Share to: share facebook share twitter share wa share telegram print page

भायखळा

भायखळा

भायखळा स्थानक हे मुंबईच्या मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील छ.शि.म.ट. स्थानकाआधीचे महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकाची निर्मिती इंग्रजांकरवी १८५७ साली झाली. मुंबई महानगर पालिकेकडून प्रशासकीयरीत्या भायखळा हा 'ई' वॉर्डात विभागला जातो. विकास हे खऱ्या शहरीकरणाचे लक्षण आहे. पालिकेच्या प्रशासकीय कामांसाठी लागणाऱ्या सर्व छापील सामग्रीची छपाई ही येथील मुद्रणालयात केली जाते. १९३५ सालापर्यंत मुंबई महानगर पालिकेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे ही टाइम्स ऑफ इंडिया सारख्या खाजगी वृत्तपत्रांच्या मुद्रणालयात छापली जात असत. तत्कालीन गव्हर्नर वॉन टॉम यांनी मात्र खाजगी मुद्रणालयांवर विसंबून न राहता निविदा काढून १ मार्च १९३५ रोजी एन्ट हॉस्पिटलच्या तळमजल्यावर मुंबई महानगर पालिकेचा पहिला छापखाना काढला. त्यावेळी छापखान्यात सहा कामगार होते. सुरुवातीस अक्षरांची जुळणी हाताने करावी लागत असे, त्यानंतर १९५० साली कर्नाक ब्रिज येथील क्रशर ग्राउंडेड बिल्डिंगमध्ये मशीन कंपोझिंगच्या लायनो-मोनो तंत्रावर आधारित अद्ययावत छापखाना सुरू करण्यात आला. १९६७ साली मधुकर कामतांची छपाई तंत्रज्ञ म्हणून नेमणुक करण्यात आली. जर्मनीतील ड्रूपा येथे दर तीन वर्षांनी भरणाऱ्या छपाई तंत्रज्ञान प्रदर्शनाचा उपयोग करून १९८० नंतर तत्कालिन सरकारने ऑफसेट छपाई तंत्रज्ञान कालबाह्य ठरवत डी.टी.पी तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. यानंतर २००७ मध्ये अत्याधुनिक हेडलबर्ग कलर मशीनचा उपयोग सुरू झाला. या मुद्रणालयात वैद्यकिय, शैक्षणिक साहित्य, करपावत्या, विविध प्रकारचे लेखन साहित्य, मोठ्या नोंदवह्या, अंदाजपत्रके, जनजागृतीपर सामाजिक-नागरी संदेश देणारी पत्रके इत्यादी प्रकारची छापकामे केली जातात. तंत्रज्ञान क्रांतीचा वेग इतका प्रचंड आहे की कामगारवर्ग कालबाह्य न ठरता बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या वर्षी ह्या मुद्रणालयाची ७५वी वर्षपूर्ती झाली. येथील कामगारवर्ग हा प्रामुख्याने स्थानिक मराठी भाषिक आहे. ई तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढत असला तरी तो शहरी भागापुरताच मर्यादित दिसतो. जो पर्यंत तंत्रज्ञानाचा असमतोल आहे तो पर्यंत छापिल माध्यमांचे महत्त्व अबाधित राहिल. याशिवाय भारतीय राज्यघटनेत सरकारी दस्तावेज कागदोपत्री असावेत अशी अटही आहे, त्यामुळे छापिल माध्यमाचे महत्त्व हे अबाधित असल्याचे दिसुन येते. पालिका शाळेच्या इमारतीतच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला सोशल ॲक्टिविस्ट इंटिग्रेशन- ’साई’ नावाची संस्था आहे. सामाजिक संस्था ह्या समाजातिल पीडित घटकांना आधार देऊन त्यांचे प्रतिनिधित्व करतात. एकप्रकारे या संस्था पिडितांचे पालकत्व घेत असतात. ’साई’ ही संस्था प्रामुख्याने मुंबई परिसरातील एच.आय.व्ही बाधित वारांगनांचे पुर्नवसन करते. ए.आर.टी ट्रीटमेंट आणि एच.आय.व्ही वरील मोफत उपचार करणारी ही पहिली संस्था आहे. याशिवाय वारांगनांच्या वस्तीत जाउन विविध प्रकारे एच.आय.व्ही एड्स विषयी जनजागृती करते. जन्मजात एड्स बाधीत मुले, तृतीयपंथी, हिजडे, सामान्य नागरिक यांसारख्यांसाठी साई विविध प्रकारच्या यशस्वी योजना राबबते. साई शिवाय भायखळ्यात शेल्टर होम्स, बाल्डीवाला चॅरिटी ट्रस्ट, आहल-ए-सुन्नत वेल्फेर ट्रस्ट, कॅन्सर रिसर्च फाउंडेशन, हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड्स अँड डिफ्स, आदि सामाजिक संस्था आहेत. ना.म. जोशी मार्गाने पुढे येत असताना डाव्या बाजूला भायखळा लोहमार्ग रेल्वे पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबलबरोबर भायखळा (प.) स्टेशन समोर असलेल्या केळे गल्लीत शिरलो. इथे केळांचे गोदाम असल्यामुळे या गल्लीस केळे गल्ली असे नाव पडले. गल्लीच्या सुरुवातीस किरकोळ दुकाने आहेत. आतील परिसर मात्र अत्यंत बकाल आहे. खुज्या झोपडपट्ट्या, रस्त्यावरून भरून वाहणारी गटारे, त्याच रस्त्यावर खेळणारी उघडी फाटक्या मळक्या कपड्यांतील मुले असे एकंदर चित्र दिसले. या गल्लीतच एक सिटी ट्रस्ट नावाची नवीन इमारत आहे. या भागात फक्त हिच एक नवीन इमारत असून या इमारतीच्या एका २ बी.