डेव्हिड विल्यम डॉनल्ड कॅमेरॉन (इंग्लिश: David William Donald Cameron; जन्मः ९ ऑक्टोबर १९६६) हा युनायटेड किंग्डम देशातील एक राजकारणी, माजी पंतप्रधान व हुजूर पक्षाचा माजी पक्षाध्यक्ष आहे. मे २०१० मध्ये घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकांमध्ये हुजूर पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पक्षाध्यक्ष डेव्हिड कॅमेरॉन ह्याची पंतप्रधान पदावर नियुक्ती करण्यात आली. मे २०१५ सालच्या सांसदीय निवडणुकीमध्ये हुजुर पक्षाने पुन्हा बहुमत मिळवल्यामुळे कॅमेरॉन पंतप्रधानपदावरच राहिला.
ऑक्सफर्ड विद्यापीठामधून तत्त्वज्ञान, राजकारण इत्यादींचे शिक्षण घेणारा कॅमेरॉन १९८८ साली हुजुर पक्षाचा सदस्य बनला व त्याने अनेक वरिष्ठ पक्षनेत्यांच्या सल्लागाराचे काम पाहिले. १९९७ साली स्टॅफर्ड मतदारसंघामधून संसद निवडणुक लढवणारा कॅमेरॉन पराभूत झाला परंतु २००१ साली तो ऑक्सफर्डशायरच्या व्हिटनी मतदारसंघातून संसदेवर निवडून आला. हुजुर पक्षमध्ये झपाट्याने प्रगती करणारा कॅमेरॉन २००५ साली पक्षाध्यक्ष व विरोधी पक्षनेता बनला. २०१० सालच्या निवडणुकीनंतर कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे ब्रिटिश संसदेमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या हुजुर पक्षाने लिबरल डेमोक्रॅट्स पक्षाला हाताशी धरून सरकार स्थापन केले व ४३-वर्षीय कॅमेरॉन ब्रिटनचा ७५वा पंतप्रधान बनला. कॅमेरॉनच्या अध्यक्षतेखाली २०१५ सालच्या निवडणुकीमध्ये हुजुर पक्षाने ६५० पैकी ३३१ जागांवर विजय मिळवून १९९२ नंतर प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवले.
युरोपियन संघामधील ब्रिटनचे सदस्यत्व चालू ठेवावे का ब्रिटनने संघामधून बाहेर पडावे (ब्रेक्झिट) ह्या मोठ्या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी २०१५ मध्ये कॅमेरॉनने सार्वत्रिक जनमत घेण्याची घोषणा केली. कॅमेरॉनचा वैयक्तिक कल ब्रिटनने ईयूमध्येच राहावे ह्याकडेच होता व त्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपले राजकीय वजन खर्च केले होते. २३ जून २०१५ रोजी युनायटेड किंग्डममध्ये ह्या प्रश्नावरून जनमत (referendum) घेण्यात आले. ह्या जनमतामध्ये सुमारे ५२ टक्के ब्रिटिश नागरिकांनी ईयूमधून बाहेर पडण्याचा कौल दिला.
ह्या जनमताचा प्रतिकूल निकाल लागल्यामुळे कॅमेरॉनची राजकीय अवस्था बिकट झाली व त्याने पंतप्रधानपदाचा राजीनाम देणार असल्याचे घोषित केले. ब्रिटनला ईयूमधून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण गुंतणार नसल्याचे त्याने आधीच स्पष्ट केले होते. ११ जुलै २०१६ रोजी वरिष्ठ पक्षनेती थेरीसा मे हिची हुजूर पक्षाच्या पक्षप्रमुखपदी निवड झाली. १३ जुलै २०१६ रोजी कॅमेरॉनने अधिकृत रित्या पंतप्रधानपद सोडले व मेकडे सत्ता सुपूर्त केली.
बाह्य दुवे