लिवरपूल फुटबॉल क्लब हा प्रिमियर लीग फुटबॉल मधील लिवरपूल, इंग्लंड स्थित क्लब आहे. हा क्लब इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब असून त्यांनी इतर कोणत्याही क्लब पेक्षा जास्त युरोपियन कप जिंकलेले आहेत. आजवर सहा युरोपियन कप, तीन युरोप लीग आणि तीन युएफा सुपर कप जिंकलेले आहेत. तसेच त्यांनी १८ सर्वसाधारण लीग विजेतेपद, सात एफए कप , आठ लीग कप, आणि १५ एफए कम्युनिटी शील्ड्स जिंकलेले आहेत. असे जरी असले तरी प्रिमियर लीगला १९९२ साली सुरुवात झाल्यापासून त्यांना ती जिंकता आली नव्हती. २०२० मध्ये करोना महामारीमध्ये झालेल्या या लीगमध्ये तब्बल 30 वर्षांनी त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली. [१]
संघाची स्थापना १८९२ साली झाली आणि पुढच्याच वर्षी त्यांचा फुटबॉल लीग मध्ये समावेश झाला. स्थापना झाल्यापासूनच त्यानी एन्फिल्ड वर सामन्यांचे आयोजन केले आहे. लिवरपूल संघाने इंग्लंड आणि युरोपमधील एक अत्यंत बलशाली फुटबॉल संघ म्हणून स्वतःला १९७०-८० च्या दरम्यान प्रस्थापित केले. या काळात बिल शांकली आणि बॉब पेस्ली यांच्या नेतृत्वाखाली संघाने ११ लीग करंडक आणि सात युरोपियन ट्रोफिज जिंकल्या. राफा बेनिटेज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार स्टीवन जेरार्ड याच्या नेतृत्वाखाली मध्यंतराला ३-० ने पिछाडीवर असतानाही २००५ साली एसी मिलान संघाविरुद्ध सामना जिंकून लिवरपूल पुन्हा एकदा युरोपियन विजेते बनले.
२०१३-१४ साली लिवरपूल हा जगातील नववा सर्वाधिक मिळकत असेलला फुटबॉल क्लब होता, आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न हे €३०६ मिलियन इतके होते ,[२] आणि २०१५ साली ९८२ मिलियन डॉलर्स इतक्या मुल्ल्यासह जगातील आठवा सर्वात श्रीमंत फुटबॉल संघ होता. [३]
या संघाचे समर्थक हे दोन अतिशय दुःखद अशा घटनांचे साक्षीदार राहिलेले आहेत. या पैकी पहिली म्हणजे १८९५ साले घडलेली हेसेल स्टेडियम दुर्घटना जिथे स्टेडियममधील एक भिंत कोसळून त्याखाली ३९ समर्थक मारले गेले होते . यामध्ये बहुतांशी समर्थक हे इटालियन आणि जूवेंटस या संघाचे समर्थक होते. या घटनेनंतर सर्व इंग्लिश संघांना सर्व प्रकारच्या युरोपियन स्पर्धांमधून पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. दुसरी घटना म्हणजे १९८९ सालची हिल्सबोरो दुर्घटना ज्यामध्ये मैदानात चेंगराचेंगरी होऊन लिवरपूलचे ९६ समर्थक प्राणास मुकले होते. १९६४ साली संघाने आपला लाल शर्ट आणि पांढरी चड्डी हा पोशाख बदलून सर्व लाल केला,जो आजतागायत तसाच आहे. "यू विल नेवर वॉक अलोन" हे या संघाचे स्फूर्तीगीत आहे
क्लबचा इतिहास
लिवरपूल फुटबॉल संघाची स्थापना ही एव्हर्टन फुटबॉल संघाचे प्रशासक आणि क्लबचे अध्यक्ष व एन्फिल्ड या जमिनीचे मालक जॉन हुल्डींग यांच्यातील वादामुळे झाली. स्टेडीयममध्ये आठ वर्षे घालवल्यानंतर १८९२ साली एव्हर्टन संघाचे गूडीसन पार्क येथे स्थलांतर झाले आणि हुल्डींग यांनी एन्फिल्ड मैदानावर खेळण्यासाठी लिवरपूल फुटबॉल क्लब या संघाची स्थापना केली. [४] संघाचे मूळ नाव जे "एव्हर्टन फुटबॉल क्लब आणि एथलेटिक्स ग्राउंड " असे होते ते मार्च १८९२ मध्ये लिवरपूल फुटबॉल क्लब असे करण्यात आले. फुटबॉल असोसिएशन ने एव्हर्टन या नावास नकार दिल्यानंतर साधारण तीन महिन्यानंतर लिवरपूल फुटबॉल क्लब या नावासस औपचारिक मान्यता मिळाली. संघाने पदार्पणाच्या हंगामातच लँकेशायार लीग ही स्पर्धा जिंकली आणि १८९३-९४ च्या फुटबॉल लीगच्या द्वितीय श्रेणीत प्रेवेश केला. यामध्ये देखील प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर संघाने प्रथम गटात प्रवेश केला आणि १९०१ साली तसेच पुन्हा १९०६ साली ती लीग जिंकली.
लिवरपूल फुटबॉल संघ २०२० मध्ये इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले. करोना संकटकाळात सर्व स्पर्धांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र २०२० मध्ये काही देशांत फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या. त्या वेळी लिवरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले होते. १९९० नंतर तीस वर्षांनी लिवरपूलने हे विजेतेपद मिळविले.