमी देताच हॉस्पिटलबाहेरील दिघेंच्या चाहत्यांनी संपूर्ण सिंघानिया रुग्णालय जाळून खाक केले [५][३]
चित्रपट
स्व.आनंद दिघे यांच्या आयुष्यावर धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली असून १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.[६] चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकयाने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे.[७]