आन्श्लुस

१५ मार्च १९३८ रोजी व्हियेना येथे आन्शुल्सची घोषणा करताना ॲडॉल्फ हिटलर

आन्श्लुस (जर्मन: Anschluss, मराठी अर्थ: ऑस्ट्रियाचे विलीनीकरण) ही ऑस्ट्रिया देशाच्या इतिहासातील एक महत्त्त्वपूर्ण घटना होती. १२ मार्च १९३८ रोजी ॲडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने संपूर्ण ऑस्ट्रिया देशावर कब्जा मिळवला व ऑस्ट्रियाचा पूर्ण भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. १९३८ ते १९४५ दरम्यान एकत्रित राहिल्यानंतर दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीच्या पराभवासोबतच आन्श्लुसदेखील संपुष्टात आले व ऑस्ट्रिया देश पुन्हा स्वतंत्र व सार्वभौम बनला.

जर्मनी व ऑस्ट्रिया ह्या देशांत जर्मन भाषिक, मिळत्याजुळत्या वंशाचे व संस्कृतीचे लोक प्रामुख्याने असल्यामुळे एकत्रीकरणाचे वारे दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून वाहत होते. १८७१ साली प्रामुख्याने प्रशियाच्या प्रभावाखाली घडलेल्या जर्मनीच्या एकत्रीकरणामध्ये ऑस्ट्रिया वगळला गेला होता. पहिल्या महायुद्धाअखेरीस ऑस्ट्रिया-हंगेरी राष्ट्र कोलमडले व पहिल्या ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाचा उदय झाला. ह्यादरम्यानच ऑस्ट्रियाला जर्मनीसोबत एकत्रित होण्यात रस होता परंतु वर्सायच्या तहातील अटींमुळे हे अशक्य झाले होते. परंतु बहुसंख्य ऑस्ट्रियन जनतेला एकत्रीकरण हवे होते. वायमार प्रजासत्ताक व ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाच्या संविधानातच एकत्रीकरणाचा उद्देश सामील केला गेला होता. १९३० च्या पूर्वार्धात देखील ऑस्ट्रियामध्ये ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा कायम राहिला होता. जन्माने ऑस्ट्रियन असलेल्या ॲडॉल्फ हिटलरच्या मनात लहानपणापासुनच एकत्रित ऑस्ट्रिया-जर्मनीची संकल्पना रुजली होती. त्याच्या १९२५ सालच्या माईन काम्फ ह्या आत्मचरित्रातदेखील त्याने एकत्र जर्मन राष्ट्र निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ह्या पार्श्वभूमीवर १९३२ साली हिटलर जर्मनीमध्ये सत्तेवर आल्यानंतर त्याने एकत्रीकरणाचे जोरदार प्रयत्न चालू केले. परंतु हिटलरच्या उदयामुळे घाबरलेल्या ऑस्ट्रियन सरकारने जर्मनीसोबतचे आर्थिक संबंध कमी करून एकत्रीकरणाविरुद्ध प्रचार चालू केला.

ह्याच काळात ऑस्ट्रियामध्ये सत्तेवर असलेला ख्रिस्ती समाजवादी पक्ष एकत्रीकरणाच्या विरोधात होता. तत्कालीन ऑस्ट्रियन चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफस ह्याने ऑस्ट्रियन संसद बरखास्त केली व ऑस्ट्रियन नाझी पक्षावर बंदी घातली. परंतु ऑस्ट्रियन नाझी पक्षाची लोकप्रियता व प्रभाव वाढतच राहिला व त्याने ऑस्ट्रियन सरकारविरुद्ध अतिरेकी हल्ले चालू ठेवले. १९३४ सालच्या डॉलफसच्या हत्त्येनंतर सत्तेवर आलेल्या कर्ट शुश्निगने डॉलफसची नाझी-विरोधी धोरणे कायम ठेवली. ह्यामुळे खवळून उठलेल्या नाझी जर्मनीने ऑस्ट्रियावर संपूर्ण बहिष्कार टाकला ज्याचा परिणाम म्हणून लवकरच ऑस्ट्रियाची अर्थव्यवस्था घायकुतीला आली. अखेर ११ जुलै १९३६ रोजी शुश्निगने जर्मन राजदूत फ्रांत्स फॉन पापेनसोबत करार केल्या ज्यामध्ये त्याने कैद केलेल्या नाझी पुढाऱ्यांची सुटका केली व नाझी पक्षाला अतिरेकी हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. परंतु हिटलरला हा करार पटला नाही.

