इंटरस्टेट ७० तथा आय-७० हा अमेरिकेतीलमहामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यातून पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता मेरिलँड राज्यातील बाल्टिमोर शहराला युटा राज्यातील कोव्ह फोर्ट गावाशी जोडतो. हा महामार्ग रॉकी पर्वतरांगेच्या पूर्वेला साधारणपणे यू.एस. ४० या आधी अस्तित्त्वात असलेल्या महामार्गावरून किंवा समांतर बांधलेला आहे तर रॉकी पर्वतरांगेतून आणि पश्चिमेस अनेक छोट्या रस्त्यांच्या वाटेवरून बांधलेला आहे.
आय-७०चा कॅन्सस आणि मिसूरीमधील एक भाग इंटरस्टेट सिस्टमचा बांधलेला पहिला भाग असल्याचे समजले जाते.[१] फेडरल हायवे अॅडमिनिस्ट्रेशन अनुसार कॉलोराडोच्या ग्लेनवूड कॅन्यनमधून काढलेला रस्ता इंटरस्टेट सिस्टमच्या मूळ आखणीतील शेवटचा टप्पा होता.[२] रॉकी पर्वतांमध्ये कॉन्टिनेन्टल डिव्हाइड पार करण्यासाठी बांधलेला आयझेनहोवर बोगदा ११,१५८ फूट (३,४०१ मी) उंचीवर असून संपूर्ण इंटरस्टेट सिस्टममधील हा सर्वोच्च बिंदू आहे.
यानंतर हा महामार्ग ग्लेनवूड कॅन्यन या घळीत शिरतो. नदीने हजारो वर्षे पर्वत झिजवत तयार केलेली ही घळ अतिशय खोल आणि अरुंद आहे आणि येथून रस्ता बांधणे, महामार्ग दूरच, हे महाकठीण काम होते. अवघड प्रदेश, प्रचंड वेगात वाहणारी नदी, आधीच असलेला रेल्वेमार्ग आणि अगदी अरुंद जागा अशा अडचणींवर मात करीत १९९२मध्ये रस्त्याचा २८ किमी (१५ मैल) लांबीचा हा भाग बांधून पूर्ण झाला. यासाठी इंटरस्टेट महामार्गांवर असलेल्या निकषांपेक्षा तीव्र वळणे, कमी लांबचे दृष्टिपथ, ५० मैल/तास महत्तम वेग आणि इतर तडजोडी करायला लागल्या आहेत. हा रस्ता बांधताना आधीच असलेल्या डेन्व्हर अँड रियो ग्रँड वेस्टर्न रेलरोडचा रेल्वेमार्ग आणि यू.एस. ६ या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यास मनाई होती. याला रस्त्ता अभियांत्रिकीचे एक नवल मानले जाते. इंटरस्टेट सिस्टमच्या मूळ आराखड्यातील हा शेवटचा भाग होता.
तेथून पुढे व्हेल घाट पार करीत हा रस्ता रॉकी पर्वतरांगेच्या माथ्यावर येतो. डोंगर ओलांडण्यासाठी येथे आयझेनहोवर बोगदा बांधण्यात आलेला आहे. हा वाहनांची नियमित वाहतूक करणारा इंटरस्टेट मार्गांवरील सगळ्यात उंचीवरचा बोगदा आहे. डोंगराखालून या बोगद्यातून जाताना आय-७० कॉन्टिनेन्टल डिव्हाइड पार करतो आणि रॉकी पर्वतरांगेच्या उच्च शिखरांच्या पूर्वेस बाहेर पडतो. तीव्र उतार आणि वळणे घेत हा रस्ता कॉपर माउंटन, व्हेल, ब्रेकेनरिज आणि इतर अनेक स्की रिसॉर्टच्या जवळून डेन्व्हरच्या दिशेने उतरतो.
लुकआउट माउंटननंतर एक शेवटचा तीव्र उतार पार करीत आय-७० गोल्डन येथे मैदानी प्रदेशात येतो वर डेन्व्हर महानगरात शिरतो. डेन्व्हर शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ आय-७० हा आय-२५ आणि आय-७६ या इतर इंटरस्टेट महामार्गांना छेद देतो. याशिवाय सी-४७० आणि ई-४७० हे महामार्ग आय-७० पासून डेन्व्हर महानगराभोवती वळसा घालीत परत मिळतात.
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळून पूर्वेकडे जाणारा रस्ता दक्षिण-आग्नेय दिशेकडे वळतो व सुमारे ५० किमी (३० मैल) या दिशेने धावल्यावर लायमन शहराजवळील यू.एस. २४च्या तिठ्यापासून पुन्हा पूर्वेकडे वळतो. येथून हा रस्ता सपाट प्रदेशातील प्रचंड शेतांमधून कॅन्ससच्या सीमेपर्यंत जातो. बर्लिंग्टनजवळ हा रस्ता कॅन्ससमध्ये शिरतो.
आय-७० कॅन्ससमध्येकॉलोराडोमधून पश्चिमेकडून शिरतो. प्रेरी आणि शेतजमिनीमधून हा रस्ता ४२४ मैल थेट पूर्वेकडे जातो. संपूर्ण कॅन्सस राज्याच्या मध्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या या रस्त्याला कॅन्ससची मुख्य गल्ली असेही म्हणतात. कॅन्ससमधील बव्हंश शहरे आय-७०वर आहेत.
सलायना शहरात आय-७० आणि आय-१३५चा तिठा आहे तर टोपेकामध्ये दोन वेळा आय-७० आणि आय-४७० एकमेकांना मिळतात. यांतील पूर्वेकडील चौकापासून कॅन्सस सिटीपर्यंत आय-७०वर टोल आहे. यांच्या दरम्यान लॉरेन्स शहर आहे. आय-३३५ हा जोडरस्ता टोपेकापासून एम्पोरियापर्यंत जातो व तेथे आय-३५ला मिळतो. बॉनर स्प्रिंग्ज जवळील आय-४३५ बरोबर असलेल्या चौकातून थेट प्रवासी या रस्त्याने कॅन्सस सिटीच्या मध्यवर्ती भागातील गर्दी टाळून पुढे परत आय-७०वर येऊ शकतात. आय-६३५ हा जोडरस्ता आय-३५ला आय-२९शी जोडतो. याच्या पुढे आय-७०ला लागून युनियन पॅसिफिक रेलरोड या रेल्वे कंपनीचे यार्ड आहे. [४]
येथे आय-२७० हा शहराभोवतीचा वर्तुळाकृती मार्ग आय-७०ला शहराच्या पूर्वेस आणि पश्चिमेस पार करतो. शहरमध्यात आय-७१ येथून वेगळा होतो. या परिसरात नेहमी वाहतूकीची कोंडी झालेली असते. आय-७०पासून आय-६७० द्वारे जॉन ग्लेन कोलंबस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाता येते. अजून पूर्वेस आय-७० झेन्सव्हिल, कॅम्ब्रिज शहरांतून ओहायोकडे जातो.