भारतीय संदर्भाने प्रणय या शब्दाने भिन्नभिन्न अर्थ प्रकट होतात. मैत्री, आकर्षण, शृंगार, प्रीती, सहवास, संवाद, स्पर्श किंवा निखळ प्रणयचेष्टा यांपैकी एक किंवा अधिक गोष्टींच्या आस्वादातून प्रणय अभिव्यक्त होतो. प्रणय काही वेळा हेतूपूर्वक, तर काही वेळा आधी न ठरवताही घडून जातो. काही वेळा ती निव्वळ एखाद्या भावनेने, एखाद्या प्रणय कल्पनेने, तर काही वेळा भक्तिरसानेही अभिव्यक्त होतो.
प्रणयाच्या योगाने मिळणाऱ्या आनंदाच्या अनुभूतित व उत्कटतेत केवळ कामुकतेचे आधिक्य अथवा अतिरिक्तता नसून, ती उत्कटता पावित्र्य, आदर, संपूर्णता या गुणांनी युक्त असू शकते. 'प्रणय' शब्दांत समर्पण, निवेदन हा मुख्य भाव आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे, संपूर्ण 'स्व' त्वाचे दुसऱ्या व्यक्तीला पवित्र भावाने, आदर बुद्धीने समर्पण करणे, म्हणजे प्रणय.
प्रणय-भावाच्या बिंबातील 'काम' हा एक किरण आहे, एवढेच. कामुकता ही संपूर्ण प्रणयबिंबाची व्याप्ती करीत नाही. किंबहुना कामुकतेशिवाय देखील प्रणय असू शकतो.
व्युत्पत्ती आणि अर्थ छटा
'प्रणय' या शब्दाचा अर्थ 'जवळ नेणे' असा आहे. 'प्रणय' या शब्दांत मूळ धातू 'नी' आहे. त्याचा अर्थ 'नेणे' असा आहे.
'नी' पासून 'नय' एक धातुसाधित होते.
'प्र' या उपपदाचे अर्थ अतिशयित्व, आधिक्य, उत्कटत्व असे अर्थ आहेत. उदा० प्र + मत्त (अतिशयित्व), प्र + वाद (आधिक्य), प्र + गूढ (उत्कटत्व) प्र + गति (पुढे).
'प्रणय' हा शब्दातील 'प्र' या उपसर्गाचे सर्व अर्थ, (अतीशयित्व, आधिक्य, उत्कटता, पुढे) समन्वित करणारा आहे.
प्रणयास (मिलनास) आतुर किंवा उत्सुक स्त्री/पुरुष प्राण्यास अथवा मानवास प्रणयातुर असा शब्द वापरला जातो.
संस्कृती
प्रणय हा शब्द भारतीय संस्कृतीत अगदी व्यक्तीचे नाव या विशेषनाम स्वरूपातही येतो. शांतिसुक्ते झाल्यानंतर अथर्ववेदात प्रणयसूक्ते आहेत. पतिपत्नीचे ऐक्य कसे राहील, कोणत्या रूपात राहील, पती - पत्नी एकमेकांचे दोष कमी कसे करतील आणि गुण कसे वाढवतील ह्याची चर्चा आणि चित्रण प्रणयमंत्रात आहे. पतीपत्नी एकजीव असली पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे, काय अपेक्षित आहे ह्याचेही वर्णन अथर्ववेदात आहे.
ऋषी -मुनींनी प्रणयरत प्राण्यांच्या हत्येचाही निषेध केला आहे. प्राचीन साहित्यात प्रणयाची भरपूर वर्णने आढळतात. श्रीकृष्ण राधेचा प्रणयातील निर्मळपणा समाजाला आणि धर्माने मान्य होता.गाथा सप्तशतीच्या लोकसाहित्य गाथातून महाराष्ट्रीय जीवनातील प्रणयाची वर्णने आढळतात. आदी शंकराचार्यांनी वादविवादात प्रणयासंदर्भातील भारतीय सनातन धर्मीय भूमिकेची मांडणी केली. मध्ययुगीन काळात भक्तिरसाकरिता प्रणयाची उदाहरणे संतवचनांमध्ये आढळतात.
