डेव्हिड बेकहॅम (इंग्लिश: David Beckham; २ मे १९७५) हा एक निवृत्त इंग्लिश फुटबॉलपटू आहे. १९९६ ते २००९ दरम्यान इंग्लंड राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला बेकहॅम जगातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. बेकहॅमने १९९२ साली वयाच्या १७व्या वर्षी मॅंचेस्टर युनायटेड ह्या क्लबासोबत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्या काळात मॅंचेस्टर युनायटेडने सहा वेळा प्रीमियर लीग, दोन वेळा एफ.ए. चषक तर १९९९ साली युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकली. २००३ ते २००७ दरम्यान ला लीगामधील रेआल माद्रिदसाठी चार वर्षे खेळल्यानंतर बेकहॅमने २००७ साली अमेरिकेच्या मेजर लीग सॉकरमध्ये खेळणाऱ्या लॉस एंजेल्समधील लॉस एंजेल्स गॅलेक्सी ह्या क्लबासोबत करार केला. २०१३ साली पॅरिसमधील पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. सोबत एक वर्षे खेळल्यानंतर १८ मे २०१३ रोजी बेकहॅमने निवृत्ती जाहीर केली.
बेकहॅमने १ सप्टेंबर १९९६ रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. तो सहा वर्षे इंग्लंड संघाचा कर्णधार होता. त्याने १९९८, २००२ व २००६ ह्या तीन फिफा विश्वचषक तसेच २००० व २००४ ह्या दोन युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
प्रसिद्ध ब्रिटिश मॉडेल व गायिका व्हिक्टोरिया बेकहॅम ही डेव्हिड बेकहॅमची पत्नी आहे.
बाह्य दुवे