दीप्ती भगवान शर्मा (२४ ऑगस्ट, १९९७:सहारनपूर, उत्तर प्रदेश, भारत - ) ह्या भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. त्या अष्टपैलू आहेत.[१] त्या डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हातानी ऑफ ब्रेक गोलंदाजी करतात आणि सध्या (२०२० मध्ये) क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहेत आणि त्या सध्या एक दिवसीय सामना खेळणाऱ्या महिलांमध्ये त्यांच्या सर्वोच्च वैयक्तिक धावांसाठी तिसऱ्या क्रमांकावर आहेत (१८८ धावा).[२][३] दीप्ती शर्माने पूनम राऊत हिच्या साथीने ३२० धावांचा सर्वोच्च त्रिशतकी भागीदारीचा विक्रम रचला.
सुरुवातीचे आयुष्य
दिप्ती शर्मा ह्या सुशीला आणि भगवान शर्मा ह्यांच्या कन्या आहेत. त्या आपल्या भावंडांमध्ये सर्वात धाकट्या आहेत. त्यांचे वडील रेल्वेतून सर्वोच्च आरक्षण पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झाले. शर्मा यांना नवव्या वर्षांपासून क्रिकेटची आवड लागली. त्या आपल्या बंधूंना, सुमीत शर्मा( उत्तर प्रदेश संघाचे माजी जलद गती गोलंदाज) यांना रोज विनंती करून त्यांच्या बरोबर नेट सराव बघायला जात. आग्र्यामधील एकलव्य स्पोर्ट्स स्टेडीयममध्ये एका नेट सरावाचा दिवशी शर्मा ह्यांच्या भावाने आणि त्यांच्या संघातल्या मुलांनी हातात चेंडू देऊन त्यांना गोलंदाजी करायला सांगितली. तो चेंडू ५० मीटर अंतरावरून सरळ जाऊन यष्ट्यांना जाऊन लागला. भारताच्या राष्ट्रीय महिला संघाच्या निवड समितीच्या सदस्या, हेमलता कला[४], त्या वेळी तिथे उपस्थित होत्या आणि तो क्षण शर्मांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा ठरला.[५]
निवड समितीतल्या सदस्यांचे लक्ष नेहमी शर्मा ह्यांच्याकडे असायचे. त्यांची अष्टपैलू असण्याची क्षमता बघून रीटा डे[६], भारतीय संघाच्या माजी फलंदाज ह्यांनी शर्मा ह्यांना शिकवायचे ठरवले. शर्मा सुरुवातीला मध्यमगती गोलंदाजी करत पण नंतर त्यांना फिरकी गोलंदाजी करायला सुचवण्यात आले. हे बदलणे सोपे नव्हते. पण त्याच्या प्रशिक्षकांनी आणि संघाच्या निवड समितीच्या सदस्यांच्या मदतीमुळे त्या फिरकी गोलंदाजी करू शकल्या.