| ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
श्याम जोशी |
---|
|
जन्म |
श्यामसुंदर २२ ऑगस्ट १९५१
|
---|
प्रसिद्ध कामे |
ग्रंथसखा वाचनालय आणि स्वायत्त मराठी विद्यापीठ |
---|
श्याम जोशी (जन्म २२ ऑगस्ट १९५१) हे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ग्रंथसखा नावाचे ग्रंथालय चालवतात. आधी चित्रकला शिक्षक असलेल्या जोशींनी स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे, दुर्मीळ मराठी आणि अमूल्य अक्षर वाङ्मय मिळवले आहे.
ग्रंथसंग्रह
वडिलांच्या निधनानंतर निसर्ग ट्रस्ट स्थापन करून त्यांच्या संग्रही असलेली दहा हजार पुस्तके श्याम जोशी यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध करून दिली. ग्रंथालयाच्या जागेसाठी त्यांनी त्यांचा राहता बंगलाही विकला. त्यानंतर अक्षरशः बृहन्महाराष्ट्र पालथा घालून त्यांनी ठिकठिकाणी विखुरलेले मौल्यवान अक्षरधन मिळवले. सध्या त्यांच्या ‘ग्रंथसखा’मध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक पुस्तके असून त्यापैकी निम्म्याहून अधिक दुर्मीळ ग्रंथसंपदा आहे.
सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून टेक्सटाइल डिझाइनिंगची पदवी घेतल्यानंतर श्याम जोशींनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांनी गो.नी. दांडेकरांच्या सहवासात दुर्गभ्रमंती केली. इंटीरियर डिझाइनिंग्, फोटोग्राफी, ग्रंथ संकलन असे अनेक छंद त्यांना आहेत. साने गुरुजींच्या सान्निध्यात राहिलेल्या व त्यांच्या विचार प्रभावातल्या जोशींच्या वडिलांना वाचनवेड होते. त्यांच्या खोलीत भिंत भरून ग्रंथसंपदा होती. ही सर्व पुस्तके, त्यांत भरपूर भर टाकीत २१ मार्च २००५ च्या मुहूर्तावर या ग्रंथसखा नावाच्या लायब्ररीची सुरुवात झाली.
श्याम जोशी हे महाराष्ट्रातील २५हून अधिक मोठ्या रद्दी दुकानदारांच्या संपर्कात आहेत. मराठी भाषेतील अनेक अमूल्य अक्षरलेणी त्यांना या रद्दीच्या दुकानांतून मिळाली.
बदलापूर परिसरातील पाच हजारांहून अधिक वाचक ‘ग्रंथसखा’चे सभासद आहेत. श्याम जोशी यांनी ब्रिटिश राजवटीत छापण्यात आलेल्या दोलामुद्रित शंभर ग्रंथांसह अभ्यासकांना उपयोगी पडतील अशा एक लाखांहून अधिक संदर्भग्रंथांचे स्वतंत्र दालन ‘मराठी, भाषा, इतिहास, संस्कृती संशोधन केंद्र’ या नावाने अभ्यासकांना उपलब्ध करून दिले आहे.
अनेक नामवंत लेखकांनी त्यांच्याकडचा अमूल्य ग्रंथसंग्रह श्याम जोशी यांना जतन करण्यासाठी दिला आहे. त्यामुळे रवींद्र पिंगे, द.भि. कुलकर्णी,वि.आ. बुवा, निरंजन उजगरे, प्रभुराम जोशी आदी अनेकांच्या संग्रहांतील पुस्तके या स्वायत्त विद्यापीठात अभ्यासकांना आता उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील समग्र कोश त्यांच्या संग्रही आहेत. याशिवाय मराठीतील बौद्ध, ख्रिस्ती, जैन वाङ्मय येथे उपलब्ध आहे.
बदलापूरकरांना ‘ग्रंथसखा’ची ओळख व्हावी म्हणून मंगेश पाडगांवकर यांच्या काव्यवाचनाची मैफल जोशींनी आयोजित केली होती.
