नंद घराणे हे भारतातील प्राचीन महाजनपदांपैकी एक असलेल्या मगध या प्रदेशावर साम्राज्य करणाऱ्या राजांचे घराणे होते. नंद घराण्याने शंभर वर्षे राज्य केले असे मानले जाते. पाटलीपुत्र ही या घराण्यातील राजांची राजधानी होती.
पार्श्वभूमी
महापद्मानंद हा नंद घराण्याचा संस्थापक होता. यालाच अग्रमीन, उग्रसेन अशीही नावे आहेत. त्याला पंडुक, पांडुगती, भूतपाल, राष्ट्रपाल, गोविशांक, दाससिद्धक, कैवर्त आणि धनानंद हे आठ पुत्र होते. उग्रसेनासह नऊ नंदराजांनी मगधावर राज्य केले.
राजांची कामगिरी
महापद्मानंद हा पराक्रमी राजा होता. त्याने इक्ष्वाकु पांचाल, काशी, कलिंग, मिथिला, अश्मक व कुंतल या राज्यांना पराभूत करून विशाल साम्राज्य निर्माण केले. भद्रसाल नावाचा धाडसी सेनापती या राजाकडे होता. धनानंद हा नंद घराण्यातील शेवटचा राजा होय. धनानंदाच्या काळात मगधाचा साम्राज्यविस्तार तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बिहार, बंगाल आणि दक्षिणेकडे नांदेड, निझामाबादपर्यंत (अश्मक राज्य) झालेला होता. धनानंदाच्या काळात मगधाचे विशाल साम्राज्य भारतभर पसरलेले होते. हे प्राचीन भारताच्या इतिहासातले पहिले साम्राज्य होते.
अस्त
नंदराजांनी लोकांवर अमानुष कर लावून प्रचंड संपत्ती गोळा केल्यामुळे प्रजाजनात असंतोष निर्माण झाला. आर्य चाणक्याचा अपमान धनानंदानेच केला होता. शेवटी चंद्रगुप्ताने भारतीय राज्ये व आर्य चाणक्याच्या मदतीने नंद साम्राज्यावर आक्रमण करून इ.स.पू. ३२३ मध्ये नंद घराण्याचा नाश केला.
हे सुद्धा पहा