राइशस्टागची आग (जर्मन: Der Reichstagsbrand, डेर राइश्टाग्स्ब्रांड ;) हा फेब्रुवारी २७, इ.स. १९३३ रोजी जर्मन संसदेवर झालेला जळिताचा प्रकार होता. आगीच्या दिवशी २१:२५ वाजता राइशस्टागाच्या इमारतीला आग लागल्याचा संदेश बर्लिन अग्निशामक केंद्राला मिळाला. मात्र पोलीस व अग्निशामक दल पोचेपर्यंत मुख्य सभागृह ज्वाळांमध्ये लपेटले होते.
पोलीस तपासांती मारिनुस फान देर लूबे हा साम्यवादी विचारसरणीचा बेरोजगार गवंडी या जळीतकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्या सुमारास फान देर लूबे राजकीय हालचाली घडवून आणण्यासाअठी जर्मनीत येऊन नुकताच दाखल झाला होता. जर्मन शासन उलथवण्यासाठी साम्यवाद्यांची कटकारस्थाने चालू आहेत, असा साम्यवाद-विरोधी प्रचार करण्यासाठी या घटनेमुळे नाझी समर्थकांच्या हाती कोलीत मिळाले. परिणामी नाझी पक्षाचीजर्मन राजकारणावरील पकड घट्ट झाली.