हिंगोली शहराच्या ईशान्येस, तालुक्यात सिरसम बुद्रुक येथे मोठी बाजारपेठ आहे.
इतिहास
मराठवाडा विभाग हा आगोदर निझामाच्या राजवटीचा भाग होता. हिंगोली हा परभणी जिल्ह्यातील एक तालुका होता. इंग्रजशासित वऱ्हाड विभागाच्या सीमेवर असल्याने हिंगोली शहर हे निजामाचे लष्करी तळ होते. त्याकाळी लष्करी दळ, दवाखाने, प्राण्यांचे दवाखाने हिंगोलीवरून चालत. हिंगोलीचे नागरिक दोन मोठ्या लढायांना सामोरे गेले आहेत - १८०३ मधलं मराठे आणि टिपू सुलतान यांमध्ये झालेलं युद्ध आणि १८५७ सालचं नागपूरकर आणि भोसल्यांचं युद्ध. लष्करी तळ असल्यामुळे हिंगोली हे निझामाच्या राज्यातलं महत्त्वाचं तसंच प्रसिद्ध शहर होतं.
पलटण, रिसाला, सदर बाजार, तोफखाना, पेन्शनपुरासारखी ठिकाणे आजही प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये मराठवाडा मुंबई प्रांतात सामील झाला आणि १९६० मध्ये हिंगोली हे परभणी जिल्ह्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात आलं. १ मे १९९९ रोजी हिंगोली येथे मुख्यालय असलेला नवीन हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला.
हिंगोली शहर अक्षांश १९.७२ आणि रेखांश ७७.१५ वर वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ही ४५७ मि इतकी आहे. शहरात दोन तळी आणि एक नदी आहे. नदीचं नाव कयाधू नदी आहे. कयाधू नदी पैनगंगा नदीची उपनदी आहे
दळणवळण
हिंगोली शहरात रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुविधा उत्तम आहे. ८० किमीवर असलेले नांदेड हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. नांदेडहून हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईला नियमीत विमाने जातात. २३२ किमीवर असलेल्या चिकलठाणा विमानतळ, औरंगाबाद वरून मुंबई आणि दिल्लीला नियमीत विमाने जातात. नांदेड, हिंगोली, कन्हेरगाव, वाशिम, अकोला, अमरावती जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे.
हिंगोली डेक्कन रेल्वे स्थानक (HNL) हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येते. पूर्णा ते अकोला ब्रोड गेज लाईनवर हिंगोली एक मुख्य स्थानक आहे. हैदराबाद, नांदेड, जयपूर, इंदोर, कोल्हापूर, नागपूर, अजमेर, नवी दिल्ली, तिरुपती, अमृतसर, श्रीगंगानगर इत्यादी ठिकाणी नियमीत रेल्वे जातात.[३]
लोकजीवन
२०११ च्या जनगणनेनुसार[४] हिंगोली शहराची लोकसंख्या ही ८५,१०३ इतकी आहे. हिंगोली शहरात ६७% लोकं साक्षर असून ७४% पुरुष आणि ६०% महिला साक्षर आहेत. ६ वर्षाखालील मुलांची टक्केवारी १५% आहे.
हिंगोली शहरात ५३.४१ टक्के हिंदू, ३३.४७ टक्के मुस्लिम, ०.२४ टक्के ख्रिशचन, १०.६३ टक्के बौद्ध, २.०३ टक्के जैन, ०.०२ टक्के इतर धर्म आणि ०.०७ टक्के माहीती सांगितली नाही.
मराठी ही शहरातली प्रमुख भाषा आहे. सर्व शासकीय व दैनंदीन व्यवहार मराठीतूनच होतात. शहरात दख्खनी उर्दू, मारवाडी, गुजराती, तेलुगू भाषाही बोलल्या जातात. मराठी ही संपर्कभाषा आहे. विदर्भाचा वाशिम जिल्हा जवळच असल्याने येथिल भाषेवर वऱ्हाडी भाषेचा प्रभाव आढळतो.
शहरात दरवर्षी नवरात्रीत दहा दिवसांचा सार्वजनिक दसरा महोत्सव साजरा केला जातो. यात शहरातील रामलीला मैदान भागात मोठी जत्रा भरते. दीडशेहून जास्त वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्यात येतो.[५]