१९३६ साली हिटलरने चातुर्वार्षिक आर्थिक योजनेची घोषणा केली ज्यामध्ये लष्करी क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ सुचवली गेली होती. ह्यासाठी लोखंडाचे उत्पादन पुरे करण्यात जर्मनीला अपयश येऊ लागले व ऑस्ट्रियातील खनिज खाणींवर हर्मन ग्योरिंगची नजर पडली व ग्योरिंगने ऑस्ट्रिया-जर्मनीच्या एकत्रीकरणाचे जोरदार पडघम वाजवण्यास सुरुवात केली. बेनितो मुसोलिनीच्या इटलीला आन्श्लुसची कल्पना संपूर्णपणे अमान्य होती परंतु इटलीसारख्या सहकारी देशाला दुखवून देखील आन्श्लुसकडे वाटचाल करण्याची ग्योरिंगची तयारी होती. नोव्हेंबर १९३७ मध्ये झालेल्या एका गुप्त भेटीदरम्यान हिटलरने ऑस्ट्रिया व चेकोस्लोव्हाकियावर लष्करी अतिक्रमण करून तेथील नैसर्गिक संपत्तीचा लाभ घेण्याची योजना जाहीर केली. जर्मनीच्या वाढत्या आगळीकीला घाबरून अखेर ऑस्ट्रियन चान्सेलर शुश्निगने १२ फेब्रुवारी १९३८ रोजी हिटलरची भेट घेतली. ह्या भेटीत हिटलरने आपल्या अनेक मागण्यांची यादी शुश्निगला दिली ज्यामध्ये प्रामुख्याने नाझी पुढाऱ्यांना ऑस्ट्रियन सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर नेमण्याचा प्रस्ताव होता. शुश्निगने ह्या मागण्या विनाशर्त मान्य केल्या व अंमलात आणल्या.

९ मार्च १९३८ रोजी ऑस्ट्रियाला सार्वभौम ठेवण्याचे सर्व पर्याय संपुष्टात आल्यानंतर शुश्निगने ह्याबाबतीत जनमताची घोषणा केली. हिटलरचा ह्या जनमत चाचणीस पूर्ण विरोध होता. त्याने शुश्निगच्या राजीनाम्याची मागणी केली व त्याच्या जागेवर आर्थर सेस-इंक्वार्ट ह्या नाझी नेत्याला बसवण्याचा हुकुम सोडला. फ्रान्सब्रिटन ह्यांना हस्तक्षेपाची विनंती करून देखील त्यांच्याकडून काही प्रतिसाद न आल्यामुळे अखेरीस ११ मार्च १९३८ रोजी शुश्निगने राजीनामा दिला व केवळ २ दिवसांकरिता सेस-इंक्वाट ऑस्ट्रियाच्या चान्सेलरपदावर आला. त्याने लगेचच हिटलरला ऑस्ट्रियात जर्मन सैन्य पाठवण्याची विनंती केली. १२ मार्च १९३८ रोजी जर्मन सैन्य वेअरमाख्टने ऑस्ट्रियामध्ये प्रवेश केला व ऑस्ट्रियाचे सार्वभौमत्व संपुष्टात आले. ह्याच दिवशी संध्याकाळि हिटलर आपल्या मोटारीमधून लिंत्स येथे पोचला जेथे त्याचे ऑस्ट्रियन लोकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. आन्श्लुसला बव्हंशी ऑस्ट्रियन व जर्मन जनतेचा पाठिंबा होता. १५ मार्च १९३८ रोजच्या हिटलरच्या व्हियेनामधील सभेला २ लाखांहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. अनेक शतके अस्तित्वात असलेले व बिस्मार्कला देखील न जमलेले जर्मन वंशाच्या लोकांना एकत्र आणण्याचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हिटलरची लोकप्रियता शिगेला पोचली. १० एप्रिल १९३८ रोजी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत ९९.७ टक्के मतदारांनी आन्श्लुसला पाठिंबा दर्शवला.

आन्श्लुसच्या लक्षणीय यशामुळे बळकट बनलेल्या नाझी जर्मनीने सप्टेंबर १९३८ मध्ये म्युनिक करार केला. ह्या करारादरम्यान युनायटेड किंग्डम, फ्रान्सइटली या युरोपातील राष्ट्रांनी जर्मनीला चेकोस्लोव्हेकियाचा सुडेटेनलॅंड हा प्रदेश परस्पर बहाल केला व हिटलरची खुषामत चालूच ठेवली.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!