ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा केला. सदर दौऱ्यात सुरुवातीला तीन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी२० सामना असे आयोजन करण्यात आले होते.[१] तिसरा एकदिवसीय सामना हुडहुड चक्रीवादळामुळे रद्द झाल्यानंतर मालिका चार सामन्यांची करण्यात आली.[२]
मालिका सुरू होण्याच्या दिवशी, वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाकडून त्यांना देऊ असलेले मानधन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मैदानावर न उतरण्याचे ठरवले. बीसीसीआयने मध्यस्थी केल्यानंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने त्यांना मानधन देण्याचे वचन दिले आणि मालिका सुरू झाली. १७ ऑक्टोबर २०१४ रोजी, नाणेफेकीच्या वेळी, वेस्ट इंडीजचा कर्णधार ड्वेन ब्राव्हो संपूर्ण संघासहित मैदानावर उतरला आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या वचनानुसार त्यांना त्यांचे पैसे न मिळाल्यामुळे राहिलेला दौरा ते सोडून देत आहेत अशी घोषणा केली. चौथा सामना रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने पुष्टी दिली की मानधनाबाबत वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंदरम्यान सुरू असलेल्या वादामुळे, दौऱ्यावरील पुढचे सामने रद्द करण्यात येत आहेत.[३][४] बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वेस्ट इंडीज संघ व्यवस्थानपनाने त्यांचा निर्णय बोर्डाला त्यादिवशी आधीच कळवला होता. नोव्हेंबर मध्ये श्रीलंकेने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास प्राथमिक संमती दर्शवली आहे. [५] त्यानंतर, बीसीसीआयने घोषणा केली की पुढील सुूनेपर्यंत वेस्ट इंडीजसोबत नियोजित सर्व दौरे रद्द करण्यात येत आहेत आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.[६]