पण प्रत्यक्ष भारतीय जीवनपद्धतीत प्रणय हा धार्मिक,सामाजिक आणि कुटुंबव्यवस्थेने घालून दिलेल्या परिघातच अभिप्रेत असे. त्याचा एक परिणाम प्रणयाची अभिव्यक्ती अप्रत्यक्षरीत्या थोरामोठ्यांच्या नकळत, हळुवार आणि संवेदनशीलता जपत झाल्याचे आढळून येते.
प्रत्यक्षात या परिघाने बऱ्याच बाबतीत व्यक्तिस्वांतत्र्यही कुंठीतही केले. १९-२०व्या शतकाच्या प्रारंभी समाज सुधारकांनी सामाजिक कुप्रथांविरुद्ध आवाज उठवण्यास सुररुत केली. तरी प्रणय या विषयावर रघुनाथ धोंडो कर्वे यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेचा विरोध आणि अवमानना झेलून प्रणयाचा विषय चर्चेकरिता खुला करण्याचा आग्रही प्रयत्न केला.
१९५० च्या दशकात ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुषतुलना या ग्रंथातून स्त्रियांसमोरील प्रश्न परखडपणे मांडले. विभावरी शिरूरकर यांचा कळ्यांचे निःश्वास हा कथासंग्रह प्रकाशित झाल्यावर स्त्रियांच्या लेखनाला स्त्रीचे खरे सत्त्व सापडलेले आढळून येते. कळ्यांचे निःश्वास कथासंग्रहातील हिंदोळ्यावर या कथेची नायिका या व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रखर जाणीवांचा आविष्कार करते. व्यक्तिस्वातंत्र्य + वास्तववाद अशा प्रेरणा एकत्रित जागृत होऊन विभावरीबाई स्त्रीविश्वाचे खरेखुरे दर्शन घडविण्याकडे वळल्या.
भारतीय वाङ्मयाने आणि भारतीय चित्रपट सृष्टीनेसुद्धा प्रणय हा विषय २०व्या शतकात समाजासमोर अधिक मोकळेपणाने मांडण्यास सुरुवात केली. त्याला स्वातंत्र्योत्तर काळात व्यक्तिस्वातंत्र्यविषयक कायद्याचे पाठबळही मिळत गेले.
१९६० च्या दशकानंतर समाजजीवनावर पाश्चात्त्य विचारसरणीचा हळूहळू परिणाम होऊन अधिक मोकळेपणा येत असल्याचे आढळून येते. तर स्वतःस संस्कृती रक्षक म्हणवणाऱ्यांकडून पाश्चिमात्तयीकरणाच्या विरोधाच्या निमित्ताने व्हॅलेन्टाईन्स डेला विरोधही होतो. त्याऐवजी वसंत पंचमी हा प्रणयदिन म्हणून साजरा करावा असे त्यांचे आवाहन असते. दुसरीकडे सिनेदिग्दर्शक अमोल पालेकर आणि वंदना खरे यांनी मराठी चित्रपटात आणि रंगभूमीवरील प्रणय विषय अधिक मुक्तपणे हाताळण्यास आरंभ केला असे आढळते.
आदर्श प्रणय कसा असावा
प्रणय विश्वात सुंदर विचार असावेत, विकार असू नये. मिलनाबद्दल मनाची हूरहूर असावी, हवस नसावी. संयम असावा, आवेग नको. उदात्तता हवी प्रेमउन्माद नको. अनिर्बंध वासना नको. मनाचा/ देहाचा प्रणय हवा पण बलाचा प्रयोग नसावा. मनाची तृप्ती हवी, वखवख नको. हळुवार अलवर स्पर्श हवा, पाशवी आंदोलने नको. गारवा हवा, चटका नको. शृंगार हवा भावनांचा देहावर आधिकार नसावा. उद्वेग नको, आवेश नको. स्वैराचार तर नकोच नको. परस्परांची काळजी घेतली जावी. दोघांकडून दोघांना समांतर सुख दिले जावे.