ग्रंथालयाचे स्वरूप
जोशींच्या सहकाऱ्यांनी निवडक पंधराशे पुस्तकांची ग्रंथसूची आपल्या सभासदांसाठी उपलब्ध केली आहे. या निवडक पुस्तकांचा वाचनालयात स्वतंत्र कक्ष आहे. साहित्याचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला कोणताही ग्रंथ उपलब्ध व्हावा व वाचनालयात बसून त्याचा अभ्यास करता यावा म्हणून अभ्यासिकेचीही सोय आहे.
वाचनालयाला शेषराव मोरे, गिरीश कुबेर, संजय भास्कर जोशी, भानू काळे, गंगाधर गाडगीळ, शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे, अनिल अवचट, अनंत सामंत, सुधीर मोघे, सुभाष भेंडे, फैय्याज अशा मान्यवर साहित्यिक-कलावंतांनी भेटी दिल्या आहेत. येथे वातानुकूलित अभ्यासिका आणि कै. रवींद्र पिंगे कलादालन आहे. श्रवणशाळा, पालकशाळा, काव्यसंध्या, इत्यादी उपक्रमांचे आयोजन करून या ग्रंथसख्याने आपला वेगळा ठसा साहित्यिक व सांस्कृतिक जीवनावर उमटवला आहे.
बदलती मराठी भाषा
ज्ञानेश्वरांच्या काळात म्हणजे १२व्या शतकात प्रचलित असलेली प्राकृत ते आताची २१व्या शतकात बोलली जाणारी मराठी यात खूप फरक आहे. या सुमारे आठ दशकांत मराठी भाषेत झालेले स्थित्यंतर श्राव्य माध्यमातून अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याचीही श्याम जोशी यांची कल्पना आहे.
शब्दकोश
दुकानांच्या पाट्या आणि फलक लिहिणाऱ्या कारागिरांना उपयोगी पडेल, असा एक सोप्या आणि अचूक शब्दांचा कोश श्याम जोशी तयार करीत आहेत.
श्याम जोशी यांचे स्वायत्त मराठी विद्यापीठ
या संपूर्ण स्वायत्त विद्यापीठाची स्थापनाच मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी झालेली आहे. .त्यामुळेच अभ्यासकांना येथे येऊन मराठी भाषेचा अभ्यास करता येत्प. त्याप्रमाणेच भाषेच्या विकासासाठी स्वतंत्रपणेही काही उपक्रम-अभ्यासक्रम येथे राबवले जातात. पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेची ‘पुस्तक जाणून घेऊ या’ अशी नावाची कार्यशाळा येथे भरते.
या विद्यापीठाने सार्वजनिक ठिकाणी लागणारे बॅनर्स तयार करणाऱ्या मंडळीसाठी खास पॉकेट डिक्शनरी तयार केली आहे. नेत्यांचे फ्लेक्स किंवा बॅनरवर असलेले शब्द त्यात संग्रहित करण्यात आलेत.
इमारतींच्या नावाकरिता मराठीतील ‘सुंदर-आकर्षक’ नावाचे एक पुस्तक या विद्यापीठाने तयार केले आहे. त्यात महाराष्ट्रातील नद्यांपासून फुलांपर्यंत, ते निसर्गातील पशू-पक्ष्यांपर्यंत अनेक सुरेख नावे आहेत.
हे स्वायत्त विद्यापीठ मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या धातूंचा एक धातुकोश करीत आहेत.
पुरस्कार
- पुणे मराठी ग्रंथालयाचा मानाचा साहित्यसम्राट न.चिं. केळकर पुरस्कार (२३ ऑक्टोबर, २०१५)
- महाराष्ट्र सरकारकडून मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार. (२०१७)
- मुंबई मराठी साहित्य संघाचा मंगेश नारायण कुलकर्णी पुरस्कार (२००९)
- ठाण्यात भरलेल्या ८४व्या मराठी साहित्य संमेलनात ‘ग्रंथप्रसारक’ हा पुरस्कार (२०११)
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून सत्कार (२०११)
- महाराष्ट्र सरकारचा मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार (२०१६)