पहिली बौद्ध संगीती किंवा पहिली बौद्ध परिषदइ.स.पू. ४८७ मध्ये अजातशत्रू राजाच्या आश्रयाने व महाकश्यकभिक्खूच्या अध्यक्षतेखाली राजगृह येथे भरली होती. बुद्धांच्या निर्वाणानंतर बौद्ध भिक्खू व भिक्खुणींसाठी विनय अथवा वर्तणुकीचे नियम करणे आवश्यक होते. यास्तव भगवान बुद्धांची शिकवण, वक्तव्ये व उपदेश यांचे एकत्रीकरण करून नियम निर्मितीसाठी ही पहिली बौद्ध परिषद महाकश्यप, नामक बौद्ध ज्ञानियाने बोलाविली. सभेला फार मोठा शिष्यवृंद जमला होता. बौद्ध धम्म नियमांविषयी सभेत वादविवाद झाला आणि सुत्तपिटक व विनयपिटक ह्या दोन धम्मग्रंथाची निर्मिती झाली. या कामी आनंद व उपाली या विद्वान भिक्खूंनी मोलाची मदत केली. नियमभंग करणाऱ्यास योग्य दंड ठरण्यात आला. हर्यंकवंशी मगधसम्राट अजातशत्रू (इ.स.पू. ४९३ - ४६२) याने ह्या सभेला सर्व प्रकारचे साहाय्य केले.