सांगोला किंवा सांगोले हे महाराष्ट्राच्यासोलापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण आहे.[१]दक्षिणमध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे एक स्थानक आहे. पंढरपूर या तीर्थक्षेत्रापासून हे जवळचे ठिकाण आहे. राज्य महामार्ग SH-१६१, SH-३, SH-७१ सांगोल्यातून जातात. पूर्वी फार संपन्न असल्याने 'सांगोले सोन्याचे' म्हणून हा भाग ओळखला जायचा. सांगोले हे नाव सहा - इंगोले आडनावाच्या - लोकांवरून पडले अशी आख्यायिका आहे.
सांगोल्यातील सहकारी सूत गिरणी उत्तम धाग्यासाठी प्रसिद्घ आहे. उच्च प्रतीच्या डाळिंबांच्या उत्पन्नासाठी हा तालुका ख्यातनाम असून त्यांची परदेशांतही निर्यात होते.[२][३][४] दर रविवारी येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो.[५] सांगोल्याचे खिलार जातीचे बैल प्रसिद्घ आहेत. तसेच शहरातील प्राचीन अंबिकादेवी मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी रथसप्तमीला मोठी यात्रा भरत असते.[६]
2021 जनगणनेनुसार सांगोल्याची लोकसंख्या 297000आहे. यामध्ये पुरुष 42% तर महिला 41% आहेत. साक्षरता दर 94% आहे. यामध्ये 88% पुरुष आणि 77% महिला साक्षर आहेत.[११]
तसेच लोकसंख्यमध्ये 17% हे सहा वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
इतिहास
सांगोला हे किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. येथील किल्ला[१२][१३]आदिलशाही काळात (१४८९–१६८६) बांधला गेला असून तत्कालीन कागदोपत्री सांगोला एक भरभराटीचे स्थान मानले जाई. त्यामुळे त्याची ख्याती 'सोन्याचे सांगोला' अशी होती. आदिलशाहीच्या पतनानंतर (१६८६) मोगलांच्या आधिपत्याखाली किल्ला आला व औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) छ. शाहूंनी (१७०७–४९) यांच्या अखत्यारीत हे शहर आले. छ. शाहूंनी मरतेसमयी दोन सनदांद्वारे राज्याचा कारभार पेशवे बाळाजी बाजीराव यांकडे सोपविला. त्यानंतर १७५० मध्ये महाराणी ताराबाईंच्या यमाजी शिवदेव नावाच्या सेवकाने सांगोल्याचा किल्ला हस्तगत करून बाळाजींच्या विरूद्घ बंड केले. ते सदाशिवराव भाऊने नेस्तानाबूत करून त्यावर पुन्हा पेशव्यांची सत्ता प्रस्थापित केली. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत (१७९५–१८१८) होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्यात शहराचे अतोनात नुकसान झाले. पेशवाईच्या अस्तानंतर ते इंग्रजी अंमलाखाली भारतीय स्वातंत्र्यापर्यंत होते.
शिक्षणव्यवस्था
अनेक शाळा, महाविद्यालये सांगोल्यात कार्यरत आहेत, ज्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देतात. पुढील उच्च शिक्षण आणि अभियांत्रिकी, औषधी, शिक्षण इत्यादी अभ्यासक्रमांसाठीही स्वतंत्र संस्था आहेत.
माध्यमिक
शहरात सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि न्यू इंग्लिश स्कूल ह्या माध्यमिक शिक्षण देणाऱ्या दोन प्रमुख शाळा आहेत.
शिवाजी पॉलीटेक्नीकल आणि फॅबटेक कॉलेज ही महाविद्यालये पदविका आणि पदवीचे शिक्षण देतात.
अर्थव्यवस्था
प्रमुख व्यवसाय शेती आहे. डाळिंबाच्या उत्पादनात हा भाग अग्रेसर आहे. येथील डाळींबाची निर्यात अमेरिका, इंग्लंड आणि मध्यपूर्वेच्या देशांत केली जाते. [२][४]
येथील सूतगिरणी प्रसिद्ध आहे. या गिरणीला आशियातील पहिल्या क्रमांकाची सूतगिरणी म्हणून पूर्वी नावाजलं गेलं होतं.[१४]खिलारी जातीच्या बैलांसाठीही हा भाग प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्वात मोठा बैलांचा बाजार येथे दर रविवारी भरतो.
तसेच MSH 71 आणि MSH 161 हे दोन राज्य महामार्गही आहेत. पहिला अकलूज आणि जतला जोडतो, तर दुसरा पंढरपूर-मिरज-सांगली जोडतो. तसेच नव्याने तयार झालेला सांगोला-पंढरपूर, MSH 161 हासुद्धा महत्त्वाचा चौपदरी महामार्ग आहे.
रेल्वे
सांगोला रेल्वे स्थानक हे दक्षिणमध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे महत्त्वाचे स्थानक आहे. सुरुवातीला हा रेल्वेमार्ग narrow-gaugeचा होता. २००९ आणि २०११ च्या कालावधीत हा मार्ग broad-gauge मध्ये रूपांतरित केला गेला.[१५]