मैसुरु दसरा हा कर्नाटकातील शासकीय सण आहे. या सणाला कन्नडमध्ये नदहब्बा म्हणतात. एका आख्यायिकेनुसार या दिवशी चामुंडेश्वरी देवीने दैत्य महिषासुर दैत्याचा वध केला. अशा प्रकारे सुष्टांनी दुष्टांवर विजय मिळवला आणि म्हणूनच या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणतात. महिषासुराच्या नावावरूनच या प्रदेशाला मैसूर नाव मिळाले असे लोक मानतात. मैसूर दसरा १५ व्या शतकात विजयनगरच्या राजांनी श्रीरंगपट्टण येथे सुरू केला. वडियार राजघराण्यातील पहिला राजा वडियार यांनी ही परंपरा पुढे सुरूच ठेवली. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी वडियार राजघराण्यातील दांपत्य म्हैसूरमधील चामुंडी पर्वतावरील चामुंडी मंदिरात श्री चामुंडेश्वरी देवीची यथासांग पूजा करीत. १८०५ सालापासून तिसऱ्या कृष्णराज वडियार महाराजांनी म्हैसूर राजभवनावर हा दरबार भरवण्यास सुरुवात केली होती. आजही वडियार घराण्याचे वारस यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार दसऱ्याच्या दिवशी खाजगी दरबार भरवून ही प्रथा पाळतात. नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे महानवमीच्या दिवशी राजघराण्यातील तलवारींची पूजा करून हत्ती, घोडे व उंटाची मोठी मिरवणूक काढली जाते.