या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
अलेक्झांड्रा डेव्हिड-नील
जन्म
२४ ऑक्टोबर १८६८ ट्युनिस, ट्युनेशिया
मृत्यू
०८ सप्टेंबर १९६९ (१०० वर्षे) फ्रान्स
राष्ट्रीयत्व
बेल्जियन व फ्रेंच
प्रसिद्ध कामे
तिबेटविषयक लेखन
अलेक्झांड्रा डेव्हिड-नील (लुईस युजेनी अलेक्झांड्रीन मेरी डेव्हिड) (जन्म २४ ऑक्टोबर १८६८ - ०८ सप्टेंबर १९६९) या बेल्जियन-फ्रेंच प्रवासी, अध्यात्मवादी, बौद्धधर्मी, ऑपेरा गायक आणि लेखिका होत्या.[१] १९२४ मध्ये ल्हासा, तिबेट येथे त्यांनी भेट दिली तेव्हा त्या विशेष प्रसिद्ध झाल्या कारण तेव्हा तेथे परदेशी लोकांना भेट देण्यास मनाई होती. डेव्हिड-नील यांनी पौर्वात्य धर्म, तत्त्वज्ञान आणि तिबेटमधील जादू आणि रहस्य यासह त्यांच्या प्रवासाविषयी ३० हून अधिक पुस्तके लिहिली, १९२९ मध्ये ती पुस्तके प्रकाशित करण्यात आली. त्यांच्या शिकवणीचा प्रभाव लेखक जॅक केरोआक आणि ॲलन गिन्सबर्ग, पौर्वात्य तत्त्वज्ञान लोकप्रिय करणारे लेखक ॲलन वॉट्स आणि राम दास आणि गूढवादी बेंजामिन क्रेम यांच्यावर झाला.
प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी
वयाच्या १८ व्या वर्षी, डेव्हिड-नील यांनी इंग्लंड, स्वित्झर्लंड आणि स्पेनला स्वतःहून भेट दिली होती आणि त्या मॅडम ब्लाव्हत्स्कीच्या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये शिकत होत्या. त्या विविध गुप्त सोसायट्यांमध्ये सामील झाल्या होत्या. स्त्रीवादी आणि अराजकतावादी गटांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले.
बालपणी आणि पौगंडावस्थेमध्ये, त्या फ्रेंच भूगोलशास्त्रज्ञ आणि अराजकतावादी एलिसी रेक्लस (१८२०-१९०५) यांच्याशी संबंधित होत्या. यामुळेनील यांना त्या काळातील अराजकतावादी कल्पनांमध्ये आणि स्त्रीवादात रस निर्माण झाला, त्यातून त्यांना १८९८ मध्ये 'पोअर ला विए' (फ्रेंच) प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली. १८९९ मध्ये, त्यांनी एलिसी रेक्लसच्या प्रस्तावनेसह एक अराजकतावादी ग्रंथ लिहिला. प्रकाशकांनी पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडस केले नाही, पण नील यांच्या मित्राने, जीन हॉस्टंटने स्वतः त्याच्या प्रती छापल्या आणि अखेरीस त्याचे पाच भाषांमध्ये अनुवाद झाले.[२] १८९१ मध्ये, नील यांनी पहिल्यांदा भारताला भेट दिली आणि त्या त्यांचे आध्यात्मिक गुरू, वाराणसीचे स्वामी भास्करानंद सरस्वती यांना भेटल्या.[३]
त्यांनी १८८९ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला, त्याची नोंद त्यांनी १८९६ मध्ये ला लॅम्पे डी सेगेसे या शीर्षकाखाली प्रकाशित केलेल्या डायरीमध्ये केली होती.[४]
त्या २१ वर्षांच्या असताना इंग्रजी शिकण्यासाठी त्या लंडनला गेल्या. तिथे त्या ब्रिटिश म्युझियमच्या ग्रंथालयात वारंवार जात असत आणि थिओसॉफिकल सोसायटीच्या अनेक सदस्यांना भेटत असत. पुढच्या वर्षी, पॅरिसमध्ये परतल्यावर, त्यांनी संस्कृत आणि तिबेटी भाषेची ओळख करून घेतली.[५]
