आषाढी वारी (पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.[१] 'वारकरी संप्रदाय' म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.[२] या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.[३] वारी हा एक आनंद सोहळा असतो.[४][५]
आषाढी वारी म्हणजे काय?
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.[४][६] वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.[७][८] ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.[९]संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.[१०] वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हणले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.[११]
माळकरी/वारकरी
वारी करणाऱ्या व्यक्तीस 'वारकरी' म्हणतात.
भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात.[४] आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.
'स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी करावी तसेच एकादशीव्रत करावे.
सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे' असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.[१२]
वारकरी महावाक्य-
वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवतुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ 'भगवान' की जय" असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी "माउली ज्ञानेश्वर महाराजकी जय" , "जगद्गुरू तुकाराम महाराजकी जय", "शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय" अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हणले जाते.
वारीचा इतिहास
पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे.[१३] तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले.[१४] हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती.[१५]
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे."[१२]
ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल-
हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते. हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते.[१९]
ज्ञानदेवांची पालखी :- हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटा[२०] ने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.[२१] तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे.[२२] श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे.[ संदर्भ हवा ] या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे.[ संदर्भ हवा ] पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.[ संदर्भ हवा ]
तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले.[२३] वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात.[१८] महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.ज्ञानोबा -तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात.[२४]
दिंडी योजना
वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी; पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.[२५] वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते.
पालखी रथ
हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलांकडे असते. ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात. खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर, धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते.[२६] यामध्ये एक कमिटी देखील काम करते कि जी बैलजोडी निवडणे आणि सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देते.[२७] या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरांची टीम देखील असते कि जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिल्लार बैलांची आरोग्याची काळजी घेतात. तसेच जर बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर बैलांच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केले जाते. एक विशेष बाब सांगायची झाली तर भारतीय गोवंश भरपूर आहेत, पण या पालखी सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे.
ज्ञानदेवांची पालखी :- माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त ६ कुटुंबालाच मिळतो.[२८]आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालूं आहे. पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना १८ दिवसाचा प्रवास असतो.रथापुढे दिंडी क्र १ व ७ हा वै गुरुवर्य ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब आबासाहेब महाराज वासकर यांचा मान आहे.रथामधे फक्त २ खिल्लार बैलच संपूर्ण प्रवास पूर्ण करतात आणि परतीच्या वारीला देखील तीच २ बैल पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन येतात. जेव्हा माउलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जात असतो तेव्हा १८ दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून आळंदी येथे येत असतो.
तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात. यामध्ये रीतसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करतात. दरवर्षी २ वेगवगेळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो.[२९] दोन कुटुंबाला मान दिल्या मुळे याचा फायदा खिल्लार बैलांना असा होतो कि, पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात, त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळतो. अशा प्रकारे खिल्लार बैलांच्या साहाय्याने हा पालखी सोहळा सुंदररीत्या पार पाडतो. जेव्हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूरला जात असतो तेव्हा १८ ते १९ दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून देहू येथे येत असतो.
वारीचे /पालखी सोहळ्याची वैशिष्ट्ये
रिंगण-
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते.[३०][३१] कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे.[३२] मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.[९]
धावा-
धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.[९]
आळंदी-पुणे-सासवड- लोण्ंद- फलटण - नातेपुते-माळशिरस- वेळापुर- भंडिशेगा-वाखरि-पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते.वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण होते.[३३][३४]
वारी सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत.अशी परतवारी नित्यनेमाने करणारे सुधीर महाबळ यांनी या विषयावर 'परतवारी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.[३६]
देहू-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक
देहू-पुणे-लोणीकाळभोर, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरी, पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते. वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.
