या लेखात सत्यापनासाठीअतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीयसंदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते.
मेहेंदळे यांनी महाविद्यालयात प्रवेश करतानाच दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचले होते.[१] मेहेंदळे यांनी संरक्षण व सामरिकशास्त्र या विषयात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठ येथून पूर्ण केले आहे.[ संदर्भ हवा ]१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी युद्धपत्रकार म्हणून काम केले आहे. तत्कालीन पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानच्या सीमांवर जाऊन त्यांनी काम केले. त्या युद्धाचा सखोल अभ्यास व प्रत्यक्ष अनुभव यावरून त्यांनी एक छोटेखानी पुस्तक लिहिले. भारतीय लष्कराने त्यातील काही तपशील त्यांना गाळण्यास सांगितल्यावर मेहेंदळे यांनी त्यास नकार दिला व ते पुस्तक प्रकाशित केले नाही. या प्रकरणामुळे आलेले वैफल्य घालविण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांव एक छोटे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. लष्कराच्या स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रमात ‘शिवाजी’ हा दहा मार्काचा विषय होता. त्या परीक्षेला उपयुक्त होईल असे मार्गदर्शकवजा पुस्तक लिहिण्याचा मेहेंदळे यांचा मानस होता.[१] त्यांनतर ते शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करू लागले.
पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात जाऊन त्यांनी शिवकालीन कागदपत्रांचा अभ्यास केला. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी ते मोडी लिपी, तसेच फारसी, उर्दू, काही प्रमाणात पोर्तुगीज भाषा शिकले. त्यांनी तीस वर्षे या विषयाचा अभ्यास केला[२] व त्यानंतर श्री राजा शिवछत्रपती हा मराठी ग्रंथ व Shivaji His Life and Times हा इंग्लिश ग्रंथ प्रकाशित केला. यापैकी श्री राजा शिवछत्रपती हा द्विखंडात्मक ग्रंथ शिवपूर्वकाळापासून अफजलखानवधापर्यंत माहिती देतो तर 'Shivaji His Life and Times' हा ग्रंथ शिवपूर्वकाळापासून शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंतची माहिती देतो. श्री राजा शिवछत्रपती ह्या ग्रंथात शिवचरित्राबरोबरच इतिहासलेखन पद्धती, ऐतिहासिक साधने याविषयांवर देखील विस्तृत प्रकरणे आहेत.[ संदर्भ हवा ]