१८९५-१९०४: ऑपेरा गायक
वडिलांच्या सूचनेनुसार त्या पियानो आणि गायन शिकल्या. १८९५-१८९६ आणि १८९६-१८९७ च्या हनोई ऑपेरा हाउस मध्ये त्यांना प्रथम दर्जाच्या गायिका असा मान मिळाला.[६]
१८९७ ते १९०० पर्यंत, त्या पॅरिसमध्ये पियानोवादक जीन हॉस्टंटसोबत एकत्र राहात होत्या. त्या नोव्हेंबर १८९९ ते जानेवारी १९०० पर्यंत अथेन्सच्या ऑपेरामध्ये गाण्यासाठी गेल्या.त्यानंतर, त्याच वर्षी जुलैमध्ये, त्या ट्युनिसच्या ऑपेरामध्ये गेल्या. पुढे त्यांची फिलिप नेल, ट्युनिशियन रेल्वेचे मुख्य अभियंता यांच्याशी भेट झाली. पुढे ते त्यांचे पती बनले. १९०२ मध्ये त्यांनी आपली गायन कारकीर्द सोडून दिली.[७]
१९०४-१९११: विवाह
४ ऑगस्ट १९०४ रोजी, वयाच्या ३६ व्या वर्षी, त्यांनी फिलिप नील दी सेंट-सॉवेरशी लग्न केले. स्वातंत्र्याची गरज आणि शिक्षणाकडे असलेला त्यांचा ओढा यामध्ये मातृत्व अडसर ठरेल अशी त्यांची भावना होती. कालांतराने त्या व त्यांचे पती यांचा घटस्फोट झाला.[८]
त्या काळात, त्यांनी विविध नियतकालिकांमध्ये लेखन केले. आणि युरोपमधील शहरांमध्ये विवादास्पद विषयांवर व्याख्याने दिली. त्या बौद्ध धर्म, झिओनिझम आणि कट्टरपंथी स्त्रीवादाच्या बाजूने कैफियत मांडत असत. [९]
साधना
मीरा अल्फासा आणि नील या फ्रान्समधील मैत्रिणी होत्या. बौद्ध धर्म, मनावरील नियंत्रण, साधनेमधील विविध प्रयोग यासंबंधी त्या दोघींमध्ये चर्चा चालत असत.[१०]
१९११-१९२५: इंडो-तिबेट मोहीम
सिक्कीममध्ये आगमन (१९१२)
अलेक्झांड्रा डेव्हिड-नील बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्यांदा भारतात आल्या. ९ ऑगस्ट १९११ रोजी भारताच्या दौऱ्यावर त्या तिसऱ्यांदा आल्या. (१९११-१९२५)
१९१२ मध्ये, त्या सिक्कीमच्या शाही मठात पोहोचल्या. आपले बौद्ध धर्माचे ज्ञान अधिक परिपूर्ण व्हावे यासाठी त्या अनेक बौद्ध मठांमध्ये फिरल्या. १९१४ मध्ये, त्यांची या पैकी एका मठात अफुर योंगडेन या १५ वर्षांच्या तरुणाशी भेट झाली, त्यास नील यांनी दत्तक घेतले. दोघांनी सिक्कीममधील समुद्रसपाटीपासून ४००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या एका मठात राहण्याचा निर्णय घेतला.[११]
सिक्कीमचे तत्कालीन आध्यात्मिक नेते सिडकेओंग यांना त्यांचे वडील, सिक्कीमचे महाराजा यांनी अलेक्झांड्रा डेव्हिड-नील यांच्या भेटीसाठी पाठवले होते. सुधारणेसाठी उत्सुक असलेले सिडकोंग, अलेक्झांड्रा डेव्हिड-नील यांचा सल्ला ऐकत असत. [१२]
१३ व्या दलाई लामांसोबत कलिमपाँगमध्ये भेट (१९१२)
अलेक्झांड्रा डेव्हिड-नील कालिम्पॉंगला गेल्या, तिथे त्यांना अज्ञातवासातील दलाई लामा भेटले. दलाई लामा यांनी त्यांना तिबेटी भाषा शिकण्याचा सल्ला दिला, हा सल्ला त्यांनी शिरोधार्य मानला.[७]