* देहू-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक
दिवस
तिथी
प्रारंभाचे ठिकाण
पहिली विश्रांती
दुपारचे जेवण
दुसरी विश्रांती
रात्रीचा मुक्काम
१
ज्येष्ठ वद्य ७
--
--
--
देहू पालखी प्रस्थान इनामदार साहेब वाडा, देहू येथून प्रारंभ
देहू
२
ज्येष्ठ वद्य ८
देहू
१. अनगडशाहबाबा अभंग आरती २. चिंचोली पादुका अभंग आरती
निगडी
आकुर्डी विठ्ठल मंदिर
३
ज्येष्ठ वद्य ९
आकुर्डी विठ्ठल मंदिर
१.एच.ए. कॉलनी, श्री विठ्ठल नगर २. कासारवाडी
दापोडी
१.शिवाजीनगर २.संत तुकाराम महाराज पादुका मंदिर, फर्ग्युसन काॅलेज रोड, पुणे
वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर कीर्तन-प्रवचन आदी कार्यकम होतात.फड म्हणजे वारीप्रमुख व त्यांच्या शिष्य मंडळींचा सुसंघटीत समुदाय. वारकऱ्याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली असेल, त्याचा तो शिष्य असून वारीस आल्यावर नियमाने त्या त्या फडावर जाऊन तो कीर्तन -भजनादी श्रवण करतो. फडाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वतःची व त्याच्या अनुज्ञेने त्याच्या शिष्य मंडळींची कीर्तने व प्रवचने होतात. श्री नामदेव महाराजचा, वासकरांचा व देहूकरांचा फड हे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होऊन त्यांनी सांप्रदायिक वारी, भजनाच्या, कीर्तनाच्या परंपरा चालू ठेवल्या आहेत.[३८]
वारकरी भजन चल चित्र
समाजाच्या विविध स्तरातून सेवा
पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते.[३९] काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून
वारक-यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, वर्षावस्त्र देणे अशी सेवा केली जाते.
सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था या सुद्धा वारक-यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारीरिक चाचणी, उपचार यांची काळजी घेतात.[४०]
शासकीय सुविधा
वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते. यासाठी शासकीय स्तरावर योजना राबविल्या जातात. पालकी मार्गाची पाहणी करणे, रस्त्यांची स्वछता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फेकेली जाते.[४१]
शासकीय महापूजा
आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सपत्निक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे.[४२][४३] त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते.[४४]
साहित्यातील चित्रण
पुस्तके
देहू व आळंदीहून दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.
वारीला जाणाऱ्या वारकऱ्याना जागोजागी दानशूर लोक सोयी सुविधा प्राप्त करून देतात. वारीहून परतताना मात्र वारकऱ्याना अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. या परतीच्या प्रवासावर सुधीर महाबळ यांनी ‘परतवारी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. (प्रकाशन दिनांक ५-३-२०१७)
याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
संशोधन आणि अभ्यास
वारी या विषयावर २०१८ साली आंतरराष्ट्रीय परिषदेत अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला गेला आहे.[४५]
शाळा :- वारीच्या परंपरेची माहिती मुलांना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी बालगटाच्या शाळा ते माध्यमिक शाळा यांमध्ये आषाढी एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले जाते. विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकरी पोशाख घालून येतात आणि पालखी सजवून त्यात विठ्ठल-रखुमाई यांची पूजा करून पालखी सोहळा साजरा करतात. शहरातील निवडक माध्यमिक शाळांतील मुले प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होतात आणि वारकरी भक्तांशी संवाद साधतात, ठराविक अंतर पायी चालून वारीचा अनुभव घेतात.[४६]
सायकल वारी- वारीतील विविध सुविधांची पाहणी करण्यासाठी २००० युवक सायकल वारी करतील अशी योजना २०१७ साली करण्यात आली.[४७]
स्वछता अभियान :- वारीतील गर्दीमुळे होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी वारीनंतर पंढरपुरात, तसेच वारीमार्गावर स्वच्छता अभियान केले जाते.[४८]
वारी या विषयावरील पुस्तके
पालखीसोहळा उगम आणी विकास (डॉ. सदानंद मोरे)
तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे)
आषाढी (डॉ. रामचंद्र देखणे)
एकदा तरी पायी अनुभवावी पंढरीची वारी (डॉ. सुरेश जोशी)
पंढरीची वारी (डॉ. वसुधा भिडे)
श्री पांडुरंग व पंढरी माहात्म्य (ज्ञानेश्वर म. इंगळे)
||पंढरी माहात्म्य|| (विठ्ठल दाजी धारूरकर)
वारकरी पंथाचा इतिहास (शं. वा. दांडेकर)
वारी एक आनंदयात्रा (संदेश भंडारे)
वारी एक आनंद सोहळा (दीपक नीलकंठ बिचे)
वारी : स्वरूप आणि परंपरा (डॉ. रामचंद्र देखणे)
विठाई (सकाळ प्रकाशन)
वारीच्या वाटेवर (महाकादंबरी दशरथ यादव)
पंढरपूरची वारी (दीपक फडणीस)
वारकरी कीर्तन
वारकरी कीर्तन हा कीर्तन परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे.[४९]