वेस्ट बँक (जुड़िया आणि समारिया) हा मध्यपूर्वेतील एक वादग्रस्त भूभाग आहे. वेस्ट बँक व गाझा पट्टी हे दोन पॅलेस्टाईनचे प्रांत मानले जातात. वेस्ट बँक प्रांत जॉर्डन नदीच्या पश्चिम काठावर वसला आहे. वेस्ट बँकच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला इस्रायल देश आहे व पूर्वेला जॉर्डन आहे. १९४८ ते १९६७ दरम्यान वेस्ट बँक जॉर्डनच्या ताब्यात होता, पण १९६७ साली झालेल्या इस्रायल-अरब युद्धानंतर इस्रायलने वेस्ट बँकवर कब्जा मिळवला.
वेस्ट बँक प्रदेश एकूण ५,६४० वर्ग किमी क्षेत्रफळ जमिनीवर वसला आहे व त्याची लोकसंख्या २३,४५,००० आहे ज्यातील बहुतांशी लोक अरब मुस्लिम आहेत. वेस्ट बँक सध्या कोणत्याच देशाचा सार्वभौम भाग नसल्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था इस्रायलच्या ताब्यात आहे.