गुवाहाटी (आसामी : গুৱাহাটী; मराठीत गोहत्ती - Gauhati; प्राचीन नाव - प्राग्ज्योतिषपूर) हे भारत देशाच्या आसाम राज्याच्या राजधानीचे शहर व ईशान्य भारतामधील सर्वाधिक लोकसंख्येचे महानगर आहे. गुवाहाटी शहर आसामच्या मध्य-पश्चिम भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या ९.६ लाख इतकी होती. प्रगज्योतिषपुरा ह्या नावाने प्रचलित असलेले गुवाहाटी ऐतिहासिक कामरुप राजतंत्राची राजधानी होती. आजच्या घटकेला गुवाहाटीमध्ये अनेक जुनी हिंदू मंदिरे आहेत. गुवाहाटी आसामचे शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र असून दिसपूर ह्या गुवाहाटीच्या एक भागामध्ये आसाम राज्य सरकारचे कार्यालय व विधानसभा स्थित आहे. गुवाहाटी उच्च न्यायालय आसामसोबतच नागालॅंड, मिझोरम व अरुणाचल प्रदेश ह्या राज्यांसाठी देखील जबाबदार आहे.
इसवी सन १९८३मध्ये शहराचे गोहत्ती (Gauhati) हे परंपरागत नाव बदलून ते गुवाहाटी असे करण्यात आले. तरीसुद्धा गोहत्ती उच्च न्यायालय, गोहत्ती विद्यापीठ, गोहत्ती मेडिकल काॅलेज-हाॅस्पिटल, गोहत्ती काॅमर्स काॅलेज, गोहत्ती लोकसभा मतदारसंघ आदी नावांध्ये काहीही बदल झालेला नाही. (२०१९ सालीही)
इतिहास
अनेक शतकांचा इतिहास असलेल्या गोहत्तीचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. येथील कामाख्या मंदिर अनेक शतके जुने आहे.[१] आहोम साम्राज्याचा भाग राहिलेल्या गुवाहाटीवर मुघलांची अनेकदा आक्रमणे झाली. १६७१ सालच्या सराईघाट लढाईला गोहत्तीच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या व नंतरच्या काळात गोहत्तीत व परिसरात फारशा उल्लेखनीय घटना घडल्या नसल्यामुळे शहराच्या इतिहासाची केवळ मर्यादित नोंद आढळते.
भूगोल
गुवाहाटी शहर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले असून नदी शहराचा अविभाज्य भाग मानली जाते. सराईघाट पूल हा गुवाहाटी भागातील ब्रह्मपुत्रा ओलांडणारा एकमेव पूल आहे. मेघालय राज्याची राजधानी शिलाँग गुवाहाटीहून केवळ ८० किमी अंतरावर आहे.
शिक्षण
गुवाहाटीच्या उत्तर भागात असलेली 'गोहत्ती आयआयटी' भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी ही भारतामधील सर्वोत्तम तांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. ह्याच बरोबर कॉटन कॉलेज, गोहत्ती विद्यापीठ (गुवाहाटी नाही!!), आसाम विज्ञान व तांत्रिकी विद्यापीठ इत्यादी अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था गुवाहाटीमध्ये आहेत.
खेळ
नेहरू स्टेडियम हे गुवाहाटीमधील प्रमुख स्टेडियम असून येथे क्रिकेट व फुटबॉल ह्या खेळांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातात. येथील इंदिरा गांधी ॲथलेटिक स्टेडियम २००७ राष्ट्रीय कीरिडा स्पर्धांसाठी बांधले गेले व आजच्या घडीला प्रामुख्याने फुटबॉलसाठी वापरले जाते. २०१७ फिफा अंडर-१७ विश्वचषक स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या ६ यजमान शहरांपैकी गुवाहाटी एक होते. येथे अनेक साखळी व बाद फेरीचे सामने खेळवले गेले. इंडियन सुपर लीग स्पर्धेत खेळणारा नॉर्थईस्ट युनायटेड एफ.सी. हा फुटबॉल क्लब गुवाहाटीमध्ये आहे.
वाहतूक
गोहत्ती विमानतळ (बदलेले नाव - लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ) हा ईशान्य भारतातील सर्वाधिक वाहतुकीचा विमानतळ असून देशांतर्गत सेवेसोबत येथून बँकॉक व भूतानसाठी देखील थेट प्रवासी विमाने उपलब्ध आहेत. गुवाहाटी रेल्वे स्थानक उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय असून ते देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.
बाह्य दुवे
- ^ "Shardiya Navratri 2021: नवरात्रि पर करें कामाख्या मंदिर का दर्शन, इस शक्तिपीठ की कहानी है अद्भुत". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2021-10-11. 2021-11-13 रोजी पाहिले.