हृदयनाथ मंगेशकर (ऑक्टोबर २६, १९३७ - हयात) हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत.
कारकीर्द
त्यांनी काही निवडक मराठी (उदा. चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग) आणि हिंदी (उदा. धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब) चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले असले आणि यांतील बरीचशी गाणी गाजली असली तरी त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे 'भावगंधर्व' अशी करून देण्यात येते ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या आणि मराठी जगतात गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळे. सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाउन घेऊन अजरामर केले आहेत.
त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्यातरी त्यातही ते अनेक नवनवीन प्रयोग करतात. आपले वडील आणि संगीत नाटकांच्या जमान्यातले प्रख्यात गायक-नट मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पदेही ते आपल्या संगीतरचनांमधे वापरतात.
गाजलेली गीते
पुरस्कार
- २००९ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- पुणे नवरात्र महोत्सवातर्फे दिला गेलेला ’महर्षी पुरस्कार" (२०१४)
- पुणे-चिंचवड येथील नादब्रह्म परिवारातर्फे नादस्वरब्रह्मश्री पुरस्कार (७ जानेवारी २०१७)
- पुणे भारत गायन समाजाचा पं. राम मराठे स्मृती पुरस्कार (९ ऒक्टोबर २०१७)
- २०१८ सालचा मटा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार (१६ मार्च २०१८)
बाह्य दुवे