गंधर्व

अप्सरासह गंधर्व (उजवीकडे), दहावे शतक, चाम , व्हिएतनाम

गंधर्व (इंग्रजी :Gandharva संस्कृत आणि हिंदी: गन्धर्व; आसामी: গন্ধৰ্ব্ব, gandharbba; बंगाली: গন্ধর্ব, "gandharba", कन्नड: ಗಂಧರ್ವ; तेलुगू: గంధర్వ; तामिळ: கந்தர்வன், "kantharvan"; मलयाळम: ഗന്ധർവ്വൻ, "gandharvan") हे नाव हिंदू , बौद्ध आणि जैन धर्मातील स्वर्गात राहणारे अर्धदेव प्राणी आहेत. भारतीय शास्त्रीय संगीतातील कुशल गायकांसाठीदेखील ही संज्ञा आहे .[]

विष्णू पुराणानुसार गंधर्वांचे जन्म कश्यप आणि दक्ष प्रजापतीची पुत्री अरिष्टा यांच्यापासून झाले.[]

अप्सरा, किन्नर, यक्ष आणि विद्याधर यांजप्रमाणे गंधर्व हे अर्धदेव समजले जातात. गंधर्व हे गायक आणि वादक असतात. पुराणांत आणि रामायण-महाभारतात आलेल्या काही गंधर्वांची नावे :

उग्रसेन, ऊर्णायू (जैमिनीय व पंचविश ब्राह्मणांत उल्लेखिलेला), ऋतसेन, कलि, चित्ररथ, चित्रसेन, तुंबरू, त्रिशीर्षा, धृतराष्ट्र, पंचशिख (हा एक गंधर्वपुत्र आहे), प्रियदर्शन (हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, विश्व, विश्वावसु (हा गंधर्वांचा राजा आहे), सुदर्शन, सुषेण, सूर्यवर्चा, स्वरवेदिन, हाहा, वगैरे.

पंचशिखा हे एका गंधर्ववीणेचे नाव आहे.

त्रिशीर्षा गंधर्व : हा जहाजांवर रहायचा. देव आणि असुर यांच्या लढाईत कोण जिंकणार हे त्याला माहीत असायचे.


इंद्रसभेत गायनवादन करणारा अतिमानवी योनीतील एक वर्ग. गंधर्व हे ब्रह्मदेवाच्या शिंकेतून निर्माण झाले असे हरिवंशात म्हणले आहे, तर कश्यप व अरिष्टा यांपासून ते उत्पन्न झाल्याचे मत्स्यपुराणात सांगितले आहे. चित्ररथ हा गंधर्वांचा अधिपती आणि इंद्र हा सर्व गंधर्वांचा स्वामी असल्याचे महाभारतात म्हणले आहे.

हा हा, हू हू, चित्ररथ, हंस, विश्वावसू, गोमायू, तुंबरू आणि नंदी असे गंधर्वांचे आठ भेद सांगितले जातात. अग्निपुराणात त्यांचे अकरा गण सांगितले आहेत. तसेच त्यांचे देव व मनुष्य असेही दोन भेद तैत्तिरीय उपनिषदात सांगितले जातात. देवांहून गंधर्वांचा दर्जा तीन पायऱ्यांनी खाली असल्याचे अन्यत्र म्हणले आहे. ऋग्वेदात गंधर्वांचे उल्लेख आहेत पण संख्या दिलेली नाही. यजुर्वेदात त्यांची संख्या २७, तर अथर्ववेदात ती ६,३३३ दिलेली आहे. बारा मासांचे बारा गंधर्व सूर्याचा मार्ग दाखवीत आणि त्याची स्तुती करीत आकाशात फिरतात, असेही म्हणले आहे. अमरकोशात त्यांचा देवयोनीत अंतर्भाव केलेला आहे.

गायनवादन कलेत ते निपुण असून इंद्रसभेत त्यांच्याकडे हेच नेमून दिलेले काम आहे. संगीतकलेस ‘गंधर्ववेद’ म्हणले जाते. संमोहनविद्या, चाक्षुषीविद्या (सूक्ष्मवस्तू मोठ्या स्वरूपात पाहण्याची विद्या) यांसारख्या काही गूढ व दिव्य विद्याही त्यांना अवगत आहेत. अंतराळातील जलसंचय त्यांच्याच ताब्यात असतो. सोमरसाचेही प्रथम तेच अधिपती होते, परंतु पुढे तो देवांनी कपटाने त्यांच्यापासून लांबविला.

गंधर्व हे सर्वांगसुंदर असून त्यांची वेशभूषाही आकर्षक असते. त्यांची शस्त्रे तेजस्वी व घोडे वाऱ्याहूनही वेगवान असतात. ते पाण्यात राहू शकतात व प्रसंगी शेवाळेही खातात. त्यांना फुलांचे, विशेषतः कुंदफुलांचे, वेड आहे. अप्सरा त्यांच्या स्त्रिया असल्या, तरी भूलोकीच्या लावण्यवतींचेही त्यांना फार आकर्षण आहे. त्यांना हस्तगत करण्यासाठी ते तऱ्हेतऱ्हेचे इंद्रजाल व कपट अवलंबितात. ते विमानातून अप्सरांसहित संचार करतात. मानवांना भुरळ पाडून फसविण्याची व संकटात पाडण्याची त्यांना खोड आहे. तशी भुरळ पडू नये म्हणून लोकांनी अजशृंगी नावाची वनस्पती, अथर्ववेदातील एका मंत्राने सिद्ध करून स्वतःजवळ बाळगावी असे म्हणतात.

बौद्ध व जैन साहित्यांत गंधर्वांचे विपुल उल्लेख आढळतात. जैन साहित्यात त्यांना व्यंतर लोकातील देव मानले आहे. जैन देवतांतील एका यक्षासही ‘गंधर्व’ असे नाव आहे. भारतातील विविध चित्र-शिल्प शैलींत त्यांची अनेक सुंदर चित्रे व शिल्पे आढळतात.

उत्तर प्रदेशात गंधर्व नावाची एक जातही आहे.

एकमेकांच्या प्रेमपाशात सापडून एकांती प्रणयी युग्माने पार पाडावयाच्या विवाहास ‘गांधर्व विवाह’ अशी संज्ञा आहे. आठ विवाह-प्रकारांपैकी हा एक प्रकार स्मृतिकारांनी मानला आहे.

गंधर्व ह्या पदवीने ओळखले जाणारे शास्त्रीय संगीत गायक

अन्य गायक आणि त्यांच्या उपाध्या

  • गानकोकिळा लता मंगेशकर
  • गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर
  • गानसरस्वती किशोरी आमोणकर
  • गायनहिरा हिराबाई बडोदेकर
  • तालयोगी सुरेश तळवलकर
  • नूतन पेंढारकर मास्टर दामले
  • संगीतचंद्रिका मधुवंती दांडेकर
  • संगीतभूषण राम मराठे
  • संगीतमार्तंड पं. जसराज
  • संगीतरत्न रामदास कामत
  • सूरश्री केसरबाई केरकर
  • स्वरभास्कर भीमसेन जोशी
  • स्वरयात्री गजानन वाटवे, दत्ता वाळवेकर

संदर्भ यादी

  1. ^ "Gandharva". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-17.
  2. ^ "गंधर्व - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2020-01-26 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!