हा लेख प्रसाद याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, प्रसाद.
भारतात पूजेच्या अथवा आरतीच्या समाप्तीनंतर देवाला अर्पण केलेल्या निवेदनीय खाद्यपदार्थास म्हणजे नैवेद्य असे म्हणतात. तो देवासमोर असतो तेव्हा त्यास भोग चढवणे म्हणतात. ज्याची भक्ती केली जाते त्याच्याकडून (देवाकडून किंवा गुरूकडून) नैवेद्या घेऊन भक्तांमध्ये आशीर्वादस्वरूप वाटला जातो तेव्हा त्या नैवेद्यास प्रसाद संबोधले जाते.
नैवेद्य केवळ खाद्य पदार्थांचाच दाखवला जातो परंतु आशीर्वादस्वरूप प्रसाद हा खाद्य अथवा कोणत्याही खाद्येतर गोष्टीचाही असू शकतो. मंगल कार्यप्रसंगी प्रसाद सर्व उपस्थित-अनुपस्थतांमध्ये वाटतात. तर नैवेद्याच्या भोजनाची थाळी बहुधा विशिष्ट व्यक्तींला देतात.
व्युत्पत्ती
निवेदं अर्हतीति’ म्हणजे निवेद किंवा निवेदन याला नैवेद्य म्हणतात.[१] केतकर ज्ञानकोशानुसार यज्ञांमध्ये अर्पण केलेल्या आहुतींना हविष्(हवि) असा शब्द प्रचलित होता. यूस् अथवा यूषन् , पृषदाज्य, पुरोडाश् , करम्भ, अमिश्री, नवनीत, पयस्या, परिवाप, ब्रह्मौदन, मस्तु, यवागू , वाजिन् , सक्तु, पृषातक, गवाशिर, दध्याशिर आणि यवाशिर इत्यादी अर्पण करावयाच्यां खाद्य/पेयांची नावे वैदिक साहित्यातून वापरली गेली आहेत.[२]
प्रसाद आणि नैवेद्यांचे पदार्थ
नैवेद्याचे तीन प्रकार प्रामुख्याने मानले जातात-
१. लघु नैवेद्य-दूध-साखर, पेढे, गूळ, गूळखोबरे यांना लघु नैवेद्य असे म्हणतात.
२.प्रसाद नैवेद्य-व्रतपूजा करताना दाखविल्या जाणाऱ्या नैवेद्यास प्रसाद असे म्हणतात.उदा. सत्यनारायण पूजेला संजीवक म्हणजे शिरा, सोळा सोमवार व्रताला चूर्म्क म्हणजे चुरमा,लक्ष्मीपूजन वेळी लाह्या-बत्तासे इ.
३.महानैवेद्य-भक्ष्य-पोळी, भाकरी इ. पदार्थ.
भोज्य म्हणजे भात,खिचडी इ. पदार्थ
लेह्य म्हणजे पंचामृत,चटणी इ. पदार्थ
चोष्य म्हणजे आंबा, शेवगा शेंगा इ. असलेले पदार्थ
पेय म्हणजे बासुंदी, खीर इ. पदार्थ
या सर्वांनी युक्त नैवेद्याला महानैवेद्य म्हणतात.[३]
पूजा करणारे यजमान यथाशक्ति शक्य असलेल्या पदार्थाने देवतांना नैवेद्य दाखवतात. वेगवेगळ्या देवतांना अथवा वेगवेगळ्या पूजा अथवा सण समारंभांप्रसंगी विशिष्ट पदार्थांचे नैवेद्य दाखवण्याच्या परंपराही असतात.
नैवेद्य पूजेनंतर व आरतीच्या आधी दाखवतात. वैष्णव संप्रदाय मध्ये लोकं श्री विष्णू आणि त्याचे अवतार राम आणि कृष्ण, नरसिंह इत्यादी. यांना नैवेद्य दाखवताना नैवेद्य असलेल्या थाळीत प्रत्येक पदार्थावर एक-एक तुळशी पत्र/पान ठेवतात. वैष्णव संप्रदायात अशी भावना आहे की तुळशी पत्र ठेवल्यावर भगवान श्री हरि नैवेद्य लगेच स्विकारतात.
या भोजनासमवेतच, शीतल व सुवासिक पाणी, सायीच्या घट्ट दह्यात मीठ/सैंधव, वाटलेली कोथिंबीर, भाजलेली सुंठ, तळलेला हिंग टाकून व ते घुसळून केलेला मठ्ठापण असावा.