१९७० च्या दशकात आल्स्टॉम ह्या फ्रेंच कंपनीने टीजीव्ही प्रकल्पाचा विकास केला व २७ सप्टेंबर १९८१ रोजी पहिला टीजीव्ही रेल्वे पॅरिस व ल्योन शहरांदरम्यान धावली. उद्घाटनाच्या वेळी टीजीव्ही ही जगातील केवळ चौथी दृतगती रेल्वे होती. सध्या टीजीव्ही ही जगातील सर्वात वेगवान पारंपारिक (मॅग्लेव्हचा अपवाद वगळता) रेल्वे आहे. ३ एप्रिल २००७ रोजी टीजीव्हीने ५७४.८ किमी/तास (३५७.२ मैल/तास) इतक्या वेगाचा विक्रम नोंदवला.[१] आजवर टीजीव्हीने वेगाचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
सुरुवातीला मिळालेल्या प्रचंड यश व लोकप्रियतेमुळे फ्रान्समध्ये विसाव्या शतकाच्या अखेरीस अनेक टीजीव्ही मार्ग चालू करण्यात आले. सध्या फ्रान्समध्ये १,८९७ किमी लांबीचे टीजीव्हीसाठी बनवण्यात आलेले विशेष लोहमार्ग अस्तित्वात असून ९ मार्गांवर टीजीव्ही सेवा कार्यरत आहे. अनेक टीजीव्ही मार्ग फ्रान्सला युरोपातील इतर देशांसोबत जोडतात, ज्यांमध्ये चॅनल टनेलमधून धावणाऱ्या व इंग्लंडला फ्रान्स व बेल्जियमसोबत जोडणाऱ्या युरोस्टार ह्या सेवेचा समावेश आहे.