सिलिगुडी (बांग्ला: শিলিগুড়ি) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक प्रमुख शहर आहे. सिलिगुडी बंगालच्या उत्तर भागात कोलकातापासून ५६० किमी अंतरावर महानंदा नदीच्या काठावर स्थित आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले सिलिगुडी ईशान्य भारताचे प्रवेशद्वार मानले जाते. २०११ साली ५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले सिलिगुडी पश्चिम बंगालमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. दार्जीलिंग व सिक्किमच्या जवळच स्थित असल्यामुळे सिलिगुडीला पर्यटनाच्या दृष्टीने देखील मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
वाहतूक
बागडोगरा विमानतळ सिलिगुडीच्या ९ किमी पश्चिमेस असून येथून भारताच्या सर्व प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक ईशान्य भारतातील प्रमुख रेल्वे स्थानक असून आसामच्या गुवाहाटीकडे धावणाऱ्या सर्व गाड्या येथूनच जातात.