फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात ११ खेळाडू असतात. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू टाकेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
१९६२ च्या जागतिक चषक स्पर्धेत चिली व इटली यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम बघणारे इंग्लिश पंच केन ॲस्टन हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७० च्या जागतिक स्पर्धेत या कार्ड्सची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये या रंगीत कार्डांचा वापर केला जातो.
फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळवला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे : १ असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि २ रग्बी.
सॉकर हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो. त्यात चेंडू हाताळणे वा तो हातात घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते. रग्बी वा रग्बी युनियन ह्या प्रकारात मात्र चेडू हाताळणे वा तो हातात घेऊन धावणे ग्राह्य मानतात. त्यातूनच रग्बी लीग हा वेगळा प्रकार १८९५ साली निर्माण झाला. रग्बी युनियन या प्रकारातून निर्माण झालेल्या अमेरिकन फुटबॉलमध्ये खूपच वेगळेपणा दिसून येतो. रग्बीमध्ये चेंडू पुढे पळवता येत नाही; या खेळात तो पुढेही नेता येतो. तसेच हा खेळ अधिक उग्र व आक्रमक असल्याने त्यात आडदांडपणा व धसमुसळेपणा जास्त आढळतो. कॅनडियन फुटबॉल हा अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य असलेला पण काही महत्त्वाचे फेरफार असलेला प्रकार आहे. आयर्लंडमध्ये खेळला जाणारा गेलिक फुटबॉल हाही एक आडदांड प्रकार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा ऑस्ट्रेलियन फुटबॉल हा जुन्या गेलिक फुटबॉलचे काही नियम आत्मसात केलेला तथापि वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. या सर्व प्रकारांची माहिती नोंदीत पुढे दिली आहे. यांपैकी सॉकर हा खेळ जास्त लोकप्रिय असून तो जगातील बहुतेक देशांतून खेळला जातो. भारतात ब्रिटिशांच्या बरोबर आलेला फुटबॉल म्हणजे सॉकरच होय.
खेळाचे स्वरूप
हा खेळ एका गोल चेंडूने खेळला जातो. यात ११ जणांचे दोन संघ असतात. ९० मिनिटांचा एक सामना असतो. सामान्यतः ४५ मिनिटे खेळानंतर १५ मिनिटांचा ब्रेक व परत ४५ मिनिटे खेळ असतो.
महत्त्वाच्या संघटना
फिफा : फेदेरात्सिओन इंटरनात्सिओनाल दे फुटबॉल आसोसिआत्सिओन