सोनिया गांधी (पूर्वाश्रमीच्या ॲन्टोनीया माईनो, ९ डिसेंबर, इ.स. १९४६) या एक भारतीय राजकीय नेत्या आहेत.[१] त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या सर्वात जास्त काळ सत्तेत असणाऱ्या बलाढ्य राजकीय पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचे पती आणि भारताचे माजी पंतप्रधानराजीव गांधी यांच्या हत्येनंतर ७ वर्षांनी १९९८ साली सोनिया गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. २०१७ सालापर्यंत २२ वर्षे इतका काळ त्यांनी अध्यक्षपद सांभाळले.[२][३][४][५] २०१९ साली राहुल गांधींनी, त्यांच्या मुलाने राजीनामा दिल्यानंतर त्या परत अध्यक्ष झाल्या.
सोनिया गांधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक सल्लागार समितींच्या अध्यक्षस्थानी होत्या. माहितीचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा आणि मनरेगा या देशाच्या विकासासाठी उपयुक्त असणाऱ्या योजनांचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांचा परदेशातील जन्माच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर नेहमी टीका आणि वाद होतो.[६][७][८][९]
तब्येतीच्या कारणावरून त्यांनी संपुआ (युपीए) सरकारच्या दुसऱ्या कालखंडात सक्रीय राजकारणात सहभाग कमी घेतला. गांधींनी जरी भारत सरकारचे कुठलेही खाते कधी सांभाळले नसले तरी त्यांचा भारतातील सर्वात जास्त शक्तिशाली लोकांमध्ये समावेश होतो. सोनिया गांधींचा बऱ्याच वेळा जगातील सर्वात जास्त शक्तिशाली महिलांमध्ये समावेश केला गेला आहे.[१०][११][१२]
पुरस्कार आणि सन्मान
सोनिया गांधी यांना २००४ ते २०१४ सालातील[१०] भारताची सर्वात जास्त शक्तिशाली राजकारणी म्हणून ओळखले जाते. विविध प्रसिद्ध नियतकालिके, मासिके यांच्या याद्यांमध्ये त्यांचा समावेश केला गेला आहे.[११][१२]
२०१३ मध्ये त्यांचा समावेश जगातल्या २१ सर्वात जास्त शक्तिशाली महिलांमध्ये आणि ९ सगळ्यात जास्त शक्तिशाली महिलांमध्ये फोर्ब्ज मासिकाद्वारे केला.[१३]
२००७ मध्ये फोर्ब्जने जगातील तिसरी सर्वात जास्त शक्तिशाली महिला म्हणून त्यांचा उल्लेख केला.[१४]
सोनिया गांधी यांचे चरित्रग्रंथ
सोनिया गांधी - एक अनन्यसाधरण जीवनप्रवास : मूळ लेखिका - राणी सिंग; मराठी अनुवाद - लीना सोहोनी. (मेहता पब्लिशिंग हाउस)