लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवककुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही.बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु.ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगाच्या रूपात 'श्री'ची स्थापना झाली. येथूनच 'नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली.
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्ती-करीता जनजागृती व्हावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेवून धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य हाती घेतले. सन इ.स. १९३४ ते इ.स. १९४७ या स्वातंत्र्यपूर्व काळात विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली जात असत. अखिल भारतीय पुढारी शंकरराव देव, कामगार नेते भाई डांगे, एस.एम. मिरजकर, भाई जगताप, हिंदुत्वनिष्ठ अनंतराव गद्रे, मुंबई काँग्रेसचे पुढारी एस.के. पाटील, गो.बा. महाशब्दे, भुलाभाई देसाई अशी राष्ट्रीय विचारसरणीची मंडळी येथे व्याख्याने देऊन जनजागृती करीत असत.
मूर्तीचे वैविध्यपूर्ण स्वरूप
त्याकाळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. इ.स. १९४६ साली 'श्री'ची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखविण्यात आली. इ.स. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. त्यावर्षी मंडळाने पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात 'श्री'ची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. इ.स. १९४८ महात्मा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आली.[२]
मंडळाच्या कार्याचे स्वरूप
इ.स. १९४७ सालानंतर मंडळाच्या कार्याची रुपरेषा साहजिकच बदलण्यात आली. आता मंडळाने राष्ट्रउभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरविले. मंडळाच्या शिलकी निधीतून कस्तूरबा फंड, इ.स. १९४८ साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, इ.स. १९५९ साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला. तसेच श्री पुढील देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले.
इ.स. १९५८ साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला. त्यावेळी `गीता उपदेश' आणि `कालियामर्दन' हे दोन देखावे पाच-पाच दिवसांनी सादर केले. हे अविस्मरणीय देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाच्या व्याख्यानमालेत मुंबई राज्याचे मंत्री नामदार म.ल. पाटील, ना. गणपतराव तपासे, ना. गोविंदराव आदिक, ना.मालोजी निंबाळकर, म्यु.कार्पोरेटर डॉ.नरवणे, नवाकाळचे सहसंपादक गोविंदराव महाशब्दे, प्रकाशचे वसंतराव काटे, कामगार सेवा सदनचे श्री. गोवर्धनदास मपारा, काकासाहेब तांबे यांची व्याख्याने झाली.
समाजातील वाढता प्रभाव आणि प्रसार
इ.स. १९५८ सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. इ.स. १९४८ ते इ.स. १९६८ या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या. श्री सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्रौ पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक. या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तिंचा आदर सत्कार करण्यात येतो. ही प्रथा आजतागायात चालू आहे. तसेच दर्शनोत्सुक भाविकांची व्यवस्था करण्यासाठी विविध मंडळाची जागरण पद्धत सुरू केली. त्याच कालावधीत विभागातील गणेशोत्सव मंडळाबरोबरच कुंभारवाडा, दुर्गादेवी, डंकनरोड, नवी अमृतवाडी, कामाठीपुरा, खेतवाडी या गणेशोत्सव मंडळांशी देखील जिव्हाळयाचे संबंध प्रस्थापित केले ते पुढे दृढ होत गेले व यापुढे आणखी दृढ होत जातील याबद्दल शंका नाही.
मंडळाचे सामाजिक कार्य
मंडळातर्फे व्याख्याने आयोजित केली जातात. ग्रंथालय उपक्रम राबविला जातो.तसेच नेत्र शिबिर,रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांसारखी शिबिरे आयोजित केली आहेत.[३] भारत पाकिस्तान कारगिल युद्धाच्या वेळी सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी 'आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडा'करिता रु. १ लाखाचा धनादेश महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांचेकडे सुपूर्द केला.
संकेतस्थळ
मंडळाने इ.स. २००० साली अधिकृत संकेतस्थळ सुरू केले. मंडळाच्या सदस्यांच्या संकल्पतेने व प्रयत्नाने हे संकेतस्थळ तयार झाले. मंडळाची माहिती, मंडळाचे सामाजिक उपक्रम व लालबागच्या राजाची छायाचित्रे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.[४]
विसर्जन
लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते. मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचते.