प्रभाकर जोग (जन्म : डिसेंबर २५, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत.
बालपण
प्रभाकर जोग यांचे बालपण अहमदनगर जिल्ह्य़ातल्या हरेगावमध्ये गेले. त्यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. साखर कारखान्यात ते मोठ्या हुद्दय़ावर असल्याने जोगांचे कुटुंब अहमदनगरमध्ये स्थायिक झाले होते. आई-वडील, एकूण पाच भाऊ आणि दोन बहिणी आणि आजी वगैरे धरून कुटुंबात १६ जण होते. आई-वडिलांपकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हते, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड होती. पुण्याजवळच्या मांजरी फार्म येथे उमेदवारी करीत असताना बालगंधर्वाचें नाटक पुण्यात आले, की वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत, रात्रभर नाटक पाहून, परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर हजर रहात. संगीतकलेची ही आवड प्रभाकर जोगांमध्ये उतरली.
त्यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या ५व्या-६व्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत. प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले.
प्रभाकर जोगांची मोठ्या आकारमानाच्या व्हायोलिनशी चाललेली झटापट पाहून त्यांच्या आजीने त्याना अडीचशे रुपयांचे एक छोटे व्हायोलिन आणून दिले. प्रभाकर जोग या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत गेले. कशाचीही चिंता नसताना वडिलांना विशाखापट्टणम येथील एका साखर कारखान्यात बोलावणे आले. ते तेथे गेल्यानंतर कुटुंब तात्पुरतेे पुण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या त्या दिवसांमध्ये ब्रिटिशांच्या एका भरधाव गाडीने वडिलांना उडवले. इ,स, १९४४ मधील दिवाळीच्या तोंडावर तो अपघात झाला. दोन दिवसांनी आलेल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वडील गेले. त्यांच्या जाण्याने एका रात्रीत जोग कुटुंबाचे दैव फिरले. मोठे बंधू वामनराव जी शिकवणी घेत तिचे थोडेफार उत्पन्न होते. यानंतर जगण्यासाठी लढाई सुरू झाली. घर चालवण्यासाठी प्रत्येक जण हातपाय मारू लागला. प्रभाकर जोगांच्या एका भावाने भाजीचे दुकान टाकले. सकाळी लवकर उठून भावाला त्याच्या भाजीच्या दुकानात मदत करणें, दुधाचा रतीब घालणे, त्यानंतर धाकट्या भावासह भावे स्कूल शाळेत जाणे आणि अधूनमधून संभाजी पार्कात काकड्या विकणे एवढे उद्योग ते करू लागले. पुण्यात तेव्हा मुदलियार यांचा एक छापखाना होता, तिथल्या कागदांपासून वह्य़ा करून विकायचे उद्योगही जोगांनी केले. एवढे सगळे करून परीक्षेत पहिल्या पाचात येत त्यांचा व्हायोलिनवादन सुरूच होते.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मैदानापलीकडे राहणाऱ्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती.
सांगीतिक कारकीर्द
स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ’गुरुदेवदत्त’ या १९५१ च्या चित्रपटात व्हायोलिनवादन केले. स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबर काम करू लागले.
१९५२ साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत सॉंग व्हायोलिनिस्ट म्हणून दाखल झाले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन या संगीत दिग्दर्शकांकडून त्यांना बोलावणी येऊ लागली.
प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, ग्रामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. त्यांच्या व्हायोलिन वादनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका, कॅसेट्स आणि सीडीज आहेत. या सीडीजमध्ये ’गाणारे व्हायोलिन’ नावाच्या ६ आणि ’गाता रहे मेरा व्हायोलिन’ नावाच्या चार सीडीज आहेत. ’आयट्यून्स नावाच्या संकेतस्थळावर त्यांच्या काही सुरावटी ऐकायला मिळतात.
’लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते.
प्रभाकर जोग यांच्या मुलांपैकी श्रीनिवास गाणे शिकला आहे, मिलिंद गिटार वाजवतो व नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोग हीही रंगमंचावरून व्हायोलिनचे कार्यक्रम करतात. अमेयची पत्नी दर्शना ही चांगली वादक आहे.
