पाब्लो पिकासो (२५ ऑक्टोबर, इ.स. १८८१ - ८ एप्रिल, इ.स. १९७३) हा युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होता. पिकासो हा चित्रकलेतील त्याच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोकडे जाते.
जन्म आणि बालपण
पिकासोचा जन्म स्पेनमधल्याआंदालुसिया प्रांतातील मालागा ह्या शहरात झाला. कलेचा वारसा पिकासोला त्याच्या वडिलांकडूनच मिळाला. चित्रकलेत जात्याच हुशार असणा़ऱ्या पिकासोने लहानपणी चित्रकलेत अनेक बक्षिसे मिळवली होती.
तारुण्य
वयाच्या १९ व्या वर्षी पिकासो युरोपातील कलेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पॅरिस शहरात येऊन दाखल झाला. नवीन देश, नवीन लोक ह्यांमुळे आलेला उपरेपणा, बरोबर रहात असलेल्या जिवलग मित्राची आत्महत्या, त्याने तरुण मनावर झालेला खोल परिणाम आणि एकाकीपणा ह्या सगळ्या भावना पिकासोच्या ह्या काळातील चित्रांमध्ये दिसून येतात.[१]