चीनचा कम्युनिस्ट पक्ष (चिनी: 中国共产党; Communist Party of China (CPC)) हा चीन देशामधील एकमेव राजकीय पक्ष आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची एकछत्री राजवट असून देशाची सर्व धोरणे हा पक्ष ठरवतो. चीनच्या संविधानामध्ये कम्युनिस्ट पक्षाला कायदेशीर रित्या सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. षी चिन्पिंग हे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व पर्यायाने चीनमधील सर्वोच्च नेते आहेत.
कम्युनिस्ट पक्षाची स्थापना १९२१ साली शांघाय येथे झाली. १९२७ ते १९५० ह्या प्रदीर्घ काळ चाललेल्या गृहयुद्धामध्ये कम्युनिस्ट पक्षाने क्वोमिटांग ह्या प्रतिस्पर्धी पक्षाचा पराभव करून संपूर्ण चीनवर अंमल मिळवला व क्वोमिटांगला तैवानमध्ये हाकलुन लावले. १९६० च्या शतकादरम्यान तंग श्यावफिंगने कम्युनिस्ट पक्षाची अनेक धोरणे ठरवली.
कम्युनिस्ट पक्षाची ध्येये साम्यवादावर आधारित आहेत. साम्यवादाच्या जोडीला कम्युनिस्ट पक्षाने भांडवलशाहीचाही मर्यादित स्वीकार केला आहे. सध्या ८ कोटी कार्यकर्ते असलेला कम्युनिस्ट पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. ह्यांमध्ये चीनच्या बव्हंशी लष्करी, प्रशासकीय व सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होतो.
सरचिटणीस
सरचिटणीस हा कम्युनिस्ट पक्षाचा पुढारी व पक्षामधील सर्वोच्च दर्जाचा नेता आहे. कम्युनिस्ट पक्ष हा चीनचा एकमेव पक्ष असल्यामुळे सरचिटणीस हा चीनचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख आहे.