फुरसे (शास्त्रीय नाव : Echis, उच्चार: एकिस; इंग्लिश: Saw-scaled viper) हा मध्य पूर्व आणि मध्य आशिया भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा विषारी साप आहे. महाराष्ट्रात कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत. हा भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंशांना आणि मृत्यूंना कारणीभूत आहे.[१] महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात त्याला "फरूड" असेही म्हणले जाते. २००९ साली इराक मध्ये त्तैग्रीस आणि युफ्रायटिस नद्यांच्या खोऱ्यांत दुष्काळ पडला होता, त्या वेळी तिकडच्या हजारो फुरशांनी इराकी जनतेमध्ये दहशत पसरवली होती.[२][३]
वर्णन
फुरसे एक लहानसर (लांबी ४६-५५ सेंमी.) साप आहे; पण कधीकधी ७९ सेंमी. लांबीचे नमुनेही आढळतात. यांचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूंवर एकेक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. कधीकधी पाठीच्या मध्यरेषेवर लहान पांढऱ्या रंगाच्या काहीशा चौकोनी ठिपक्यांची ओळ असते आणि ती बाजूच्या नागमोडी रेषेला चिकटलेली असतात. डोके त्रिकोणी असून त्याच्यावर बाणासारखी (↑) स्पष्ट पांढरी खूण असते. याचे विषदंत काहीसे लांब असतात. पोटाचा रंग पांढरा असतो आणि त्यावर फिकट तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. शेपूट लहान असते.[४]
डोक्यावरचे खवले बारीक असून प्रत्येकावर कणा (कंगोरा) असतो. पाठीवरच्या सगळ्या खवल्यांवर कणा असून त्याला दाते असतात.
इतर भाषांतील नावे
आढळ
फुरसे भारतात जवळजवळ सगळीकडे आढळते. मैदानी प्रदेशात जरी तो बहुधा राहत असला, तरी १,८०० मीटर किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर तो आढळला आहे. ओसाड व रेताड प्रदेश आणि खडकाळ डोंगराळ भाग या ठिकाणी तो राहतो; दाट जंगलातसुद्धा आढळतो. हा साप अनेकदा दगडांच्या खाली आढळतो. कडक उन्हाचा त्याला त्रास होत नसावा असे वाटते कारण तापलेली वाळू किंवा जमीन यावर तो पुष्कळदा दिसतो.[४]
स्वभाव
हे साप संधिप्रकाशात (पहाटे आणि संध्याकाळी) किंवा रात्री सक्रिय असतात. तरीही ते दिवसासुद्धा सक्रिय असल्याचे काही अहवाल सांगतात.[५] दिवसा ते प्राण्यांची बिळे, दगडातील भेगा, कपारी, सडलेले लाकडाचे ओंडके अशा अनेक ठिकाणी लपून बसतात. वाळूमय वातावरणात ते स्वतःचे शरीर वाळूत पुरून फक्त तोंड उघडे ठेवू शकतात. ते साधारणपणे पावसानंतर किंवा दमट रात्री जास्त सक्रिय असतात.[९]
फुरसे हा साप आक्रमक असतो. त्याला किंचित जरी डिवचले किंवा चिडविले, तर ते इंग्रजी आठच्या (8) आकड्याप्रमाणे आपल्या शरीराच्या गुंडाळ्या करून त्या एकमेकींवर एकसारख्या घासतो. त्यामुळे दाते असलेले खरखरीत खवले एकमेकांवर घासले जाऊन खस् खस् असा आवाज एकसारखा होतो. या स्थितीत वरचेवर जीभ बाहेर काढून तो झटकन डोके पुढे काढतो आणि समोर दिसेल त्या पदार्थाचा चावा घेऊन लगेच डोके मागे घेतो. या सर्व क्रिया फक्त १/३ सेकंदात होतात.[२] हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो ते पुष्कळदा कळतसुद्धा नाही. त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो चावतो.[४]
अन्न
हा साप बेडूक, सरडे, पाली, लहान साप, विंचू आणि अनेक प्रकारचे किडे खातो.[४]
प्रजनन
हा साप अंडी न देता पूर्ण वाढ झालेल्या पिल्लांना जन्म देतो. उत्तर भारतातील सापांचे मिलन हिवाळ्यात होते व मादी साप एप्रिल ते ऑगस्टदरम्यान पिल्लांना जन्म देतात. मादी एका वेळी ३ ते १५ पिल्लांना जन्म देते. पिल्लांची लांबी ११५ ते १५२ मिमी असते.[६]
विष
या प्रजातीचे साप सरासरी १८ मिग्रॅ कोरडे विष निर्माण करू शकतात. फुरसे १५ ते २० मिग्रॅ विष टोचतो. एक प्रौढ व्यक्तीसाठी फक्त ५ मिग्रॅ डोस प्राणघातक असतो. या प्रजातीचे विष हिमोटॉक्झिक असते. म्हणजे ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या करायची क्षमता कमी होते आणि शरीरातून रक्तस्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते, नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते. रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी निष्क्रिय होऊन रुग्ण दगावतो.[२]
हा साप लहान असला, तरी याचे विष नागाच्या विषाच्या पाचपट आणि घोणसाच्या विषाच्या सोळापट जहाल असते. फुरसे चावलेल्या लोकांपैकी १०-२०% माणसे दगावतात. दंश झाल्यापासून २४ तासांच्या आत मृत्यू येतो किंवा रोगी २-२० दिवसदेखील जगतो. फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरते, यामुळे बऱ्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत.[४] याशिवाय आता विष प्रतिरोधक औषधे उपलब्ध असल्यामुळे मृत्यूचा दर कमालीचा घटला आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