लाचेन येथील वास्तव्य (१९१२-१९१६)
अँकराइट गुहेत त्यांनी तिबेटी योगाभ्यास केला.त्या कधीकधी अज्ञातवासात जात असत. त्या ट्यूमोचे तंत्र शिकल्या. त्यांचे गुरू गोमचेन यांनी त्यांना 'येशे टोम', "प्रज्ञा-ज्योती" असे धार्मिक नाव दिले.[१३]
अलेक्झांड्रा डेव्हिड-नील या 'लाचेन गोमचेन रिनपोचे' यांच्या सहवासात असताना, २९ मे १९१२ रोजी त्या 'सिडकोंग'ला पुन्हा भेटल्या. बौद्ध धर्माची ही तीन व्यक्तिमत्त्वं, गोमचेन यांनी घोषित केल्याप्रमाणे, बौद्ध धर्माच्या सुधारणेसाठी आणि विस्तारासाठी एकत्र आली, त्यांनी चिंतन केले आणि एकत्र काम केले. डेव्हिड-नीलसाठी, सिडकेओंगने सिक्कीमच्या ५००० मीटर्स उंचीवर एक आठवड्याची मोहीम आयोजित केली.
जेव्हा सिडकॉन्ग यांचे वडील निधन पावणार होते, तेव्हा सिडकॉन्गने अलेक्झांड्रा डेव्हिड-नील यांना मदतीसाठी बोलावले आणि त्यांना बौद्ध धर्मातील सुधारणा घडवून आणण्यासाठी सल्ला मागितला. सत्तेवर आल्यावर सिडकॉन्ग सिक्कीममध्ये तशी सुधारणा करू इच्छित होते. दार्जिलिंग आणि सिलिगुडी मार्गे गंगटोकला परतताना, डेव्हिड-नील यांचे सिडकेंगने ३ डिसेंबर १९१३ रोजी अधिकृत व्यक्तीप्रमाणे गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत केले.[७]
तिबेटची पहिली सहल आणि पंचेन लामा यांची भेट (१९१६)
१३ जुलै१९१६ रोजी, अलेक्झांड्रा डेव्हिड-नील, योंगडेन आणि एका साधूसह तिबेटला रवाना झाल्या. तेथे त्या पंचेन लामा यांना भेटल्या.[७]
जपान, कोरिया, चीन, मंगोलिया आणि तिबेटचा दौरा
पहिल्या महायुद्धात युरोपला परतणे अशक्य असल्याने अलेक्झांड्रा डेव्हिड-नील आणि योंगडेन सिक्कीम सोडून भारत आणि नंतर जपानला गेले. तिथे त्यांची भेट एकाई कावागुची या तत्त्ववेत्त्याशी झाली,.डेव्हिड-नील आणि योंगडेन नंतर कोरिया आणि नंतर बीजिंग, चीनला रवाना झाले. तेथून, त्यांनी तिबेटी लामांच्या सोबतीने चीन ओलांडले.[४]
ल्हासामध्ये अज्ञातवासात (१९२४)
वेषांतर करून, कधी भिकाऱ्याच्या तर कधी भिक्षूच्या वेशात मजल दरमजल करीत, अलेक्झांड्रा डेव्हिड-नील १९२४ साली ल्हासाला पोहोचल्या. मोनलाम प्रार्थना उत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या गर्दीत विलीन झाल्या.[१४] आजूबाजूच्या मोठ्या मठांना भेट देण्यासाठी दोन महिने त्या तेथे राहिल्या.ड्रेपुंग, सेरा, गांडेन, साम्ये, आणि स्वामी असुरी कपिला (सेझर डेला रोजा बेंडिओ) यांना भेटल्या.[१५]
परतल्यानंतर, म्हणजे १० मे १९२५ रोजी हावरे येथे आगमन झाल्यापासून, त्यांच्या धाडसीपणामुळे त्यांना प्रसिद्धी प्राप्त झाली. त्या वृत्तपत्रांच्या मथळ्यांचा त्या विषय बनल्या, मासिकांमध्ये त्यांची छायाचित्रे प्रकाशित झाली.[१४] १९२७ मध्ये पॅरिस, लंडन आणि न्यू यॉर्क येथे प्रकाशित झालेल्या माय जर्नी टू ल्हासा या पुस्तकामध्ये ही कहाणी आलेली आहे.