प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेले मराठी चित्रपट (एकूण २२ पैकी २१)
- अंतरपाट
- आंधळा मारतो डोळा
- ओवाळिते भाऊराया
- कुंकवाचा करंडा
- कैवारी
- घर गंगेच्या काठी
- चांदणे शिंपीत जा
- चुडा माझा सावित्रीचा
- जावई माझा भला (प्रभाकर जोगांचा पहिला चित्रपट)
- जावयाची जात
- ढगाला लागली कळ
- थांब लक्ष्मी कुंकू लावते
- दरवडेखोर
- दाम करी काम
- देवघर
- बिरबल माय ब्रदर
- भैरू पैलवानकी जय
- मीच तुझी प्रिया
- येडा की खुळा?
- सतीची पुण्याई
- सतीचे वाण
प्रभाकर जोग यांचे संगीत असलेली काही गीते
- अंगणी गंगा घरात काशी
- आज कळीला एक फूल भेटले
- आज प्रीतिला पंख हे
- आधार तू जीवनी
- आम्ही चालवू हा पुढे
- आला वसंत ऋतू आला
- आळविते मी तुला विठ्ठला
- उद्योगाचे घरी देवता
- उर्मिले त्रिवार वंदन तुला
- ऊठ पांडुरंगा आता
- एकटी मी एकटी
- ओवाळिते मी लाडक्या
- कशी मी सांगु वडिलांपुढे
- कान्हा दिसेना कुठे
- किती दिसांनी आज भेटसी
- किती सांगू मी सांगू कुणाला
- कुणाला सांगू माझी व्यथा
- कोटी कोटी रूपे तुझी
- गिरीधर वर वरिला
- गोकुळ सोडुन गेला माधव
- घडून जे गेले ते
|
- घेऊ कसा उखाणा
- चल रं शिरपा
- चित्र जयाचे मनी रेखिले
- चंदनाच्या देव्हाऱ्यात
- जागे व्हा मुनिराज
- जो जो जो बाळा
- तेच स्वप्न लोचनांत
- दाम करी काम येड्या
- दूर राहुनी पाहु नको रे
- देवमानुस देवळात आला
- धन्य हा सावित्रीचा चुडा
- धुंद आज डोळे
- निळा समिंदर निळीच
- प्रभू सोमनाथा
- प्रिया आज माझी नसे
- प्रेमाला उपमा नाही
- बघत राहु दे तुझ्याकडे
- बाजार फुलांचा भरला
- माझी प्रिया हसावी
- माझ्या भावाला माझी माया
- मी सुखाने नाहले
|
- मीच माझ्या धामी रामा
- या घरची मी झाले
- ये निद्रादेवी
- रंगवि रे चित्रकारा
- रवि आला हो रवि आला
- लपविलास तू हिरवा चाफा
- लक्ष्मी तू या नव्या
- लावा भांड्याला कल्हई
- वृंदावनात माझ्या ही तुळस
- शुभंकरोति म्हणा मुलांनो
- सती तू दिव्यरूप मैथिली
- सत्यात नाहि आले
- संसार-मंदिरी या आता
- सांगू कशी प्रिया मी
- सांज रंगात रंगून जाऊ
- सोनियाचा पाळणा रेशमाचा
- स्वर आले दुरुनी
- हसले फसले हरवून मला
- हिल हिल पोरी हिला
- हे चांदणे फुलांनी
|
आत्मचरित्र
प्रभाकर जोग यांनी ’स्वर आले जुळुनी’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
प्रभाकर जोग यांना मिळालेले पुरस्कार
- पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे प्रदान झालेला २०१३ सालचा वसुंधरा पंडित पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा २०१५ सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
- कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ’सूरसिंगार पुरस्कार’
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै २०१७)
- २०१७ सालचा गदिमा पुरस्कार (१४-१२-२०१७)
पहा
जोग यांचे संकेतस्थळ[मृत दुवा]
बाह्य दुवे