जागतिक वन दिवस (International Day of Forests) हा दरवर्षी २१ मार्चला साजरा करण्यात येतो.[१]संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जिवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.[२]
पार्श्वभूमी
झाडे ही जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. परंतु दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टर (३२ दशलक्ष एकर) पेक्षा जास्त जंगले नष्ट होत आहेत, हे क्षेत्र जवळ-जवळ अंदाजे इंग्लंडच्या आकाराचे आहे.[३] जशी जंगले नष्ट होतात, तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात: जंगलतोडीमुळे जगातील १२-१८ टक्के कार्बन उत्सर्जन होते – जे जवळजवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीचे आहे.[४][५][६] तितकीच महत्त्वाची, निरोगी जंगले ही जगातील प्राथमिक 'कार्बन शोषकां'पैकी एक आहेत.[७][८]
आज, जंगलांनी जगाच्या ३०% पेक्षा जास्त भूभाग व्यापला आहे आणि त्यात ६०,००० पेक्षा जास्त वृक्षांच्या प्रजाती आहेत, ज्यात अद्याप अनेक प्रजाती या अज्ञात आहेत.[९][१०][११] स्थानिक आदिवासी लोकांसह अंदाजे जवळपास जगातील १.६ अब्ज गरीब लोकांना जंगलांमार्फत अन्न, लाकुड, पाणी आणि औषधे यांची सोय होते.[१२][१३]
भारतासारख्या कृषिप्रधान देशात तर वनांचे विशेष महत्त्व आहे. केवळ एक इंच जमिनीचा सुपीक थर निर्माण होण्यासाठी शेकडो वर्षाचा काळ लोटावा लागतो. परंतु जमिनीची धूप वनांच्या अभावामुळे केवळ एखाद्या पावसाळयातच होऊ शकते. म्हणून वनांच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे वनांना शेती व्यवसायात मोलाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समृद्ध वनांनी फार मोठा हातभार लावला आहे पण, एकेंकाळी उन्नत असलेली मेसापोटेमिया, सिरिया व पॅलेस्टाईन अशी अनेक वनसंहाराने उजाड झाली आहेत, हे एक कटु सत्य आहे. हवामान बदलांशी जुळवून घेणे तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वन-परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. हवामान बदलास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंना (ग्रीन हाउस गॅसेस) शोषून घेण्याचे तसेच जागतिक तापमानवाढ व ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचे काम वनांकडून केले जाते.[१]
ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलाला नोव्हेंबर २०१९ आणि मे २०२० मध्ये भीषण आगी लागली होती. जवळपास तीन आठवडे हे जगातले सर्वात मोठे जंगल जळत राहिले. अॅमेझॉनच्या ‘जंगलाला आग’ याचा अर्थ पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठा स्रोतास हानी होत आहे. अॅमेझॉनचे जंगल ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मीळ प्रजाती फक्त अॅमेझॉनमध्ये आढळतात. जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचीच केवळ हानी होते असे नाही, तर वन उपजाची क्षमताही कमी होते. जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते. पाण्याची पातळी खाली जाते. वन्यजीवांची होरपळ होते. वन्य प्राणी एकतर भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्येही अशा बऱ्याच घटना होत आहेत. [१४]
इतिहास
सर्वप्रथम, लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी “२१ मार्च”हा दिवस “जागतिक वन दिन” म्हणून १९७१ मध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली.[१] जागतिक वन दिन साजरा करण्यामध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचासुद्धा मोलाचा वाटा आहे.[२]संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला.
दरवर्षी संयुक्त राष्ट्रातर्फे जागतिक वन दिनानिमित्त एक घोषवाक्य जाहीर केले जाते आणि नंतर वर्षभर त्या घोषवाक्यावर कृतिशील कार्य करून जगभरात वन संवर्धनाच्या शिक्षणाचे कार्य व जागरुकता पसरवण्याचे काम केले जाते. २१ मार्च २०२२ या जागतिक वन दिवसाचे घोषवाक्य आहे ‘‘शाश्वत वननिर्मिती आणि त्याचा योग्य वापर’’. वनांची निर्मिती शाश्वत आणि कायम असावी आणि त्यामधून जैवविविधता समृद्ध व्हावी हा या घोष वाक्याचा साधा सरळ अर्थ आहे.[२]