१९३७-१९४६: चिनी प्रवास आणि तिबेटला परत
१९३७ मध्ये, वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी, अलेक्झांड्रा डेव्हिड-नीलने ब्रुसेल्स, मॉस्को आणि ट्रान्स-सायबेरियन रेल्वेमार्गे योंगडेनसोबत चीनला जाण्याचा निर्णय घेतला. प्राचीन ताओवादाचा अभ्यास करणे हा त्यांचा उद्देश होता. या दरम्यान दुसऱ्या चीन-जपानी युद्धामध्ये अडकल्या. युद्ध, दुष्काळ आणि महामारीच्या भीषणतेचा त्यांना अनुभव आला. बीजिंग, माऊंट वुताई, हांकौ आणि चेंगडू येथे दीड वर्षात प्रवास केला. ४ जून १९३८ रोजी, त्या पुन्हा तिबेटी शहर ताचिएनलू येथे परतल्या. एप्रिल १९५७ मध्ये, त्यांनी मोनॅको येथे राहण्यासाठी सॅमटेन झोंग सोडले. त्यांची ओळख मेरी-मॅडेलिन पेरोनेट या तरुणीशी झाली, मेरी या नील यांच्या वैयक्तिक सचिव या नात्याने नील यांच्या अखेरपर्यंत काम करत होत्या.[१६]
वारसा
१९२५ मध्ये, नील यांना अकादमी डेस स्पोर्ट्सचा मोनिक बर्लिओक्स पुरस्कार मिळाला. त्या रूढ अर्थाने खेळाडू नसल्या तरी त्या २८७ ग्लोयर्स डु स्पोर्ट फ्रँकाइस (इंग्रजी: ग्लोरीज ऑफ फ्रेंच स्पोर्ट) च्या यादीचा एक भाग आहेत.[१७]
ग्रंथसंपदा
१८९८ पोर ला विए
१९११ ले, मॉडर्निझम बुधिस्त एट ले बौद्धिझम डु बौद्ध
१९२७ व्हॉयेज डी'उन पॅरिसिएन ए ल्हासा (१९२७, माझा ल्हासा प्रवास)
^"A Mystic in Tibet – Alexandra David-Neel". mysteriouspeople.com.
^ abBrodeur, Raymond (2001). Femme, mystique et missionnaire : Marie Guyart de l'Incarnation : Tours, 1599-Québec, 1672 : actes du colloque organisé par le Centre d'études Marie-de-l'Incarnation sous les auspices du Centre interuniversitaire d'études québécoises qui s'est tenu à Loretteville, Québec, du 22 au 25 septembre 1999
^Brodeur, Raymond (2001). Femme, mystique et missionnaire : Marie Guyart de l'Incarnation : Tours, 1599-Québec, 1672 : actes du colloque organisé par le Centre d'études Marie-de-l'Incarnation sous les auspices du Centre interuniversitaire d'études québécoises qui s'est tenu à Loretteville, Québec, du 22 au 25 septembre 1999. Presses Université Laval. ISBN 978-2-7637-7813-6.
^ abHélène Duccini, "La 'gloire médiatique' d'Alexandra David-Néel", Le Temps des médias, 1/2007 (no 8), pp. 130–141.
^Stockwell, Foster (2003). Westerners in China: A History of Exploration and Trade, Ancient Times Through the Present. McFarland. ISBN 9780786414048.