निकोलस जेम्स मॅडिन्सन हा एक ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. तो डावखोरा सलामीवीर असून ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमधील न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज आणि केएफसी टी२० बिग बॅश लीग मध्ये सिडनी सिक्सर्स ह्या संघाकडून खेळतो.
१९ वर्षांखालील संघ
साउथ कोस्ट मध्ये जन्मलेला, मॅडिसन डिसेंबर २००९ साली ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील चॅंपियनशीप जिंकलेल्या १९-वर्षांखालील न्यू साउथ वेल्स संघाचा एक सदस्य होता.
त्याच्या दोनच महिने आधी श्रीलंका १९-वर्षांखालील संघाविरुद्ध खेळताना त्याने ऑस्ट्रेलियातर्फे घरच्या मालिकेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजी सरासरीचा विक्रम केला. मालिकेत त्याची सरासरी होती ७१.६६[१] आणि डार्विन मधील ५०-षटकांच्या सामन्यात त्याने प्रत्येक चेंडूस एक धाव अशा नाबाद १३३ धावा केल्या.[२]
मॅडिन्सनच्या ह्या कामगिरीमुळे जानेवारी २०१० मध्ये, न्यू झीलंड येथे खेळवल्या गेलेल्या, आयसीसी १९-वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या ऑस्ट्रेलिया १९-वर्षांखालील संघात त्याचा समावेश झाला. स्पर्धेमध्ये लिंकन येथील अंतिम सामन्यात त्याने डावाची सुरुवात केली. सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २५ धावांनी पराभव केला आणि चषकावर आपले नाव कोरले. [३]
स्थानिक कामगिरी
२००९-१० मधील सथरलॅंड डिस्ट्रीक्ट क्रिकेट क्लब सोबतचा मोसम सुद्धा मॅडिन्सनसाठी खूपच फलदायी होता, ह्यावेळी त्याने ४३.६० च्या सरासरीने ७४१ धावा कुटल्या. [४] मोसमात दोन शतके झळकावली, त्यामधील इस्टर्न सबर्ब्स विरुद्ध केलेल्या १३७ धावा खूपच महत्त्वपुर्ण ठरल्या त्यामुळे संघाला अंतिम फेरीत धडक मारता आली.
त्याच्या डावखोऱ्या ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाजीने त्या वर्षातील फर्स्ट ग्रेड णी सामन्यात १२ बळी घेतले, ज्यामध्ये इस्ट विरुद्ध ५-९५ ह्या सामना जिंकून देणाऱ्या कामगिरीचा समावेश होता.
११ ऑक्टोबर २०११ रोजी न्यू साउथ वेल्स कडून त्याने शतक झळकावले आणि प्रथम श्रेणी सामन्यातील पदार्पणात शतक झळकावणारा तो सर्वात लहान खेळाडू ठरला. तो १८ वर्षे आणि २९४ दिवसांचा असताना त्याने दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११३ धावा केल्या. ह्या आधीचा विक्रम महान आर्थर मॉरिसच्या नावावर होता त्याने २६ डिसेंबर १०४९ रोजी तो १८ वर्षे आणि ३४२ दिवस वयाचा असताना १४८ धावा केल्या होत्या. तसेच तो न्यूसाउथ वेल्सकडून शतक झळकावणारा चवथा सर्वात लहान खेळाडू ठरला, त्याच्यापेक्षा लहान फलंदाजांमध्ये आर्ची जॅक्सन, इयान क्रेग, डग वॉल्टर यांचा समावेश आहे.
जून-जुलै २०११ मध्ये व्हीबी टूरसाठी झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलिया अच्या एकदिवसीय आणि चार दिवसीय अशा दोन्ही संघात त्याची निवड झाली होती. दौऱ्यावर झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेली व्हीबी त्रिकोणी मालिका आणि त्यानंतर यजमानांविरुद्ध दोन चार-दिवसीय सामने खेळवले गेले.
आयपीएल
२०१४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून मॅडिन्सन ने आयपीएल पदार्पण केले. बंगलोरकडून डावाची सुरुवात करताना त्याने दिल्ली आणि मुंबई विरुद्ध अनुक्रमे ४ आणि १२ धावा केल्या. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले. [५]
बिग बॅश
२०१४/१५ केएफसी टी२० बीग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात, मॅडिन्सनचा सिडनी सिक्सर्स संघ शेवटच्या चेंडूवर पर्थ स्कॉर्चर्सविरुद्ध हरला. मॅडिन्सनने दोन चौकारांसहीत २२ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या. शेवटचा चेंडू मॅडिन्सनने पकडला आणि कर्णधार हेन्रिक्सकडे अचुक फेकला, परंतु त्याला तो पकडता आला नाही आणि अराफातला धावचीत करण्याची संधी गमावली, त्यामुळे सामना सुपर ओव्हर पर्यंत गेला.
२०१४/१५ केएफसी टी२० बीग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सचा कर्णधार मोझेस हेन्रीक्सला जेव्हा दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले तेव्हा त्याच्याऐवजी मॅडिन्सनने कर्णधारपदाची धुरा सांभाळली.[६]
आंतरराष्ट्रीय कामगिरी
ऑक्टोबर २०१३ मध्ये राजकोट येथे भारताविरुद्ध मॅडिन्सनने ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले. त्याने १६ चेंडू ३४ धावा केल्या.[७]नोव्हेंबर २०१४ मध्ये, सिडनीमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या दुसऱ्या टी२० सामन्यात तो अवघ्या ४ धावा करु शकला.[८]
नोव्हेंबर २०१६ मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी मॅडिन्सनची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात निवड करण्यात आली. [९] त्याने त्याचे कसोटी पदार्पण २४ नोव्हेंबर २०१६ रोजी केले. [१०] त्याच्या पहिल्या कसोटी डावामध्ये १२ व्या चेंडूवर कागिसो रबाडाने त्याला शून्य धावांवर त्रिफळाचीत केले, त्याचा दुसरा पदार्पण करणारा सहकारी पीटर हॅंड्सकोंबने मात्र ७८ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या.