सागरी विमा सागरी धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या जोखमींचा विमा आहे. रेल्वे, रस्ता, समुद्र वा आकाश ह्या मार्गांनी वाहतूक होत असताना होणारी हानी ह्या विमाप्रकाराखाली संरक्षित होते. सामान्यतः सागरी विमा दोन प्रकारे हातळला जातो : (अ) मालाचा विमा, (आ) वाहतूक करणाऱ्या साधनांचा विमा.
सागरी विम्यात विमाकराराची सर्व तत्त्वे अंतर्भूत असतात. विमाहित हे विमित घटना घडण्याच्या वेळी विमेदाराजवळ पाहिजे. बेचन हे संबंधित मालाचे तसेच पॉलिसीवरील लाभाचे होऊ शकते. पॉलिसीची रक्कम त्रयस्थाला द्यावी, अशा तऱ्हेचे बेचनही होऊ शकते. विमेदाराची पॉलिसीवर सही आणि पॉलिसीचे प्रत्यक्षात हस्तांतरण यामुळे बेचन सिद्ध होते. सागरी विमा पॉलिसीमध्ये क्षतिपूर्तीचे तत्त्व तितकेसे लागू पडत नाही. ‘सागरी विमा कायदा १९६३’च्या अन्वये सागरी विमाकराराचे नियमन होते. जोखमीचा काळ गोदामापासून गोदामापर्यंत असा असतो. संपूर्ण हानी या प्रकारात जहाजावरील सर्व जोखीम धारकांत विभागली जाते. आंशिक हानी त्या त्या विभेदाराला सोसावी लागते. अंतर्गत रेल्वे-रस्ता वाहतुकीसाठी अशाच तऱ्हेच्या पॉलिसी दिल्या जातात. सागरी विमा पॉलिसी देण्यापूर्वी माल पाठविणाऱ्याचे नाव, मालाचे वर्णन, मालाच्या बांधणीचे वर्णन, प्रवासाचा मार्ग, जोखमीचा प्रकार, जहाजाचे (किंवा वाहनाचे) नाव, विम्याची रक्कम, ह्यापूर्वीच्या दाव्यांची माहिती प्रस्तावकाकडून मिळविणे आवश्यक असते.