लावणी सारख्या माध्यमातील मर्यादित स्वरूपातील उत्शृंखल कामुकता आणि प्रणयचेष्टेतील खेळकरपणा प्रणयभावनेचा आस्वाद आणि आनंद घेण्यास उपयुक्त मानली जाते.
बंधने
प्रणयाच्या अभिव्य्क्तीला सहसा दोन किंवा मर्यादित व्यक्तीपुरती मर्यादित असली तरीसुद्धा बऱ्याचदा नैतिक मूल्ये आणि कायद्याच्या बंधनांचा स्वीकार करावा लागतो. बऱ्याचदा विवाहसंस्था, कुटुंब, समाज, क्लास-वर्ण-जाती-धर्म आणि शासन व्यवस्थासुद्धा प्रणयाच्या अभिव्यक्तीतील अडसर बनू पाहतात/असतात.
ब्रह्मचर्य, संन्यास, वैराग्य, विरक्ति, समर्पण, त्याग या स्व-स्वीकृत, किंवा लादल्या गेलेल्या अपेक्षांतून बंधनांची निर्मिती होते.
उपरोल्लेखित काही बंधनांबाबत औचित्याचा मुद्दे उपस्थित केले जातात. मूलभूत अधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीवादी चळवळीने प्रणयाच्या अभिव्यक्तीवरील बंधनांबाबत वेळोवेळी प्रश्नचिन्हे उभी करून चळवळी केलेल्या आढळतात.
विद्यार्थी जीवन आणि पौगंडावस्था
पौगंडावस्थेतून जाणाऱ्या नव तरुण तरुणींना केवळ नैसर्गिक शारीरिरीक आकर्षणाची वस्तुस्थिती स्वाभाविक मोकळेपणाने स्विकारतानाच, शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे याची जाणीव लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून दिली जाणे अपेक्षित असते. प्रीतीच्या उत्कट भावना जपतानाच अभ्यासातून लक्ष विचलित होणार नाही याची काळजी विद्यार्थी जीवनात घावी असा सल्ला दिला जातो.
साहित्य आणि प्रणय
विवाह संकल्पनेची माहिती विविध कथा आणि गोष्टींच्या माध्यमातून बाल वाङमयाच्या माध्यमाने होते. पौगंडावस्था वयात भारतीय धार्मिक साहित्यातील कथांतून अप्रत्यक्षपणे प्रणयकथांशी परिचय होत जातो.
मराठी काव्य, कथा, कादंबऱ्याच्या माध्यमातून विपुल प्रमाणात प्रणयविषयक लेखन होत आले आहे.चंद्रकांत काकोडकर, ना.सी.फडके, सुहास शिरवळकर, बाळ सीताराम मर्ढेकर इत्यादींच्या मराठी प्रणय साहित्याला लोकप्रियता लाभली. मेनका, अप्सरा, इत्यादी मासिकांनी प्रणयकथांना प्रसिद्धी दिली.
विविध कला आणि प्रणय
गीत, संगीत, काव्य, नृत्य, गायन, काव्य, लालित्य, नाट्य, चित्र, छायाचित्रण, चित्रपट अशा विविध कलामाध्यमांच्या निर्मितीतून किंवा त्यांच्या आस्वादानेसुद्धा प्रणयाची अभिव्यक्त होत असते..
शृंगार हा याचा मुख्यरस मानला गेला असलातरी बऱ्याचदा इतर नवरसांचे सानिध्यसुद्धा असते.
काही वेळा कलांप्रमाणेच क्रीडा खेळ आणि व्यायामांचे प्रकारही प्रणयास साहाय्यभूत होऊ शकतात.
चित्रपट, दृकश्राव्य माध्यमे आणि प्रणयदृश्ये
चित्रपट हे कलेचे नवीनतम पण प्रभावी माध्यम समजले जाते.त्यात इतर नवरसांसोबतच भारतीय चित्रसृष्टीच्या परिपेक्षात शृंगाररस आणि प्रणयदृश्यांवर बराच भर असतो.
वैवाहिक जीवन आणि प्रणय
वैवाहिक जीवनात प्रणयाचे कामजीवनाचे आणि सृजनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
प्रकार
हेसुद्धा पाहा
संदर्भ