पुसारला वेंकट सिंधू (जन्म ५ जुलै १९९५) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू.एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.[२] यामध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे.[३] तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ऍथलीट आहे.[४][५] २ एप्रिल २०१७ मध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील उच्च असलेला जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला.[६][७]
सिंधूने सप्टेंबर २०१२ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी बी.डब्लू.एफ. जागतिक क्रमवारीत अव्वल २० मध्ये स्थान मिळविले.[८] तिने बी.डब्लू.एफ. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण पाच पदके जिंकली आहेत आणि या स्पर्धेत पाच किंवा त्याहून अधिक एकेरी पदके जिंकणारी चीनच्याझांग निंग नंतरची ती दुसरी महिला आहे.
सिंधूने २०१६ चायना ओपन स्पर्धांमध्ये तिची पहिली सुपरसीरिज जिंकली आणि त्यानंतर २०१७ मध्ये दक्षिण कोरिया आणि भारतात आणखी चार अंतिम सामने जिंकून विजेतेपद पटकावले. त्या व्यतिरिक्त तिने २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१८ आशियाई स्पर्धांमध्ये एक-एक रौप्य पदक मिळवले. तसेच यानंतर उबेर कपमध्येदेखील तिने दोन कांस्य पदके जिंकली.
सिंधूने $8.5 दशलक्ष, $5.5 दशलक्ष आणि $7.2 दशलक्ष कमाईसह अनुक्रमे २०१८, २०१९ आणि २०२१ मध्ये फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.[११][१२]
भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. तसेच ती भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मश्रीची प्राप्तकर्ता आहे. तिला जानेवारी २०२० मध्ये पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.[१३][१४][१५]
जीवन
पुसरला वेंकटसिंधू हिचा जन्म हैदराबाद येथील पी. व्ही. रमन आणि पी. विजया यांच्या घरी झाला.[१६] तिचे वडील रमण हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी आहेत जे मूळ तेलंगणचे आहेत तर आई विजया यांचा जन्म विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील आहे.[१७] तिचे आई-वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. तिचे वडील हे भारतीय व्हॉलीबॉल संघाचे सदस्य होते आणि त्यांनी १९८६ च्या सोलआशियाई खेळांमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यांना या खेळातील योगदानाबद्दल २००० मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता.[१८]
सिंधू हैदराबाद येथे राहते. तिचे शिक्षण हैदराबादच्या ऑक्सिलियम हायस्कूल आणि सेंट अॅन्स कॉलेज फॉर वुमन येथे झाले. तिचे पालक व्हॉलीबॉल खेळत असले तरी तिने बॅडमिंटन निवडले कारण ती २००१ च्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेता असलेल्या पुलेला गोपीचंद यांच्या यशातून प्रभावी झाली होती.[१९] तिच्या कारकिर्दीची माहिती देताना, द हिंदूच्या बातमीदाराने लिहिले:
तिने वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. सिकंदराबाद येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनीअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्सच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली तिने या खेळातील मूलभूत गोष्टी शिकल्या. लवकरच ती पुलेला गोपीचंद यांच्या गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये सामील झाली. तिच्या कारकिर्दीची माहिती देताना, द हिंदूच्या बातमीदाराने लिहिले:
"The fact that she reports on time at the coaching camps daily, traveling a distance of 56 km from her residence, is perhaps a reflection of her willingness to complete her desire to be a good badminton player with the required hard work and commitment."
("तिच्या घरापासून ५६ किमी अंतराचा प्रवास करून ती दररोज कोचिंग कॅम्पमध्ये वेळेवर हजर होते, हे कदाचित आवश्यक कठोर परिश्रम आणि वचनबद्धता यांच्यासह चांगली बॅडमिंटनपटू बनण्याची तिची इच्छा पूर्ण करण्याच्या प्रतिबिंब आहे.")[१९]
गोपीचंद यांनी या वार्ताहराच्या मताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की "सिंधूच्या खेळातील सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तिची वृत्ती आणि कधीही न मरणारा आत्मा."[२०]
गोपीचंदच्या बॅडमिंटन अकादमीमध्ये सामील झाल्यानंतर सिंधूने अनेक विजेतेपदे जिंकली. १० वर्षांखालील गटात तिने दुहेरी प्रकारात पाचवी सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप आणि अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंगमध्ये एकेरी विजेतेपद जिंकले. १३ वर्षांखालील गटात तिने पाँडिचेरी येथील सब-जुनियर्समध्ये एकेरी विजेतेपद, कृष्णा खेतान ऑल इंडिया टूर्नामेंट IOC ऑल इंडिया रँकिंग, सब-जुनियर नॅशनल आणि पुण्यातील अखिल भारतीय रँकिंगमध्ये दुहेरीचे विजेतेपद जिंकले.
तिने भारतातील ५१ व्या राष्ट्रीय राज्य खेळांमध्ये १४ वर्षांखालील सांघिक सुवर्णपदक देखील जिंकले.[२१] ती नंतर गोपीचंद यांच्याशी विभक्त झाली आणि दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक पार्क ताई-सांग यांच्याकडे प्रशिक्षणासाठी गेली.[२२][२३]