श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिंदू परंपरेत श्रावणी हा धार्मिक संस्कारविधी सांगितलेला आहे.[१] आजही वैदिक धर्म पाळणाऱ्या बऱ्याच घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी पुरु़ाषांसाठी यज्ञोपवीत बदलण्याची तिथी म्हणून पाळली जाते.[२] या विधीला श्रावणी म्हणतात.[३]बौद्ध धर्मीयांसाठी सुद्धा हा सण वेगळ्या कारणासाठी महत्त्वाचा आहे. जानवी बदलण्यासाठी श्रावणी पौर्णिमेखेरीज व्यक्तीच्या पोटजातीनुसार अन्य काही दिवसही सांगितले गेले आहेत.
गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा पहिला दिवस किंवा ज्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा विद्यार्थ्यांच्या समावर्तन संस्काराचा दिवस म्हणून श्रावण पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते असे.[२]
ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात.[४] श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते.
एखाद्या श्रावण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. तैत्तरीय हिरण्यकेशी श्रावणी दुसऱ्या पौर्णिमेला असते.
सूर्योदयापासून दोन तास चोवीस मिनिटांपेक्षा जास्त काळ श्रावण पौर्णिमा असेल आणि त्यावेळी ती विष्टी करण रहित असेल तर त्या दिवशी अपराण्हकाली रक्षाबंधन करावे. दुसऱ्या दिवशी यापेक्षा कमी पौर्णिमा असेल आणि आतल्या दिवशी विष्टीकरण रहित अपराण्हकाळी किंवा प्रदोषकाळी पौर्णिमा असेल तर आदल्या दिवशी रक्षाबंधन करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे, असे दा,कृ. सोंमण सांगतात..
नारळी पौर्णिमा
श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.[५]समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते.[६] वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे.[७] समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून[४] नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.[८] मासेमारीसाठी सागरसंचार करणाऱ्यांनी वर्षाकालीन क्षुब्ध सागरावर जाणे थांबवलेले असते. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ, म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत.[९]
रक्षाबंधन
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते.[१०] त्यादिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात.[११] हा मूळ मूळ उत्तरी भारतातला हा सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो[१२].
या दिवसाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. देव आणि दानव यांच्यातील युद्ध सुरू होते. देवांचा पराभव होणार असे दिसत असताना देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपल्या इंद्राच्या मनगटाला एक संरक्षक धागा बांधला आणि दुसऱ्या दिवशी देवांचा विजय झाला.[१३] त्या दिवसापासून ही प्रथा सुरू झाली असे मानले जाते. मात्र काळाच्या ओघात आता बहिणीने भावाला राखी बांधावी असा संकेत रूढ झाला आहे.[१][२][१४]
सूर्योदयापासून दोन तास चोवीस मिनिटांपेक्षा जास्त काळ श्रावण पौर्णिमा असेल आणि त्यावेळी विष्टी करण नसेल तर त्या दिवशी अपरान्हकाली (दुपारी १२ नंतर) रक्षाबंधन करावे. दुसऱ्या दिवशी यापेक्षा कमी पौर्णिमा असेल आणि आदल्या दिवशी विष्टीकरण रहित अपरान्हकाळी किंवा प्रदोषकाळी पौर्णिमा असेल तर आदल्या दिवशी रक्षाबंधन करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे, असे दा.कृ. सोमण सांगतात.
श्रावणी पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा एक सण आहे. बौद्ध भिक्खूंचा आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास असतो. तीन महिन्यांच्या काळात भिक्खू एका जागी निवास करून धम्माचा अभ्यास व ध्यान साधनेचे चिंतन नमन करीत असतात. या दिवशी बौद्ध भिक्खू लोकांना धम्माचे नियम व परंपरा यांचे मार्गदर्शन करून सद्वर्तनी बनविण्याचा प्रयत्न करतात.[ संदर्भ हवा ]