एच.के फ्लॅटचा दर २०-२२ लाखाच्या आस पास आहे. या इमारतीजवळ उभे राहिले असता समोरच काही अंतरावर दुसरा रेसिडेन्सी टॉवर दिसतो. त्या टॉवर मधील तेवढ्याच जागेचा दर मात्र ४५ लाखांवर आहे. मी भायखळा शहरात असलो तरी तो परिसर मात्र शहरी नव्हता किंबहुना तेथील लोकही शहरी नव्हते. या परिसरात कोणत्याही प्रकारचा लहान उद्योग-धंदा नाही, फक्त मजुरी करणारा कष्टकरी वर्ग आणि त्यांची कुटुंबे इथे रहातात. येथील लोक कोणत्याही प्रकारचा कर भरत नसल्या कारणाने सुधारणेस कोणताच वाव दिसत नाही. हा परिसर भायखळ्यातील असला तरी शहरी मात्र वाटत नव्हता. ना.म. जोशी मार्गावरील भायखळा अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोरून मी तात्यासाहेब घोडके चौकातुन उजवीकडे वळुन पालिकेच्या ’ई’ वॉर्ड कार्यालयात गेलो. आसपासचा परिसर हा मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय मध्यमवर्गीयांचा आहे. ’ई’ वॉर्ड कार्यालयासमोरच ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथियांचे चर्च आहे. ’ई’ वॉर्डाचे क्षेत्रफळ हे ७.३२ कि.मी. आहे. २००१ च्या जनगणनेनुसार या वॉर्डाची लोकसंख्या ४,४०,३३५ इतकी आहे. वॉर्डाच्या सीमारेषा ह्या विविध रस्त्यांद्वारे ठरवल्या गेल्या आहेत. पूर्वेस रे रोड, पश्चिमेस साने गुरुजी रोड, उत्तरेस दत्ताराम लाड मार्ग आणि दक्षिणेस रामचंद्र भट्ट मार्ग अशा चौकटीत ’ई’ वॉर्ड आहे. याशिवाय या भागात सहा प्रकारच्या समाजसेवी संस्था आहेत. ’ई’ वॉर्ड कार्यालयापुढे चालत गेल्यास ’साखळी इस्टेट’ नावाचा संपूर्ण मुस्लिम बहुल परिसर आढळतो. स्थानिकांकडून या नावाचा ’सांकली इस्टेट’ असा उच्चार केला जातो. साखळी इस्टेटच्या पहिल्या गल्लीत मी उजव्या बाजूने शिरलो. आजुबाजूला उर्दू भाषेतील पाट्या लक्ष वेधून घेतात. येथील इमारती ह्या दु-तिमजली आहेत. बांधकाम जुन्या पद्धतीचे आणि परिसर काहीसा अस्वच्छ आहे. येथील घरे ही अरुंद आणि फार चिंचोळ्या आकाराची आहेत. स्थानिकांकडून भायखळा आणि या परिसराच्या इतिहासाविषयी जाणून घेतले असता १९४० सालच्या सुमारास हा परिसर फार कमी दाटीवाटीचा होता असे कळाले. त्या सुमारास ह्या परिसरात ट्राम चालत असे. सुरुवातीस हा भाग ख्रिश्चनबहूल होता या भागाच्या एकूण लोकसंख्येच्या १/३ लोकसंख्या ही ख्रिश्चन धर्मीय होती. नंतर मात्र कुटुंबातील सदस्य संख्या वाढू लागल्याने ख्रिश्चन धर्मिय हा परिसर सोडून उपनगरांत जाऊ लागले. या परिसरात राहणारा मुस्लिम आणि हिंदू हा गिरण्यांमधे काम करणारा कामगार होता. सुशिक्षित ख्रिश्चन हा बँका, शाळा वगैरे कार्यालयांत काम करत होता तर अशिक्षित ख्रिश्चन हा श्रीमंत ख्रिश्चनांकडे घरकाम करत होता. भायखळ्यात पहिले फिनिक्स, इंडिअन, गार्डन, ब्रॅडबरी, सिंप्लेल्स, शक्ती या कापड गिरण्या होत्या. रस्ते फार चांगले नव्हते पण मुंबई-आग्रा रोड रहदारीचा मुख्य रस्ता होता. नाले पूर्वी पाण्याने साफ केले जात असत आता मात्र स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसतो. मौलाना आझाद रोड, जेकब सर्कल, भायखळा ब्रिज, नागपाडा हे पहिले वस्तीचे प्रमुख परिसर होते. भायखळ्याला अन्न-धान्याचा पुरवठा हा पुणे, नाशिक, येथून होत असे. किंग्सले डेविसची ’एस कर्व्ह’ ही संकल्पना भायखळ्याच्या बाबतीत लागू पडते. उद्योगीकरण झाल्यानंतर प्रामुख्याने शहरीकरण झालेले दिसते. मात्र गिरण्या बंद पडल्यानंतर पुन्हा कर्वची गती कमी झालेली आढळून येते. मौलाना आझाद, रिपन रोड, नागपाडा, सुरती मोहल्ल्यात मुस्लिम धर्मीय जास्त संख्येने राहत असत. लालबाग, एस ब्रिज, जेकब सर्कल या भागात हिंदू तर नागपाड्यात ज्यू आणि माझगाव, साखळी रोड या भागात पूर्वी ख्रिस्त लोक रहात असत.

Prefix: a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9

Portal di Ensiklopedia Dunia

Kembali kehalaman sebelumnya