शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

शिवराज्याभिषेक दरबार, जुलिअन तारीख ६ जून १६७४. या दिवशी पहिले अष्टप्रधान मंडळ स्थापण्यात आले.
शिवराज्याभिषेक दरबार, जुलिअन तारीख ६ जून १६७४.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने महत्वाची घटना मानली जाते.[] ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली.[] छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता.[] राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला.[]

सोहळ्याची पूर्वतयारी

भवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे महाराजांना जाणे शक्य नव्हते. म्हणून ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८मेला प्रायश्चित्त केले. जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.

दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने आधी सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते.[] प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज गढून गेले होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाई यांचे आशीर्वाद घेतले.

राज्याभिषेक विधी

६ जून १६७४ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली.[] यावेळी छत्रपती शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. सोन्याने मढवलेल्या मंचावर महाराज बसले. शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बाल संभाजीराजे मागे बसले होते. [[अष्टप्रधान] मंडळातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी छत्रपती शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण केले जात होते आणि वाद्ये वाजविली जात होती.सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

अन्य सजावट

राजमुद्रा

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या ग्रंथात आलेले वर्णन - ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजांना आशीर्वाद दिला. [] ’शिवराज की जय’, 'शिवराज की जय’च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर,छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वर मंदिराकडे गेले. हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

अष्टप्रधान मंडळ

राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना संस्कृत नावे दिली आणि ही पदे वंशपरांगत न ठेवता मंत्र्यांच्या कर्तबगारीवर ठरण्यात येत असत.[] राज्याभिषेकानंतरचे अष्टप्रधान मंडळ पुढील प्रमाणे होते.[]

१) पंतप्रधान (पेशवा) - सर्वोच्च मंत्रीपद मोरोपंत त्रिंबक पिंगळे

२) पंत अमात्य - रामचंद्र नीळकंठ

३) पंत सचिव सुरणीस - अनाजीपंत दत्तो

४) मंत्री वाकनीस - दत्ताजी पंत त्रिंबक

५) सेनापती सरनौबत - हंबीरराव मोहिते

६) पंत सुमंत (डाबिर) - रामचंद्र त्रिंबक

७) न्यायाधीश - निराजपंत रावजी

८) पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव)-मोरेश्वर पंडित

साडेतीनशे वर्षपूर्ती सोहळा

रायगड येथील पुतळा

इसवी सन २०२४ मधे राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याची नोंद घेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.[१०]

संदर्भ

  1. ^ Gaikwad, Dr Hemantraje (2020-01-01). Shivaji Maharaj The Greatest: Shivaji Maharaj The Greatest: Dr. Hemantraje Gaikwad's Tribute to the Warrior King (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5322-262-8.
  2. ^ "३५०वा राज्याभिषेक दिन : छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची राजधानी रायगडची निर्माती कशी केली? | पुढारी". pudhari.news. 2024-06-20 रोजी पाहिले.
  3. ^ "Shivrajyabhishek Din 2024: छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकामागे नेमकी मुत्सद्देगिरी काय होती?". Loksatta. 2024-06-06. 2024-06-20 रोजी पाहिले.
  4. ^ DESHMUKH, GOPAL (2022-10-01). MARATHI DAULATICHE NARI SHILP. Mehta Publishing House Pvt. Ltd. ISBN 978-93-94258-80-8.
  5. ^ कोकाटे, डॉ श्रीमंत (2023-06-06). "Shivrajyabhishek 2023 : अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी रायगडावर येऊन शिवरायांना मुजरा केला, हे राज्याभिषेकाने झाले". Marathi News Esakal. 2024-06-20 रोजी पाहिले.
  6. ^ Bhaskaran, Medha Deshmukh (2017-05-16). Challenging Destiny:Biography - Chatrapati Shivaji (Marathi). Manjul Publishing. ISBN 978-81-8322-809-1.
  7. ^ Ayyappappanikkar (1997). Medieval Indian Literature: Surveys and selections (इंग्रजी भाषेत). Sahitya Akademi. ISBN 978-81-260-0365-5.
  8. ^ Dandge, Dr Satish (2014-08-15). भारतातील शासक व प्रशासन (प्राचीन व मध्ययुगीन) / Rulers and Administration in India (Ancient and Medieval). Educational Publishers & Distributors. ISBN 978-93-80876-26-9.
  9. ^ Kable, Dr Sanjay; Waghmare, Dr Ramesh (2023-10-12). Bhartiya Prashaskiya Vicharvant (Prachin, Madhyayugin aani Adhunik) / भारतीय प्रशासकीय विचारवंत (प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक)). Educational Publishers & Distributors. ISBN 978-93-92865-65-7.
  10. ^ "Shivrajyabhishek Din 2024: शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देताना मित्रांना पाठवा हे मराठमोळे संदेश, Whatsapp स्टेटस". Loksatta. 2024-06-06. 2024-06-20 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!