सर्वात आगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी केली.
१८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता. सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती. परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उस्तव बंगालमधे जाउन पोहोचला.
बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय 'सखाराम गणेश देऊस्कर' (१८६९-१९१२) यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. देउस्कर जन्माने महाराष्ट्रीय परंतु बंगालमधे स्थायिक होते. पुढे १९०५ मधे जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगाल फाळणीचा प्रस्ताव आणला तेव्हा हा उत्सव अधिकच लोकप्रिय झाला. शिवरायांच्या प्रेरणेने ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्यास या उत्सवाची बरीच मदत झाली. तसेच महाराष्ट्र आणि बंगाल या दोन राज्यात एकोपा तयार होण्यास बरीच मदत झाली.
रवींद्रनाथ टागोर यांनीही त्याकाळी 'शिवाजी उत्सव' नावाची कविता लिहून शिवाजी महाराजांची स्तुती केली. त्यांच्या त्या कवितेत ते म्हणतात - हे शिवाजीराजा हा देश स्वतंत्र करण्याचा विचार तुमच्या मनात स्फुरला तेव्हा माझी बंगभूमी मूक राहिली. पण तुम्ही दिलेला स्वातंत्र्यप्रेरकतेचा मंत्र कायम आमच्या मनात तेवत राहील.
लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली. इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जी परंपरा आजही चालू आहे. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली. ३ मे१९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[२]
जन्मतारीख वाद
महाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.[३] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.[४]
उद्देश
शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.
^गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १३४, १३५ व १३६. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)